जन्मापासून पायात नाही घातली चप्पल, तिसरीतून ड्रॉप आऊट. हलधर नाग या कवीवर पाच Ph.D जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात आपण कसं स्वतःला उमलऊ शकू याचा विचार आपण करायला हवा. अंध मूकबधिर अपंग यांनी हार न मानता अनेक विक्रम केले आहेत जे धडधाकट माणसालाही लाजवतील.काही ही संसाधने नसतांना अनेकांनी यशश्री खेचून आणली आहे. अनेकांनी रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला आहे. काही जणांना शाळेत जाण्यासाठी नदी पोहून पार करावी लागत होती. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शाळा उघडण्यासाठी फू्लें दांपत्याने अंगावर शेण झेलत लोकांचा रोष पत्करून त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
व्यक्तिमत्व तावून सलाखून निघालं की अपेक्षित यश अनेकांनी गाठलं आहे. आपल्याकडे एखादी गोष्ट नाही म्हणून आपण यश मिळवूच शकणार नाही ही भावना मनातून काढून टाकायला हवी. चप्पल नसणाऱ्यांनी पाय नसणाऱ्या कडे पाहावं.
जगात आपल्या दुःखापेक्षा अनेक पटीने अनेकांची दुःख आहेत तरी ते जगतात, केवळ जगत नाहीत तर परिस्थितीवर मात करून यश प्राप्त करतात याचा आदर्श आपण ठेवायला हवा.
आपलं भवताल ठरवतो आपण कोण होणार. केवळ अनुवंशिकतेची शिदोरी आयुष्य जगण्याला पुरेशी नसते त्यात आपण भर टाकायची असते. अनेकांना अनुवंशिकतेने तारले आहे पण अनेकांनी प्रयत्न करून स्वतःला सिद्ध केले आहे.
बहिणाबाई कोणत्याही शाळेत गेल्या नाहीत तरीही प्रचंड निरीक्षण शक्ती च्या आधारे त्यांनी जे काव्य रचले ते आज विद्यापीठाच्या पातळीवरही अभ्यासक्रमात आहे व एका विद्यापीठाला त्यांचे नावही दिले गेले आहे.
काही जण अनुभवाच्या आधारे स्वतःला सिद्ध करतात, काही पुस्तके वाचून यश संपादन करतात, काही पुस्तकांच्या पलीकडे जाऊन अनेक बाबींचं निरीक्षण करून स्वतः उमलवयाचा प्रयत्न करतात. काही जण अनेकांच्या प्रेरणेच्या पायवाटा यावरून मार्गक्रमण करतात आणि म्हणूनच ते आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करू शकतात.
काही काही माणसे म्हणजे मूल्यं असतात, काही माणसांच्या मूल्यांवरच एक पिढी शिकते. शेवटी कुणाकडून काय शिकायचे हा ज्याचा त्याचा प्रांत. कोणाच्यातरी कशाच्या तरी प्रेरणामुळे माणसं इच्छित साध्य करतात. प्रेरणा सुद्धा आपल्याला शिकवते, आपल्यातले सुक्त कोण ओळखते आणि स्वतःची मूर्ती स्वतः घडवायला कारणीभूत ठरते. एरिक फ्रॉम नावाच्या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणायचा. “A man should be known for what he is than what he has”.
भोवतालच्या परिस्थितीला दोष देण्यात अर्थ नसतो. आपल्यात काय विशेष आहे याचा शोध प्रथम घ्यायला हवा आपणच आपल्याला ओळखायला हवं.
आपणच आपल्यातून उमलायला हवं. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. मी कळणं आणि वळणं फार महत्त्वाचं असतं. माणसाजवळ काय आहे यापेक्षा माणूस कसा आहे हे महत्त्वाचं आहे. माणसाजवळच्या वस्तू कायम त्याच्याजवळ असत नाहीत पण माणूस त्याचाच स्वतःचाच असतो, माणूस पण त्याचंच असतं. माणूस कोण असणार हीच व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. माणसाच्या संपत्तीवरून तो ओळखला जात नाही तर त्याच्या वैचारिक संपत्तीवरून मृत्यूनंतरही तो ओळखला जातो.
आपल्याकडे काय आहे व शेजाऱ्याकडे काय आहे या स्पर्धेत माणसें सतत विचार करत असतात व समाधान न मिळाल्यामुळे कुठेच थांबत नाहीत. लोक काय म्हणतील असं लहानपणापासूनच मुलांनाही शिकवलं जातं, त्यामुळे आत्मसमान आणि आत्मविश्वास कमी व्हायला लागतो आणि मुलांमध्ये न्युनगंड तयार व्हायला लागतो. न्युनगंड म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट येत नाही असं वाटणं नव्हे तर आपल्याला असं वाटतं की इतरांना असं वाटतं की आपल्याला ती गोष्ट येत नाही. या सगळ्यातून पुन्हा नैराश्य चिंता अनेक मानसिक समस्या उभ्या राहतात.
पुस्तकांच्या पलीकडे जसे पाहायला हवं तसं प्रत्येकाने स्वतःच्या पलीकडेही पाहायला हवं. आपल्या दृष्टीकोनाचे क्षितिज आपल्यालाच विस्तारायला हवं. वैचारिक उंचीची त्रिज्या विस्तारली तरच सामंजस्याच्या क्षितिजाला गवसणी घालता येईल. स्वतःच्या कोशातून बाहेर पडलं तरच भवतालाची जाणीव होते. काही पुस्तकें व काही माणसें वाचायलाच हवीत, कारण ती प्रेरणा देतात, संघर्षात जगायला शिकवतात आणि संघर्ष माणसाला घडवतो. व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार करायचा असेल तर कोशातून बाहेर यायला हवं. एखाद्या व्यक्तीच्या कर्तुत्वानेच बदलाची प्रक्रिया सामूहिक व्हायला सुरुवात होते. काही पुस्तके काही माणसे आजच्या पिढीला माहीतच व्हायला हवीत. पुस्तकातलं तत्त्वज्ञान माणसात पाहायचं असतं.जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. एकाच व्यक्ती मध्ये व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे असतात. ते शोधायला हवेत. पुस्तके दृष्टिकोन देतात पण पुस्तकाच्या पलीकडे काही घटना काही व्यक्ती जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देतात.प्रत्येक वयाचं काही घेणं असतं तसं प्रत्येक वयाचे काही देणंही असतं.आदर्श व्यक्ती मधील मूल्यं इतर व्यक्तीमध्ये व आपल्यामध्ये शोधता आली पाहिजेत. आपल्यात ती काही प्रमाणात तरी रुजवायचा प्रयत्न करायला हवा. पुस्तकात आदर्श व्यक्तींची चरित्र असतात पण पुस्तके वाचन शिकवतात तर जीवने वाचन शिकवतात.
काहींचं अस्तित्व आपलं जीवन बदलून टाकतात. फुलं आपलं अस्तित्व असमांत भारून टाकण्यामुळे क्षणिक होईना वातावरण भरून टाकतात. समाजात होऊन गेलेल्या अनेक थोर माणसांच्या कर्तुत्वामुळेच ,अस्तित्वामुळेच आजही समाज त्या पाऊल वाटेवरून पुढे मार्गक्रमण करतो. पाउलखुणा चालण्यासाठी पायवाट निर्माण करतात आणि पायवाट असली की माणसे मरकटत नाहीत.
जाणीवपूर्वक काही मूल्यं शिकवावी लागतात. रुजवावी लागतात. संस्कार रुजले तरच मूल्य रूजतात. मूल्य पुस्तकातच असतात असे नाही वर्तनातही असतात व वर्तमानातही असतात. मूल्य रुजली तो रस्ते वर्तनात येतात शाळेत मूल्य शिकवली जातात वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिकवलं जातं पण एकादस नरेंद्र दाभोळकर व त्यांच्यासारखे ते प्रत्यक्ष जीवनात अमलात आणतात.मुलांनी चांगलं ऐकावं, चांगलं पहावं,चांगल्याचा आस्वाद घ्यायला शिकावं, रसग्रहण करायला शिकावं, सामाजिक उत्तरदायित्व शिकावं. निसर्गाचे देणं, नक्षत्राचे देणे, शरदाचे चांदणं, शब्दांच्या पलीकडे जायला व विचार करायला शिकावं हेच शिक्षण त्यांना तारेल.
आपण कोणासाठी तरी दखल पात्र आहोत व आपली मूर्ती कोणाच्यातरी हृदयात असावी हे वाटणं हीच जगण्याची शिदोरी असते. माणसात देव पाहता आला की मंदिर बंद असलं तरी चालतं. अशी माणसे जी आपल्याला साधेपणातून सुद्धा, साध्या राहण्यातून सुद्धा उच्च विचारसरणी देतात.
चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले संस्कार ,चांगलं वळण हे विद्यार्थ्यांचे पुढील आयुष्य मनोहर करतं. व्यक्तीच्या दिसण्यावर न जाता असण्यावर लक्ष द्यायला हवं. माणसाच्या कर्तुत्वावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची नोंद आपल्याला घेता यायला हवी माणसांच्या दिसण्यावरून आणि मनावरून बऱ्याचदा आपण पूर्वग्रही दूषितपणे पाहतो पण त्याच्या कर्तुत्वाकडे पाहून जर आपण काही शिकू शकलो तर ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला पूरक असतं.
माणसाला साठा करण्याची प्रवृत्ती असते. मला हे हवय, मला ते हवय आणि त्याला कुठे मर्यादाच नसते पण कमीत कमी संसाधनात व संघर्षात राहणाऱ्यांनीच आयुष्यात काहीतरी भरीव कामगिरी केली आहे, त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आपल्या भौतिक गरजा आपल्याला कमी करता यायला हव्यात. ज्ञानाने आपल्यासमोर अनेक भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत की आपण आळशी होत चाललो आहोत.
नैराश्याच्या गर्तेत अनेक जण आज आपले आयुष्य संपवीत आहेत पण आपल्याकडे जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याच्यावर जर प्रेम करायला माणसे शिकली तर व्यक्तिमत्त्वाचा कायापालट होतो.
असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे हलधर नाग.काही व्यक्तीकडे पुरस्कार चालून येतात. दील्लीला येण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे पुरस्कार पोस्टाने पाठवून द्या असे म्हणणारे हलधर नाग यांना पद्मश्रीनतर नुकतेच पद्म विभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. हलधर नाग यांनी अनेक संकटांचा सामना करत केवळ समाजात स्वतःला सिद्ध केले नाही तर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तिसरीतून ड्रॉप आऊट झालेल्या या कवीवर पाच जणांनी Ph.D केली आहे. 1950 मध्ये ओडिशाच्या बारगड जिल्ह्यात हलधर यांना जन्म एका गरीब कुटुंबात झाला. मोठ्या मुश्किलीने ते तिसऱ्या वर्गापर्यंत शिक्षण घेऊ शकले. हलधर 10 वर्षांचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले.
त्यानंतर त्यांनी शाळा सोडली कारण घराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. त्यांनी एका मिठाईच्या दुकानात दोन वर्षे भांडी विसरण्याचे काम केले. गावातील सरपंचाने त्यांना शाळेत स्वंयपाक्याचे काम दिले. तिथे 16 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी थोडे कर्ज घेऊन एक स्टेशनरी दुकान सुरु केले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या-पुस्तके आणि इतर साहित्याचे ते दुकान होते. याच काळात त्यांच्या मनात कविता जन्म घेत होती. त्यांना लिहिण्याची गोडी निर्माण झाली होती. त्यांची पहिली कविता ‘धोनो बरगच्च’ (जुने वडाचे झाड) 1990 मध्ये स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाली.
त्यानंतरही त्यांच्या काही कविता वृत्तपत्र, नियतकालिकातून प्रकाशित झाल्या. त्यांना त्यांच्या सर्व कविता आणि महाकाव्य तोंडपाठ आहे. त्यांच्या कवितेची कोणतीही ओळ सांगितली तर ते त्यापुढील कविता म्हणायला लागतात. रंग, देहयष्टीने सर्वसाधारण असलेले हलधर यांनी अजून पायात चप्पल किंवा बुट घातलेला नाही. त्यांचा पोषाखही सामान्यच आहे. धोतर आणि बंडी एवढे अंग झाकण्यासाठी पुरेसे आहे आणि तोच त्यांचा पेहराव आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नाग यांच्या कविता नाग म्हणतात, एका विधवेच्या मुलाचे आयुष्य अतिशय कठिण असते. प्रत्येकवेळेस नवे आव्हान आणि संकट तुमची वाट पाहात असते. त्यांच्या कविता आता देशातील कित्येक विद्यापीठांमध्ये शिकवल्या जात आहेत.संबलपूर विद्यापीठाने ‘हलधर ग्रंथावली-2’ मध्ये त्यांच्या प्रसिद्ध कविता संग्रहित केल्या आहेत. त्यांनी प्रामुख्याने, समाज, धर्म, कला, संस्कृती आणि निसर्गावर कविता केल्या आहेत.
66 वर्षांचे हलधर नाग यांनी त्यांचे साहित्य कोसली भोषेत लिहिले आहे. त्यांच्या अनेक कविता आणि 20 महाकाव्य आहेत.दिव्याखाली अभ्यास करून यशश्री खेचून आणणाऱ्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आज पायवाट निर्माण करणाऱ्यांच्या गावीही नसते की आपण प्रेरणेची पायवाट निर्माण करत आहोत.विद्यार्थ्यांनी सुद्धा काही गोष्टीचा हट्ट न धरता आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये कसे शिकता येईल याचा विचार करायला हवा. सुखावून अभ्यास होत नाही तर ताऊनसुलाखून अभ्यास होतो. महात्मा गांधींनी म्हटलं होतं. My life is my message. यांच्या प्रत्येक कृतीतून समाजाला संदेश मिळाला. हलधर नाग यांच्यापासून सुद्धा आम्हाला बरेच शिकण्यासारखा आहे. व्यक्तीमधील सगळ्याच बाबींचं अनुकरण आपण करू शकत नाही पण प्रत्येक व्यक्तिमत्त्वामधील काही काही बाबींचं अनुकरण जर केलं तर आपलं व्यक्तिमत्त्व निश्चित समृद्ध होतं.
