तो खूप चांगला होता,
पण चांगुलपणाचाच दोष त्याच्या नशिबी आला.
जिवंत असताना
त्याच्या वेदनांना नाव नव्हतं,
त्याच्या अश्रूंना वेळ नव्हता,
आणि त्याच्या अस्तित्वाला
कोणाची गरजच वाटली नाही.
तो हसत राहिला
कारण रडण्याचा हक्क
त्याच्याकडून आधीच हिरावला गेला होता.
त्याच्या शांततेत
असंख्य किंकाळ्या दडलेल्या होत्या,
पण लोकांना आवाजच
ऐकायचा नव्हता.
तो चांगला होता,
म्हणून प्रश्न विचारले नाहीत,
म्हणूनच उत्तरही
त्याच्या वाट्याला आली नाहीत.
आणि जेव्हा तो गेला,
तेव्हा प्रत्येकाला
त्याचं महत्त्व कळलं.
तेव्हा त्याचं आयुष्य
“आदर्श” ठरलं,
त्याचा संघर्ष
“प्रेरणा” बनला,
आणि त्याचा मृत्यू
“बलिदान” झाला.
पण त्याला जगायला
कोणीच मदत केली नाही.
हा समाज फार चलाख आहे,
तो माणसाला जिवंतपणी
तोडतो…
आणि मेल्यावर
पूजतो.
किती विचित्र असतं ना?
जिवंत माणसाला उपेक्षा
आणि मृत माणसाला पुरस्कार.
कारण खरंय,
तो खूप चांगला होता
हा पुरस्कार,
फक्त मेल्यावरच मिळतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे