आपल्यातलं अंतर
आता फक्त अंतर राहिलेलं नाही,
ते सवयींत शिरलंय,
श्वासांमधल्या थांब्यात,
एकमेकांकडे पाहूनही न पाहण्याच्या क्षणांत.
बोलणं कमी झालं नाही,
खरं तर आत कुठेतरी ते मरून गेलंय,
म्हणून मौन इतकं जड झालंय
की त्याचं ओझं दोघेही उचलतोय.
पूर्वी तुझ्या शांततेत मी अर्थ शोधायचो,
आता माझी शांतताही तुला अपरिचित वाटते.
आपण हरवत नाही आहोत,
आपण हळूहळू विसरत चाललोय.
हे अंतर
वादातून नाही वाढलं,
तर न बोललेल्या वाक्यांतून,
दडपलेल्या भावनांतून,
आणि “ठीक आहे” म्हणत
गळून पडलेल्या सत्यांतून.
कधी कधी वाटतं,
शब्दांनी जखम केली असती तर बरं झालं असतं,
मौन मात्र
भरून न येणारी पोकळी सोडून जातं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे