उरूभङ्गम्

संस्कृत साहित्यात अपवादाने सापडणारी गोष्ट म्हणजे शोकांतिका. करूण रसाचे कितीही वर्णन केले तरी शेवटी आनंदी करणे ही भारतीय भूमिका. मात्र संस्कृत साहित्यात शोकांतिका नाहीच असे कोणी म्हणू नये म्हणून महाकवी भास यांची रचना म्हणजे उरूभङ्गम् !
महाभारताचा अंतिम कथा भागावर आधारित या नाटिकेत दुर्योधनाला नायक म्हणून रंगविले आहे. मात्र असे करताना त्याला त्याच्या दुर्गुणातून मुक्ती देत उगाच सद्गुणांचा पुतळा म्हणून रंगवले नाही हे भासांचे वैशिष्ट्य.

नाटकाच्या आरंभी सूत्रधार येऊन युद्धामुळे झालेल्या भीषण संहाराचे वर्णन करून भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धाचे सूतोवाच करतो. श्रीकृष्ण, बलराम आणि पांडव यांच्यासमोर सुरू झालेल्या प्रत्यक्ष युद्धात भीम आणि दुर्योधन दोघेही रक्तबंबाळ होतात. एकदा तर भीम मूर्च्छित होतो. पुन्हा शुद्धीवर आल्यावर झालेल्या युद्धात तो दुर्योधनाच्या जांघेवर प्रहार करतो आणि दुर्योधन कोसळतो. गदा युद्धाच्या नियमात कमरेच्या खाली वार करायचा नसल्यामुळे बलराम प्रचंड संतापतात. कृष्ण आणि पांडव कसेबसे भीमाला तेथून दूर नेतात.

वेदनांनी तडफडणारा दुर्योधन बलरामांची प्रार्थना करतो. माझ्या शिष्याचा बदला मी घेईल असे म्हणत बलराम सगळ्यांच्या विनाशाला सज्ज होतात. पण माझी बाजू बरोबर आहे असे तुम्हाला वाटले यातच मला समाधान आहे असे म्हणत दुर्योधन त्यांना थांबवतो.

त्यानंतर आपल्या उरलेले एकमेव पुत्राच्या या अवस्थेने व्यथित झालेले धृतराष्ट्र आणि गांधारी विलाप करतात. आपल्यावर आणि आपल्या पुत्रांवर अशा प्रकारें दुर्दैवी वेळ आली म्हणून ते काल पुरुषालाच नावे ठेवतात. मात्र त्यांचे दुःख कमी व्हावे या दृष्टीने दुर्योधन त्यांना आपले पराक्रम ऐकवतो. मी किती यज्ञ केले? मी किती दान दिले? किती मोठ-मोठे लोक, राजे आणि संपूर्ण आर्यावर्तातून आलेल्या अकरा अक्षौहिणी सैन्याचे नायक माझ्या बाजूने उभे राहिले हीच माझी मिळकत आहे असे म्हणतो.

तेवढ्यात दुर्योधनाचा मित्र द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा समोर येतो. आलेल्या आणि प्रचंड चिडलेल्या अश्वत्थाम्या समोर मात्र दुर्योधन द्यूत, द्रौपदी वस्त्रहरण, पांडव वनवास अभिमन्यू हत्या अशा स्वतःच्या पापांचा पाढा वाचतो. या सगळ्या वाईट कर्मांची फळे शेवटी मला मिळत आहेत असे म्हणणारा पश्चात्तापदग्ध दुर्योधन भासांनी रंगविला आहे

मात्र चिडलेला अश्वत्थामा भीमाने या युद्धात केवळ तुझी मांडी नव्हे तर तुझा दर्प देखील नष्ट केला असे म्हणत त्याला हिनवतो. मी रात्रिरण करून सर्व पांडवांचा नायनाट करीन अशी प्रतिज्ञा करतो. मात्र त्याला अडवत अडवतच दुर्योधन प्राण सोडतो. स्वतःच्या जीवनाला धि:कार देत धृतराष्ट्र जंगलात निघून जातो. अश्वत्थामा अन्याय्य युद्धा करता जातो अशा विचित्र अवस्थेत हे नाटक संपते. दुर्योधना सारख्या गर्विष्ठ नायकाची हतबल अवस्था वर्णन करीत आणि त्याला शेवटी झालेल्या आपल्या पापाचा पश्चात्ताप दाखवणारी ही शोकांतिका संस्कृत साहित्याचे एक वेगळेच वैभव आहे.

कु. राखी भगीरथ महतो
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. अंतिम वर्ष
दि. २३.०२.२०२२

Author