महाकवी भास यांचे विश्वविख्यात नाटक म्हणजे स्वप्नवासवदत्तम् ! राजा उदयन याच्या प्रेमकथेवर आधारित या नाटकात त्याला स्वप्नात वासवदत्ता दिसते या महत्त्वपूर्ण घटनेवर हे शीर्षक आधारलेले आहे.
भासांच्या प्रतिज्ञा यौगंधरायण या नाटकाचा हा उत्तरार्ध. वासवदत्तेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राजावर आक्रमण करून आरूणी नावाचा त्याचा शत्रु त्याचे राज्य गिळंकृत करतो. ते राज्य परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा राजाचा अमात्य यौगंधरायण, राणी वासवदत्तेला विश्वासात घेऊन तिला एका आश्रमात घेऊन जातो. तेथे आलेल्या मगध राजकन्या पद्मावती जवळ तिला सोपवतो.
इकडे लावाणक नावाच्या ज्या गावाचा राजा रहात असतो त्या गावाला आग लावून वासवदत्ता जळून मेली अशी आवई उठवतो. पुढील योजनेप्रमाणे राजा आणि पद्मावती यांचा विवाह लावून देण्याची योजना सफल होते. वासवदत्तेच्या समोर सर्व प्रसंग घडत असताना वासवदत्तेला शांतपणे पाहण्याशिवाय पर्याय नसतो.
जरी राज्यकारभाराच्या हिशोबाने राजाने दुसरे लग्न केले असले तरी त्याचे प्रेम मात्र वासवदत्तेवरच आहे.
मेलेल्या बायकोवर देखील उत्कटपणे प्रेम करणारा राजा, त्याच्या त्या प्रेमासाठी स्वतः लपून राहणारी वासवदत्ता, राजाच्या वासवदत्तेवरील या प्रेमाचा प्रगल्भपणे स्वीकार करणारी पद्मावती, स्वतःचा कोणताही स्वार्थ नसताना, केवळ राजाच्या कल्याणासाठी हे सर्व करणारा अमात्य यौगंधरायण अशा वैशिष्ट्यपूर्ण पात्रांनी हे नाटक सजलेले आहे.
पहिल्या अंकात वासवदत्तेची ताटातूट, तिला ब्रह्मचाऱ्या कडून आपल्या पतीचे आपल्यावर असलेले प्रेम कळणे, राजाचा तिच्या विरहातील शोक, दुसऱ्या अंकात राजा आणि पद्मावतीच्या विवाहाची गडबड, तिसऱ्या अंकात त्यामुळे व्यथित झालेली वासवदत्ता, चौथ्या अंकात राजा आणि विदूषकाच्या बोलण्यातून वासवदत्तेला कळलेले राजाचे तिच्यावरील प्रेम अशा विविध घटनांचा नंतर पाचव्या अंकात सुप्रसिद्ध स्वप्नप्रसंग येतो.
पद्मावती ला म्हणून भेटायला आलेला राजा झोपी जातो. त्याच वेळी तिथे वासवदत्ता येते. राजा स्वप्नातला तिला पाहात तिच्यासोबत बोलत असतो तर प्रत्यक्ष वासवदत्ता त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देते असा अत्यंत रमणीय प्रसंग नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे.
शेवटच्या अंकात राजाचा पराक्रम, यौगंधरायणाची योजना आणि गोड शेवट अशा रीतीने साकारत जाणारे हीच सुंदर नाटक म्हणजे भासांचा खऱ्या अर्थाने मास्टरपीस आहे.
जगाच्या इतिहासात अमर असे हे एकच नाटक जरी त्यांनी लिहिले असते तरी त्यांची गणना महाकवी मध्ये झाली असती इतके हे श्रेष्ठ नाटक आहे.
कु. मयूरी बबन देवाळकर
लोकमान्य टिळक महाविद्यालय,
वणी बी.ए. भाग २
दि. ०३. ०३. २०२२
