प्रेरणेची पालवी

देवाला अनेक ठिकाणी जायला जमत नाही म्हणून काही चांगली माणसे पृथ्वीतलावर कदाचित पाठवले असावीत.काही माणसांचे निष्पाप कर्म पाहून हाच विचार मनात येतो. प्रेरणेची पायवाट अजून काय असते?



देवाला अनेक ठिकाणी जायला जमत नाही म्हणून काही चांगली माणसे पृथ्वीतलावर कदाचित पाठवले असावीत.काही माणसांचे निष्पाप कर्म पाहून हाच विचार मनात येतो. प्रेरणेची पायवाट अजून काय असते?

एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात…

मंगलाताईंनी प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ‘पालवी’ या संस्थेची स्थापना केली ही संस्था एड्सग्रस्त अनाथ मुलांचा सांभाळ करते. संस्थेचा असा विश्वास आहे की जन्माला आलेली सर्व बालके समान आहेत आणि आरोग्य, शिक्षण, सुरक्षित आणि कलंकमुक्त वातावरणासह प्रेमळ, आनंदाने भरलेले बालपण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.

‘पालवी’मध्ये एड्सग्रस्त बालकांना सांभाळले जाते असे समजल्यावर अशा मुलांचा ‘पालवी’मध्ये ओघ वाढला. मग जवळच भाड्याने जागा घेतली पण मालकाला समजल्यावर त्याने त्या मुलांसह तेथे राहण्यास मज्जाव केला. मग घरातून पाणी नेऊन मुलांचा सांभाळ सुरू केला. येणारी मुले जखमांनी भरलेली, कुपोषित असत. डॉक्टरांचेही सहकार्य मिळायचे नाही. मंगलताई स्वत: ड्रेसिंग आणि औषधोपचार करत असत. त्यांनी मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दूध मिळावे म्हणून गोशाळा सुरू केली. मुले निरोगी रहावी म्हणून योगोपचार सुरू केले. या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही म्हटल्यावर शासनाकडे असंख्य हेलपाटे घालून स्वत:ची स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर शाळा सुरू केली.

प्रभा हिरा प्रतिष्ठान मार्फत आठ प्रकल्प राबवले जातात पालवी संगोपन प्रकल्प – ‘पालवी’ हा एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ बालकांचा हा संगोपन प्रकल्प आहे. समाजाच्या आत्यंतिक गरजेतून एचआयव्ही बाधित बालकांसाठी महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प पंढरपूर येथे 2001 साली सुरू झाला.या प्रकल्पाला दोन बालकांपासून सुरुवात झाली, ती आज 150 बाधितांपर्यंत पोचली आहे.

पालवी ज्ञानमंदिर प्रकल्प – पालवी प्रकल्पामध्ये बालकांना अंगणवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. काही वर्षांपासून इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे.

गोशाळा प्रकल्प – बालकांच्या सकस आहारासाठी गोशाळा सुरू केली असून त्यात सध्या आठ गायी आहेत.

स्वयंसहायता प्रकल्प – या प्रकल्पांतर्गत संस्थेतील मुलांना प्रशिक्षित व्यक्तींकडून प्रशिक्षण देऊन टाकाऊतून टिकाऊ वस्तू, साड्यांची पायपुसणी, कॅरीबॅग्स, विविध पर्सेस बनवल्या जातात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग, कागद काम शिकवले जाते. आतापर्यंत चारशेपेक्षा जास्त महिलांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हिरकणी प्रकल्प – या प्रकल्पामध्ये अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो.’गरज त्याला आसरा’ या पद्धतीने परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. या सुविधेचा आजवर 105 व्यक्तींना लाभ झाला आहे. सध्या वीस महिला निवासी आहेत.

पालवी परिसस्पर्श – समाजामधील कचरावेचक लहान मुलं सुसंस्कारित नागरिक व्हावी म्हणून त्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी, ही बालके व्यसनांमध्ये अडकू नयेत यासाठी पालवीचे काम सुरू आहे. आजवर दोनशेपेक्षा जास्त मुलांनी याचा लाभ घेतला आहे, तसेच सध्या पन्नास मुले याचा लाभ घेत आहेत.

पालवी अंकुर – पुणे शाखा – वेश्यावस्तीतील बालकांकरता संस्कार वर्ग, अनाथ, गरजू महिलांकरता विविध प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. तसेच, सरकारी रुग्णालयांमध्ये पेशंट भरती झाल्यानंतर तो जर अनाथ असेल तर त्याची व्यवस्था एखाद्या संस्थेमध्ये करणे, त्याची सर्व व्यवस्था होईपर्यंत त्याला राहण्याकरता पालवीमार्फत पुणे येथील अंकुर शाखेमध्ये ठेवले जाते. त्यांची तेथे चार दिवस ते पंधरा दिवस व्यवस्था करून त्यांना योग्य त्या संस्थेमध्ये पोचवले जाते.

पालवी श्रावण सेवा – पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्री वंचितांचे प्रमाण वाढते आहे. हे वंचित रस्त्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्याकडे अन्नाकरता याचना करत असतात. मंगलताईनी पुढाकार घेऊन रेल्वे स्टेशनवर बसणाऱ्या याचकांना एआरटी सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे रोज सकस आहार, गरम खिचडी वाटप सुरू केले आहे. सध्या सरासरी 250 लोकांना जेवण दिले जाते. सर्व लेकरांनी एकत्र बसून गुण्यागोविंदाने सोबत भोजन करावे हे मंगलताईंचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न ‘श्री नैवेद्यम’ ह्या भोजनगृहाच्या उभारणीने वर्षभरापूर्वी साकार झाले.

ताईंना वाचनाची प्रचंड आवड आहे. ताई ‘पुस्तकांच्या खोलीत’ रहातात असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी वाचनाच्या आवडीमुळे चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वी महिलांनी महिलांसाठी चालवलेले ‘शब्द-शिल्प’ वाचनालय सुरू केले. या वाचनालयात 9000 पुस्तकांचा खजिना आहे, तर ताईंची वैयक्तिक ग्रंथसंपदा एक हजाराच्या आसपास आहे.पं

ताईंना आतापर्यंत तीनशेहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना चाळीस वर्षांहून अधिक काळ केलेल्या समाजसेवेसाठी अलीकडेच ग्लोबल महासभेने ‘जैन सशक्त महिला पुरस्कार’ दिला आहे.

बाधित बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या ताईंच्या प्रचंड योगदानामध्ये त्यांची मुलगी डिंपल, जावई, सून, मुलगा व आता तिसरी पिढीदेखील सक्रिय आहे. या बरोबरीने देणगीदारांची साथ देखील आहे. ‘मातृवन’ हा 500 बालकांसाठी निवासी इमारतीचा प्रकल्प निर्माणाधी आहे.
पालवी प्रकल्प, कोर्टी रोड, पंढरपूर

Author