महान संस्कृत महाकवी अश्वघोष यांनी लिहिलेले सौंदरानंद हे संस्कृत साहित्यातील एक श्रेष्ठ महाकाव्य आहे.
भगवान गौतम बुद्ध यांचा सावत्र भाऊ नंद आणि त्याची स्वरुपसुंदर प्रिय पत्नी सुंदरी यांच्या प्रेमावर आणि राजा नंदाने बुद्धधर्माचा स्वीकार करणे या आधारभूत कल्पनेवर हे महाकाव्य रचलेले आहे.
यामध्ये एकूण १८ सर्ग असून पहिल्या सर्गात गौतम बुद्धांची जन्मभूमी असणाऱ्या कपिलवस्तू चे वर्णन करण्यात आले आहे. दुसऱ्या सर्गात राजा शुद्धोधन यांचे वर्णन आले असून गौतम बुद्ध आणि नंद यांच्या जन्माचे प्रसंग वर्णन करण्यात आले आहेत. तर तिसर्या सर्गात सिद्धार्थाला गौतम बुद्धत्व प्राप्त होण्याची प्रक्रिया वर्णन केली आहे. चौथ्या सर्गात नंदाचे आणि सुंदरी चे प्रेमप्रकरण वर्णन करून गौतम बुद्ध त्यांच्या दारी भिक्षा मागण्यासाठी येतात पण त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते असे वर्णन केले आहे. ही घटना कळल्यानंतर नंदाला अत्यंत वाईट वाटते तो जाऊन गौतम बुद्धांची क्षमायाचना करतो असा प्रसंग चौथ्या सर्गात आहे.
पाचव्या सर्गात गौतम बुद्धांच्या विचाराने प्रेरित झालेला नंद त्यांच्याकडून दीक्षा स्वीकारतो. त्याने असा संसार सोडल्यामुळे दुखी झालेली सुंदरी आणि तिचे दुःख कळल्यावर स्वतः दुःख करणारा नंद असे विरहाचे वर्णन सहाव्या आणि सातव्या सर्गात वर्णन केला आहे.
आठव्या आणि नवव्या सर्गात अशाप्रकारे विलाप करणे कसे अयोग्य आहे याचा संघातील श्रमण नंदाला उपदेश करतात. दहाव्या सर्गात एक चमत्कारिक प्रकार वर्णन केलेला आहे. गौतम बुद्ध आपल्या योगशक्तीने नंदाला स्वर्गात नेऊन तेथील अप्सरा दाखवतात. पण आता उलटा प्रकार म्हणजे त्या अप्सरांच्या प्राप्तीसाठी नंद तपश्चर्या करू लागतो.
अकराव्या सर्गात आनंद नावाचा शिष्य नंदाच्या अशा तपश्चर्येसाठी त्याचा उपहास करतो ज्यामुळे खजील झालेला नंद बुद्धांच्या चरणी येऊन निर्वाण प्राप्तीची प्रार्थना करतो असे बाराव्या सर्गात वर्णिले आहे. भगवान गौतम बुद्ध यांच्या द्वारे नंदाला शील आणि संयम यांचा उपदेश, इंद्रिय विजयासाठी आवश्यक असणार्या कर्तव्यांचा उपदेश आणि मानसिक शक्ति साठी आवश्यक उपदेश यांचे सविस्तर वर्णन तेरा ते पंधराव्या सर्गात आले आहे.
सोळाव्या सर्गात चार आर्य सत्य, सतराव्या सर्गात नंदाला अमृतत्वाची ची प्राप्ती तर शेवटच्या सर्गात नंदाची गुरुवंदना अशा स्वरूपात अठरा सर्गात हे महाकाव्य नटलेले आहे. जीवनातील अशाश्वत गोष्टीच्या मागे लागण्याचे प्रतीक असणार नंद आणि शाश्वत सुखाचा महामार्ग सांगणारे भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान यांच्या विश्लेषणाने हे महाकाव्य कायमस्वरूपी प्रेरणादायी आहे.
कु. मोनिका राजेश चिट्टलवार
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. २५. ०५. २०२२
