मी म्हणालो म्हणून मला वेळ देऊ नकोस,
विनवणीच्या सावलीतले क्षण मला नकोत.
वेळ ही मनाच्या झऱ्यातून वाहणारी असते,
त्या दयेच्या ओंजळीतले थेंब मला नकोत.
जर मनाच्या आभाळात माझ्यासाठी ढग जमले,
तरच सरीसारखी ये माझ्याकडे.
नाहीतर कोरड्या शब्दांचा पाऊस पाडू नकोस,
उगाच ऋतू बदलल्यासारखं दाखवू नकोस.
ज्याला आज तुझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात
नव्याने जागा मिळाली आहे,
त्याच्यासाठी ठेव तुझा प्रत्येक श्वास,
तुझ्या वेळेची प्रत्येक सुवासिक पहाट.
मला नको उरलेला संध्याकाळचा अंधार,
नको उशिरा आठवलेली आठवण.
मी स्वीकारतो माझं एकटेपण शांतपणे,
कारण प्रेमाला कधीच मागणं शोभत नाही.
जा…
जिथे तुझं मन आता निवांत विसावतं,
तिथेच दे तुझा वेळ, तुझं जगणं.
मी मात्र शिकतोय,
स्वतःच्या सोबतीतही
हळूच हसत जगायला.
तुझ्या आठवणींच्या सावलीत नाही,
तर माझ्याच प्रकाशात उभं राहायला.
तुझ्या पावलांच्या आवाजाशिवायही
रस्ता चालता येतो हे कळतंय आता,
आणि एकटेपणाच्या शांत दुपारी
मनाशी मन बोलतंय आता.
तू दिलेल्या जखमांवरही
वेळेची फुंकर हळूच पडते,
आणि नकळत मनाला
नवं धैर्य मिळतं.
कदाचित कधीतरी पुन्हा
कोणाच्या नजरेत आपलेपण दिसेल,
पण तोपर्यंत मी
स्वतःचाच हात धरून चालतोय.
कारण शेवटी कळलं मला
साथ कोणाचीही असो वा नसो,
स्वतःसोबत शांत राहता येणं
हेच खरं जगणं असतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212