१९७० चं दशक ज्यांनी पाहिलंय ते लोक आता वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर असतील किंवा अनेकांनी साठी ओलांडलीसुद्धा असेल.
माझा जन्म १९६० चा. त्यामुळे १९७० चं दशक शाळा – कॉलेजच्या आठवणींचं दशक. यातल्याच काही आठवणी या मालिकेत शेअर करतोय.
या आठवणी आपल्याला त्या जुन्या सुवर्णकाळात घेऊन जातील याची खात्री आहे.
सुरुवात करुया मनोरंजनापासून….
१९७० च्या दशकात आजच्यासारखे स्मार्टफोन, इंटरनेट किंवा सॅटेलाइट टीव्ही (डिश टीव्ही) नव्हते. त्यामुळे त्या काळातील मनोरंजनाची साधने अतिशय मर्यादित होती. पण जी काही होती, ती माणसांना एकमेकांशी जोडणारी होती. एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क असायचा.
फोन नावाचा प्रकार आस्तित्त्वात असला तरीही तो सगळ्यांकडेच नसायचा. एखाद्याकडे फोन असणं ही खास बाब मानली जायची. ते एक स्टेटस सिंबॉल होतं. फोन कनेक्शन सहजपणे मिळत नसायचं. त्यामुळे ते मिळवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या केल्या जायच्या… त्याबद्दल आपण नंतर वाचूच…
१९७० च्या दशकातील मनोरंजनाची प्रमुख साधने म्हणजे रेडिओ, नाटके (आणि ग्रामीण भागात तमाशा), मोजकीच असलेली चित्रपटगृह, ग्रामोफोन आणि रेकॉर्ड प्लेयर, वाचन, बैठे आणि मैदानी खेळ आणि अर्थात कट्ट्यावरच्या किंवा पारावरच्या गप्पा !
कट्ट्यावरच्या गप्पा आणि पारावरच्या बैठका
प्रबासाची आणि इतर संपर्काची साधने जास्त नसल्यामुळे लोक एकमेकांच्या जास्त जवळ होते. शाळेतून किंवा ऑफसमधून येताना गप्पा व्हायच्या. संध्याकाळी गावातील पारावर किंवा शहरातील कट्ट्यांवर लोक एकत्र जमायचे.
राजकारण, समाजकारण आणि गप्पागोष्टींमधून वेळ घालवणे हे त्या काळातील सर्वात नैसर्गिक मनोरंजन होतं.
मैदानी आणि बैठे खेळ
लंगडी, लपंडाव, पकडापकडी, विटी-दांडू, गोट्या, आणि दोरीवरच्या उड्या हे खेळ संध्याकाळच्या वेळी खेळले जायचे.
दुपारी किंवा रात्रीच्या वेळी घरात सगळे एकत्र बसून बुद्धिबळ, कॅरम, पत्ते, किंवा व्यापार ( आताचा Monopoly) हे बैठे खेळ खेळत असत.

वाचन
७० च्या दशकात इंटरनेट नसल्यामुळे वाचन हे मनोरंजनाचे आणि माहितीचे मोठे साधन होते. दररोजची वर्तमानपत्रे ही बातम्या मिळवण्याचे साधन होते. साप्ताहिके आणि मासिके ही ज्ञान आणि मनोरंजन यासाठीची प्रमुख साधने होती. वाचनालयातून पुस्तके आणून वाचली जात.
‘दक्षता’, ‘किर्लोस्कर’, ‘ललित’, ‘मार्मिक’, आणि ‘जत्रा’ (विनोदी मासिक) ही मासिके घराघरांमध्ये वाचली जायची. दिवाळीच्या काळात येणारे विशेषांक वाचण्याची वेगळीच मजा असायची.
झुंजारराव, कॅप्टन दीप यासारख्या रहस्यकथांची पात्र म्हणजे तेव्हाच्या तरुणाईचे idols असत.
रेडिओ आणि ट्रान्झिस्टर
त्या काळी रेडिओ हे प्रत्येक घरातील मनोरंजनाचे सर्वात स्वस्त आणि मुख्य साधन होतं.
आकाशवाणी (All India Radio वर सकाळी ‘मंगलप्रभात’ आणि ‘वंदे मातरम्’ने दिवसाची सुरुवात व्हायची. दुपारी स्त्रियांसाठी ‘वनिता मंडळ’, तर संध्याकाळी ‘कामगार विश्व’ आणि ‘युववाणी’ सारखे कार्यक्रम असायचे.
रेडिओ श्रीलंका चे कार्यक्रम लोकप्रिय असायचे. दर बुधवारी रात्री ८ वाजता अमीन सयानी यांच्या आवाजातील ‘बिनाका गीतमाला’ ऐकण्यासाठी संपूर्ण भारतीय उपखंड रेडिओभोवती जमा व्हायचा.
भारतीय लोक मूळत: क्रिकेटवेडे. जेव्हा जेव्हा भारताचे क्रिकेट सामने असायचे, तेव्हा लोक रेडिओ कानाला लावून धावत्या समालोचनाचा (कॉमेंट्री) आनंद घ्यायचे.
फिलिप्स (Philips), बुश (Bush), आणि मर्फी (Murphy) चे रेडिओ त्या काळी खूप प्रसिद्ध होते.
नाटक आणि तमाशा
मराठी संस्कृतीत ७० च्या दशकात लाईव्ह मनोरंजनाला खूप महत्त्व होते. नाटकांचे ते सुवर्णदिन होते. शिवाजी मंदिरला नाटके लागायची डॉ. श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची नाटके पाहण्यासाठी लोक महिनाभर आधी तिकीट बुक करायचे. ‘नटसम्राट’ आणि ‘अश्रूंची झाली फुले’ यांसारखी नाटके याच काळात हाऊसफुल चालली.
ठाण्यासारख्या ठिकाणी बंदिस्त नाट्यगृह नव्हते. त्यामुळे मो ह विद्यालयाच्या भव्य पटांगणावर नाटकांचे प्रयोग होत असत. तिथेही भरगच्च गर्दी असे.
ग्रामीण भागात जत्रा, उरुस या काळात तमाशा, लावणी, आणि वगांतर्गत नाटकांना प्रचंड गर्दी व्हायची.
चित्रपटगृहे
७० चे दशक हे हिंदी आणि मराठी चित्रपटांचे ‘सुवर्णयुग’ मानले जाते.
‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ आणि ‘डॉन’ या चित्रपटांमुळे अमिताभ बच्चन ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून प्रसिद्ध झाले. चित्रपटगृहांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी मैलोनमैल लांब रांगा लागायच्या.
१५ ऑगस्ट १९७५ ला दोन चित्रपट रिलिज झाले आणि दोघेही तुफान गाजले, या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्व रेकॉर्डस मोडले. ते चित्रपट होते ‘शोले’ आणि ‘जय संतोषी मां’
दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ सारख्या विनोदी चित्रपटांनी थिएटरमध्ये रौप्यमहोत्सव आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले. दादांच्या द्वयर्थी संवादांमुळे त्यांचे चित्रपट गाजले.
ग्रामीण भागात तंबू ठोकून चालणारी ‘टूरिंग टॉकीज’ हे मनोरंजनाचे मोठे आकर्षण होते.
ग्रामोफोन आणि रेकॉर्ड प्लेयर
घरात गाणी ऐकण्यासाठी एचएमव्ही (HMV) कंपनीचे ग्रामोफोन किंवा रेकॉर्ड प्लेयर वापरले जायचे.
काळ्या रंगाच्या मोठ्या तबकड्यांमधून गाणी ऐकणे हा त्या काळी खूप मोठा स्टेटस सिंबॉल मानला जाई. अनेक जुन्या गायकांच्या स्मृती या ग्रामोफोनच्या रेकॉर्डसमुळे जपल्या गेल्या आहेत.