सुटका

जेट एअर वेजच्या विमानाने मुंबईतून दुबईच्या दिशेने झेप घेतली. शबानाचे मन त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आरिफकडे धावले. स्वतंत्र संसाराची सोनेरी स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला होता. शबानाचे आरिफशी लग्न होऊन चार वर्षांचा काळ लोटला होता. लग्नानंतर दुसऱ्या वर्षात आरिफला एका कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यामुळे तो तिकडे गेला. कोकणातल्या गावी सासू, सासरे आणि धाकटा दीर यांच्या सोबत शबानाला राहावे लागले. सासूचे आजारपण सततचे असल्यामुळे त्या घराची जबाबदारी शबानावर पडली. आरिफ वर्षातून एकदा एक महिन्याच्या सुटीवर गावी यायचा. तेवढ्या एकच महिन्यापुरते दोघांचे सहजीवन असे. पुढे दिराचे लग्न होऊन जाऊ घरात आली. सासूचा संसार चालवत असल्याची खंत शबानाच्या मनात सलत असे. जावेचे घरात आगमन झाल्यावर तिथून सुटका होण्याची तिची आशा पालवली. तेथून घेऊन जाण्याचा लकडा तिने आरिफकडे सुरू केला. सगळ्यांच्या विचारांचे एकमत होऊन तिची पाठवणी आरिफकडे करण्याचे ठरले. दिराने तिला मुंबईच्या विमानतळावर सोडले. आरिफ तिला घेण्यासाठी विमानतळावर येणार होता, तरीपण दक्षता म्हणून त्याच्या घराचा व कंपनीला पत्ता तिने एका कागदावर लिहून घेतला होता.दुबईच्या एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचा गेटजवळ तिने थांबावे असे तिला बजावून ठेवले होते. आखाती देशातील वैभव, झगमगाट याविषयी तिने आरिफकडून खूप ऐकले होते. कोकणातल्या लहान गावातून तिकडे जाण्याची भुरळ तिच्या मनाला पडली. नवऱ्यासोबत राहून ती आता जीवनाचा भरपूर आनंद लुटणार होती.



जेट एअर वेजच्या विमानाने मुंबईतून दुबईच्या दिशेने झेप घेतली. शबानाचे मन त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आरिफकडे धावले. स्वतंत्र संसाराची सोनेरी स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला होता. शबानाचे आरिफशी लग्न होऊन चार वर्षांचा काळ लोटला होता. लग्नानंतर दुसऱ्या वर्षात आरिफला एका कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यामुळे तो तिकडे गेला. कोकणातल्या गावी सासू, सासरे आणि धाकटा दीर यांच्या सोबत शबानाला राहावे लागले. सासूचे आजारपण सततचे असल्यामुळे त्या घराची जबाबदारी शबानावर पडली. आरिफ वर्षातून एकदा एक महिन्याच्या सुटीवर गावी यायचा. तेवढ्या एकच महिन्यापुरते दोघांचे सहजीवन असे. पुढे दिराचे लग्न होऊन जाऊ घरात आली. सासूचा संसार चालवत असल्याची खंत शबानाच्या मनात सलत असे. जावेचे घरात आगमन झाल्यावर तिथून सुटका होण्याची तिची आशा पालवली. तेथून घेऊन जाण्याचा लकडा तिने आरिफकडे सुरू केला. सगळ्यांच्या विचारांचे एकमत होऊन तिची पाठवणी आरिफकडे करण्याचे ठरले. दिराने तिला मुंबईच्या विमानतळावर सोडले. आरिफ तिला घेण्यासाठी विमानतळावर येणार होता, तरीपण दक्षता म्हणून त्याच्या घराचा व कंपनीला पत्ता तिने एका कागदावर लिहून घेतला होता.दुबईच्या एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचा गेटजवळ तिने थांबावे असे तिला बजावून ठेवले होते. आखाती देशातील वैभव, झगमगाट याविषयी तिने आरिफकडून खूप ऐकले होते. कोकणातल्या लहान गावातून तिकडे जाण्याची भुरळ तिच्या मनाला पडली. नवऱ्यासोबत राहून ती आता जीवनाचा भरपूर आनंद लुटणार होती.

इतर प्रवाशांचे अनुकरण करीत शबाना एअरपोर्टमधून बाहेर पडली. गेटमधून बाहेर आल्या आल्या तेथेच जरा बाजूला होऊन थांबली व आरिफला शोधू लागली. त्या परक्या भूमीवर एका अनामिक भीतीचे दडपण तिच्यावर आले. पाच, दहा, पंधरा मिनिटे एकामागून एक जाऊ लागली. आरिफचा पत्ताच नव्हता. मग मात्र ती घाबरली. पाय लटपटू लागले. पोटाता भीतीचा गोळा उठला, काय करावे हे तिला समजेना. रोमिंग नसलेला तिचा मोबाईल बंद पडला होता. तिकडचे चलनही तिच्याजवळ नव्हते. हताश होऊन मटकन बॅगेवर बसली. रडू लपवण्यासाठी गुडघ्यात मान घालून बसली.

थोड्याच वेळात तिच्या खांद्याला एक स्पर्श झाला. उतावीळपणे तिने वर पाहिले. तिच्यासमोर एक जोडपे होते आणि त्यातील स्त्री तिच्या खांद्याला स्पर्श करत होती. तिच्याशी हिंदीत बोलत त्या बाईने तिची चौकशी केली. शबानाला किंचित दिलासा मिळाला. तिने काय झाले आहे हे सांगितले. येईल तुझा नवरा इतक्यात काही अडचण आली असेल. आम्ही थोडावेळ आहोत अजून येथे. तुला मदत करू. काळजी करू नकोस.” असे तिला त्या स्त्रीने सांगितले व ते जोडपे थोड्या अंतरावर जाऊन थांबले. थोड्यावेळाने तिच्याजवळ येऊन त्या पुरुषाने तिचा पत्ता विचारला. तिने पर्समधून पत्ता लिहिलेला कागद त्याला दिला. तो वाचून तो म्हणाला की, ते दोघे टॅक्सीने तिला त्या पत्त्यावर सोडू शकतील. तेथे गेल्यावर आरिफकडून पैसे घेऊन त्या दोघांना तिने द्यायला हवेत. या गोष्टीला तयारी दाखवावी की नाही? आरिफची वाट अजून किती वेळ बघावी? या प्रश्नांनी तिची घालमेल झाली. तेथे थांबून आता अर्धा तास उलटून गेला होता. थोड्यावेळाने ती स्त्री तिला म्हणाली की आता आणखी काही वेळ आम्ही थांबू शकणार नाही काय, लवकरच ते तिने ठरवावे. मदतीची असलेली ही एकमेव संधी नाकारली तर पुढे काय होईल याची कल्पना शबानाला करवेना. त्या दोलायमान मनस्थितीत ती त्यांच्यासह निघाली. दोघांनी तिचे सामान उचलले. स्वतःजवळचे पाणी पिण्यास दिले. घाबरू नकोस असे म्हणत त्या स्त्रीने तिच्या मस्तकावरून मायेने हात फिरवला. गुदरलेल्या संकटातून आपण बाहेर पडत आहोत या जाणिवेने ती जरा आश्वस्त झाली. ते दोघे तिच्यासाठी प्रेषित होते.

कंपनीतील ड्यूटी संपवून आरिफ घाईघाईने निघाला. आजच नेमकी ड्यूटी जरा लांबली होती. शबाना येऊन पोहोचली व आपण तिला दिसलो नाही तर तिची काय अवस्था होईल. अगदी घाबरगुंडी उडेल तिची. मग मला पाहिल्यावर तिचा तो भेदरलेला चेहरा कसा उजळेल या कल्पनेने आरिफला हसू आले. टॅक्सी कधी एकदा विमानतळावर पोहोचते असे त्याला झाले होते. तेवढ्यात टॅक्सीचा वेग कमी कमी होत ती बंद झाली. त्याने पाहिले तो ट्रॅफिक जॅम झालेली. भली मोठी वाहनांची रांग लागलेली होती. पुढच्या चौकात एक भीषण अपघात झाल्यामुळे रहदारीची कोंडी झाली. आधीच उशीर झालेला, त्यात आता ही एक अजून भर पडली. तो स्वतःशी चरफडला. शबानाला मोबाईलवरून सांगावे या हेतूने त्याने मोबाईल हातात घेतला, मग त्याच्या लक्षात आले की तेथे आल्यावर तिचा मोबाईल बंद झालेला असणार. थोड्याच वेळेपूर्वी तिच्या घाबरल्याच्या विचाराने त्याला हसू आले होते, आता मात्र त्याच्या तोंडचे पाणी पळाले. लवकर तेथून निघण्याचा काही मार्ग नव्हता. अर्ध्यापाऊण तासाने वाहतूक मंदपणे सुरू झाली. तो विमानतळावर येईपर्यंत बराच उशीर झाला होता. एक्झिटजवळ तो जवळपास धावतच आला. शबाना त्याला दिसली नाही. वाट पाहून कंटाळली असेल व इथेच कुठेतरी आसपास असेल असे वाटून ते तेथेच उभा राहून तिची वाट पाहू लागला. शबना अजुन कशी आली नाही या भीतीने त्याच्या काळजाचा ठोका चुकला.

विमानाच्या लँडिंगची खात्री त्याने करून घेतली. मग कुठे थांबली ती? दुसरीकडे कुठे थांबली असेल असे वाटून त्याने तेथे आजूबाजूस येरझाऱ्या घातल्या पण… शवाना नव्हती, कुठेच नव्हती. त्याने आलेल्या प्रवाशांची यादी बघण्याची विनंती तेथील अधिकाऱ्यांना केली. यावरून ती तेथे पोहोचल्याची खबर त्याला मिळाली. मग ती गेली तरी कुठे? त्याचे मन आकांत करू लागले. त्याने मित्रांना फोन केला, ते दोघेही लगेच धावतपळत आले. आरिफाला धीर देऊ लागले. विमान तळावरील पोलिसांकडे फिर्याद नोंदवण्याचा सल्ला त्याला तेथील अधिकाऱ्यांनी दिला, त्याची आवश्यक ती मदतनही केली. आरिफ पुतळ्यासारखा जडशील झाला. मित्रांनी त्याला बळेच आपल्याबरोबर नेले.

शबाना टॅक्सीमध्ये विमनस्कपणे डोळे बंद करून बसली होती. आपण कुठे चाललो आहोत याचे तिला भान नव्हते. ज्यांच्याबरोबर ती चालली होती त्यांचे नावही विचारण्याचे तिला सुचले नव्हते. बंद डोळ्यांसमोर तिचे गाव, तिचे घर, आरिफ आळीपाळीने येत होते. आरिफविषयीची काळजी तिचे मन कुरतडू लागली. उगीच मी त्याच्याकडे हट्ट धरला का? तो का आला नाही? त्याचे काही बरेवाईट तर झाले नसेल ना..? की…. त्याला माझे येणेच नको होते. दुसरीकडे तर कुठे तो गुंतला नसेल ना?
अशा अनेक शंकाकुशंकाच्या आवर्तात तिचे मन भोवंडू लागले. टॅक्सी थांबल्यामुळे ती भानावर आली. एका मोठ्या सुंदर हवेलीसमोर टॅक्सी थांबली होती. या हवेलीचा व आरिफचा काय संबंध असे तिला वाटले. तिच्या मनातली पाल चुकचुकली.

“आपण येथे कुठे आलो आहोत आपाजान? कागदावरचा पत्ता हाच आहे का?” शबानानाने त्या स्त्रीला विचारले.

“घाबरू नकोस बंटी. तुझा नवरा इथं रहात नाही; पण त्याला आपण इथंच बोलावून घेऊ. अगं त्याच्या कंपनीमालकाची आहे ही हवेली. खूप दयाळू आहेत. ये आत ये.”

हाताला धरून तिने शबानाला आत नेले. तो मोठा दरवाजा बंद झाला. त्या दाराआड शबाना आणि तिचे नशीबही बंदिस्त होणार होते याची तिला सुतराम कल्पना नव्हती.

हवेलीच्या मागच्या बाजूला काही लहान खोल्या बांधल्या होत्या. त्यापैकी एका खोलीत शबानाला नेण्यात आले. तिला तेथे थांबण्यास सांगून ते जोडपे निघून गेले. शबानाच्या सर्व संवेदना आता बधिर झाल्या होत्या. साध्याशा पलंगावर ती सुन्नपणे बसून राहिली. बऱ्याच वेळाने तिथे आणखी दोघीजणी आल्या. शबानाची हालत त्यांच्या लक्षात आली. ती खोली त्या दोघींची होती. त्याही भारतातून तेथे आलेल्या होत्या. घरकामासाठी त्यांची त्या हवेलीत राहण्याची सोय केली होती. त्या दोघी बंगाली मुस्लिम होत्या, शबानाजवळ बसून त्यांनी तिची विचारपूस केली व धीर देण्याचा निष्फळ प्रयत्न केला. दिवसभराच्या कष्टांमुळे झोप लागली, शबाना रात्रभर तशीच बसून होती. ज्याच्या येण्याचे आश्वसन तिला दिले होते तो आरिफ आलाच नाही.

दुसरा दिवस उजाडला. आरिफच्या प्रतीक्षेत तिचे प्राण कंठाशी आले. सोबत आलेल्या जोडप्यापैकी एक जणही तिला परत दिसला नाही. ताण असह्य होऊन तिचे भान हरपले. अश्रूंची वाहण्याची क्षमता संपली.

शबानाला हवेलीतील एका मोठ्या दालनात नेण्यात आले. तेथे वृद्धत्वाकडे झुकलेली व दुखण्यांमुळे पलंगाला खिळलेली यास्मिन होती. शबानाचा निःस्तेज चेहरा, सुजलेले व मदतीच्या याचनेने तुडुंब भरलेले डोळे यास्मिनच्या अनुभवी दृष्टीला बरेच काही सांगून गेले. तिच्या मनात करुणा जागी झाली. तिने शबानाला जवळ बसवून घेतले. वडीलधारी व्यक्ती पाहून शबानाने आपले मन तिच्याजवळ मोकळे केले व तिचे पाय धरले. यास्मिन ही त्या हवेलीतील ज्येष्ठ स्त्री होती. त्या ज्येष्ठतेनुसार तिला योग्य तो आदर मिळत होता. तरी ती एक स्त्री होती. पुरुषांच्या व्यवहारात प्रश्न करण्याचा अधिकार तिला नव्हता. तिच्या मर्यादा ती जाणून होती. शबानाला ती म्हणाली, “बेटी, आता घाबरू नकोस. तुझ्या दुर्दैवाने तुला येथे आणले आहे. का आणि कसे हे मलाही माहीत नाही. ते मी बदलूही शकत नाही; पण माझ्या शुश्रूषेसाठी तू माझ्याजवळ राहशील असे मी करू शकते.बाकी कोणताही त्रास तुला होणार नाही याची काळजी मी घेईन. पुढे काय करता येईल ते बघू. आता मात्र तुला थोडे तरी सावरायला हवे आहे आणि हो, मला येथे सगळे खालाजान म्हणतात.”

तिचे बोलणे ऐकून शबाना थोडी शांत झाली. अनपेक्षितपणे कोसळलेला प्रसंग निमूटपणे स्वीकारण्याला दुसरा पर्याय नाही हे तिने समजून घेतले. त्यातल्याा त्यात खालाजानच्या दिमतीत रहाणे हे तिच्यासाठी सुरक्षित असणार होते हे ही तिच्या लक्षात आले. तिची सेवा हीच आपली नोकरी असे समजून शबाना कळसूत्री बाहुलीप्रमाणे वापरू लागली. एके दिवशी यास्मिनने तिला मेंदी काढता येते का असे विचारले. मेंदी काढण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले नसले तरी बऱ्यापैकी ती काढू शकेल असे उत्तर शबानाने दिल्यावर ती म्हणाली, “आपल्या अनेक उद्याव्यवसायापैकी ‘डेझर्ट कॅम्प’ हादेखील एक आहे. तेथे येणाऱ्या प्रवासी स्त्रियांच्या ह्यतावर मेंदी काढून दिली जाते. नेहमीची मुलगी चार-पाच दिवस येणार नाही. तुला जमत असेल तर तू तेथे त्या कामासाठी जावेस असे मला वाटते. बघ, तुझे नशीब थोडे तरी चांगले असेल तर हिंदुस्थानातील कुणीतरी तुला भेटेल ही. पुढे काय करायचे ते तुझे तू ठरव. माझ्याकडून काही दगा होणार नाही याची खात्री बाळग.” बोलताना खालाजानचा आवाज सूचक होता. बाहेर पडण्याची एक संधी सामोरी आली होती. सुटकेची लढाई शबानाला एकटीलाच लढायची होती. अस्तित्व धोक्यात आल्यावर मनुष्य काहीही करायला तयार होतो. परिस्थितीला शरणागत होण्याऐवजी काही प्रयत्न तरी करू या विचाराने शबाना तयार झाली. खालाजानचे उपकार एवढे मोठे होते की, तिचे आभार कसे मानावेत हे तिला कळेना.

ठरल्याप्रमाणे शवाना संध्याकाळी कॅम्पवर गेली. डेझर्ट सफारीवर येणाऱ्या प्रवाशांसाठी तिथे विविध खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम होते. छोटे-छोटे तंबू उभे केले होते. त्यापैकी एकात शबाना मेंदीचे साहित्य घेऊन बसली होती. चार-पाच दिवस रोज संध्याकाळी तिथे येण्याची संधी तिला मिळाली होती. संधीचे सोने व्हावे अशी परमेश्वराजवळ ती मनोमन याचना करीत होती. त्या दिवशी काही स्त्रियांनी तिच्याकडून मेंदी काढून घेतले. पण त्यांच्यापैकी कुणी मदत करू शकेल असे तिला वाटले नाही.
ती निराश झाली व रात्री परत गेल्यावर खालाजानला भेटली. “अगदी पोरसवदा तरुण स्त्रीला मदत मागण्याऐवजी एखाद्या प्रौढ स्त्रीला मदत मागून बघ, कदाचित काहीतरी प्रयत्न ती करेल.” असा सल्ला खालाजानने तिला दिला.

दुसरी व तिसरी संध्याकाळही तिच्या पदरी निराशा टाकून गेली. चौथ्या संध्याकाळी मात्र तिची आशा पालवली. तिच्या समोर एक चाळिशीतील प्रौढा आली. तिने नेसलेली साडी व कपाळावर लावलेली ठसठशीत टिकली यावरून ती भारतीय हिंदू आहे हे शबानाला समजले. त्या स्त्रीने डावा हात शबानाच्या पुढे केला. मेंदी काढण्यास लागणाऱ्या दहा-पंधरा मिनिटांत काय व कसे बोलावे हे शबानाला सूचेना. ती निमूटपणे मेंदी काढत राहिली तरी डोक्यात विचारचक्र वेगाने फिरत होते. आपण काही बोलायला जावे आणि ते विचित्र वाटून जर या बाईने बाहेर पडून काही तक्रार केली तर आपले संकट आणखीनच वाढेल अशी भीती वाटून शबाना गप्प होती. मेंदीने तळहात भरत आला आणि अचानकपणे तिला काहीतरी सुचले. आता पुढच्या एका मिनिटात ही स्त्री बाहेर जाईल आणि आपल्या आशा मावळतील तेव्हा झटपट निर्णय घेऊन शबानाने तळहाताच्या कोपऱ्यात ‘हेल्प’ अक्षरे काढली. त्यांच्याखाली दोन आडव्या रेषा काढल्या. मेंदी काढून झाली तशी ती स्त्री उठून गेली.

ती एक गुजराथी स्त्री होती. आभा. आभा आपला पती, समीरसह फिरण्यासाठी आली होती. समीर मोदी पोलीसखात्यात ए.सी.पी. या पदावर होता. कॅम्पवरून हॉटेलवर परतल्यावर आभाने मेंदीचा हात धुतला व कौतुकाने मेंदीची नक्षी न्याहाळू लागली. नक्षीकाम सुंदरच होते; पण कोपऱ्यातल्या दोन आडव्या रेषा विसंगत दिसत होत्या. त्या पाहत असतानाच त्यांच्या वरच्या बाजूला असलेल्या अक्षरांकडे तिचे लक्ष गेले. ती चमकली. लगबगीने समीरजवळ जाऊन तिने तो हात पुढे केला. ती म्हणाली, “हे पाहा, या मेंदीमध्ये त्या मेंदी काढणारीने हेल्प असे लिहिले आहे. काय विचित्रपणा हा!” “काही तरी भलतीच गडबड दिसते आहे. मेंदी काढताना काही वेगळेपण त्या बाईमध्ये तुला जाणवले का? नीट आठवून बघ.” आभा विचारपूर्वक सांगू लागली, “हो, मला ती थोडीशी वेगळीच भासली. मेंदी काढण्याचा सराईतपणा नव्हता तिच्यात आणि क्लाएंटशी बोलले जरी नाही, तरी निदान हसण्याचा शिष्टाचारही तिने पाळला नाही. तेव्हा मला ते थोडे विचित्र वाटले; पण आता असे वाटते आहे की ती कोणत्यातरी विचारात गर्क असावी. तिच्या चेहऱ्यावरचे भावही नॉर्मल नव्हते असे आता आठवते आहे. ‘

“आभा, ती नक्कीच कोणत्यातरी संकटात आहे आणि तिनं तुला मदत मागितली आहे. तुलाच मदत मागितली याचा अर्थ ती येथली नाही, नक्कीच भारतीय असणार. आपल्याला काही तरी केलं पाहिजे आभा. आणि तेही सावधपणे व कायदेशीर मार्गानं.”

समीरचे पोलिसी डोके वेगाने काम करू लागले. थोड्याच वेळात त्याने काही निर्णय निश्चित केले व दुसऱ्या दिवशी सकाळी त्याप्रमाणे करण्याचे ठरविले. त्यांचा तेथील मुक्काम अद्याप दोन दिवसांचा होता. त्या काळात आपल्या हातून काही चांगले करता आले तर करावे असे त्याने ठरवले. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा पुढचा सर्व कार्यक्रम त्याने रद्द केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे त्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये गेले. स्वतःचे ओळखपत्र दाखवत समीरने तेथील अधिकाऱ्यांशी बोलण्याची परवानगी मिळवली. आभाला काल संध्याकाळी आलेला अनुभव सविस्तरपणे त्याने त्या अधिकाऱ्यास सांगितला. प्रसंगाचे गांभीर्य त्याच्याही लक्षात आले.
त्याने फिर्यादीची नोंद केली व सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. एखाद्या स्त्रीच्या हरवल्याची केस दाखल झाली आहे का याचा तपास सुरू केला. त्यातून शबानाची केस दाखल झाली असल्याचे पुढे आले. कदाचित मेंदी काढणारी शबाना असू शकते असे त्यांना वाटले. त्यांनी मिळून पुढील प्लॅन तयार केला.

प्लॅननुसार त्या संध्याकाळी साध्या वेशातील काही पोलीस, समीर व आभा पुन्हा त्या कॅम्पवर गेले.

शबानाची ती कॅम्पवरची शेवटचीच संध्याकाळ होती. उद्यापासून नेहमीची बाई कामावर येणार होती. शबानाला अतिशय हुरहुर लागली. कालच्या त्या बाईने मेंदीकडे नीट पाहिले असेल का? त्यावर काही विचार केला असेल की दुर्लक्ष केले असेल? अशा विचारात असताना आभा आत आली. आपला उजवा हात शबानापुढे धरून बसली. काही क्षण दोघी एकमेकींकडे नुसत्याच बघत राहिल्या. हळूच आभाने ‘शबाना’ असा शब्द प्रश्नार्थक उच्चारला, ते ऐकताच शबानाचे हृदय आनंदातिशयाने उचंबळून आले. आभाचे दोन्ही हात गच्च पकडून ती हेल्प… प्लीज….. हेल्प असे म्हणत राहिली. आभाने हात सोडवून घेतले. तिच्या खांद्यावर थोपटून ती बाहेर पडली. बाहेर जवळ अभ्या असलेल्या समीरला तिने ती शबानाच असल्याचे सांगितले. पोलिसांच्या सांगण्यानुसार आभा तिला बाहेर घेऊन आली. पुढील घटना वेगाने घडत गेल्या. एक पोलीस त्या तिघांना घेऊन तेथून निघाला. बाकीचे पुढील चौकशीसाठी तेथे थांबले. पोलिसांनी आरिफला फोन करून शबाना सापडल्याचे व तातडीने पालीस स्टेशनमध्ये येण्याविषयी सांगितले. शबानाच्या काळजीत अर्धमेला झालेला आरिफ संजीवनी मिळाल्याप्रमाणे तरतरीत झाला. शबाना आता भेटणार याची खात्री झाल्यामुळे आधी त्याने ती बातमी गावाकडे कळवली. तिकडेही हलकल्लोळ झालेला होता. तो पोलीस स्टेशनला पोहोचला. तिथे समीर, आभा, शबाना व त्याची जबानी घेण्यात आली. कायदेशीर कारवाई होईल, गरज पडल्यास कॉन्स्युलेटची मदतही घेण्यात येईल, असे सांगून शबानाला सोबत घेऊन जाण्यास पोलिस अधिकाऱ्याने परवानगी दिली. आपली सुटका झाली आहे, अरिफ आपल्याला मिळाला आहे ही सुखकर जाणीव बधीर मेंदूतून हृदयापर्यंत पोहचायला शबानाला थोडा वेळा लागला. मग मात्र आनंदाने मला झंकारू लागले आणि तो आनंद डोळ्यातील आटलेल्या अश्रुंना पाझरवू लागला. कुणाचीही तमा न बाळगता ती दोघे एकमेकांच्या मिठीत शिरली. आभाचेही डोळे नकळत पाणावले.

आरिफ व शबानाला घेऊन समीर त्याच्या हॉटेलवर आला. काहीतरी मोठे पुण्यकार्य हातून घडल्याचे समाधान समीर व आभाच्या चेहऱ्यावर झळकत होते. शबानाने हवेलीतील यास्मिन खालाविषयी सांगितले व तिनेच बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला त्याबद्दल कातडीचे जोडे करून तिच्या पायात घातले तरी तिचे उपकार फिटणार नाहीत अशी भावना व्यक्त केली. समीर पोलीस अधिकारी असल्याचे समजल्यावर आरिफ म्हणाला, “साहेब, तुमच्यामुळे आम्हाला नवा जन्म मिळाला आहे. परमेश्वर तुमच्या रूपात आमच्यासाठी एवढ्या दूरवर आला. काय करू म्हणजे तुमचे उपकार फिटतील.”
“काही करायची गरज नाही. हे उपकार नाहीत, तर माझे कामच आहे. ही तर साधी माणुसकी आहे.”
आभाने शबानाला विचारले, “माझ्याकडे मदत मागण्याची कल्पकता तर तू खूपच छान दाखवलीस. पण एक सांग मलाच मदत मागावी असं तुला का वाटलं? मी भारतीय आहे म्हणून?”

“मॅडम, तुमची साडी व कुंकू पाहून हे तर मला समजलंच की तुम्ही भारतीय आहात आणि त्यामुळच तुम्ही मला आपल्या वाटल्या. तरी तुम्ही परत येईपर्यंत मला खूप धास्ती वाटतच होती; पण तुम्ही मला सांगा की तुम्ही मला मदत का केली? तुम्ही हिंदू आणि मी तर…? ”

तिचे बोलणे तोडत आभा म्हणाली, “अगं असा देश, धर्माचा कोणताच विचार माझ्या मनातही आला नाही. माणसाचा स्वभाव चांगला आणि वाईट सगळीकडेच असतो. देश, धर्म, जात यानुसार तो घडत नाही. आता हेच बघ ना तुला फसवणारे जोडपे आणि तुझ्या सुटकेसाठी पहिला प्रयत्न करणाऱ्या यास्मिनखाला हे तुझ्याच धर्माचे व जातीचे होते ना? तू संकटात आहेस आणि तुला मदत करायची आहे एवढाच विचार आम्ही दोघांनी केला. ”

समीर म्हणाले, “खरं आहे आभाचं. देश, राज्य, धर्म, जात हे सर्व कृत्रिम आहे. स्वाभाविक आहे तो केवळ माणुसकीचा धर्म. तो पाळणाऱ्यांमध्ये विश्वासाचा धागा सहजतेनं जुळून येतो. त्या बळावरच तर अजून आपण टिकून आहोत. आरिफ, शबाना तुम्ही कोठंही राहा, इथं किंवा भारतात. संकटात सापडलेल्यांची यशाशक्ती मदत करीत राहा, त्यांचा देश, धर्म, जात, भाषा यांचा विचार न करता. तीच माझी परतफेड असेल हे लक्षात घ्या. आमच्यासाठी काही करायचं असेल तर एवढे करा.”

त्यांचा निरोप घेऊन आरिफ व शबाना निघाले. एक विलक्षण आलीय बंध त्या चौधात निर्माण झाला होता.

डेझर्ट कॅम्पवर काहीतरी गडबड झाली. शबाना तेथून निघून गेली ही वार्ता हवेलीपर्यंत पोहोचली. तेव्हा नमाजाची वेळ होती. खालाजानचा हेतू सफल झाला होता. एवढे दीर्घायुष्य आपल्याला लाभले ते थोडे तरी सत्कारणी लावता आले या बद्दल आभार मानण्यासाठी त्या परमतत्त्वापुढे नतमस्तक होऊन ती नमाज अदा करू लागली.

Author