निरागस

जमिनीवर बोटाने वर्तुळ रेखत सोनूने साऱ्या गल्लीला आव्हान दिले. त्याने सभोवार नजर फिरवली; पण त्याच्याशी खेळायला कुणीच नव्हते. गोट्या खेळण्यात निश्चितपणे तोच कायमचा विजेता होता. सात वर्षांच्या सोनूच्या खेळातील कौशल्याबद्दल त्याच्या सर्वच सवंगड्यांना आदर होता. जेव्हा छोटासा, गोबऱ्या गालाचा आणि गोड दिसणारा सोनू खेळाच्या मैदानावर उभा राही, तेव्हा त्याच्या विरोधात खेळण्याची कुणाची हिंमत होत नसे. त्याच्या विरोधात खेळणे म्हणजे निश्चितपणे स्वत:च्या गोट्या गमावणे व त्याच्या गोट्यांचा वैयक्तिक संग्रह वाढवणे हे ठरलेले होते.



जमिनीवर बोटाने वर्तुळ रेखत सोनूने साऱ्या गल्लीला आव्हान दिले. त्याने सभोवार नजर फिरवली; पण त्याच्याशी खेळायला कुणीच नव्हते. गोट्या खेळण्यात निश्चितपणे तोच कायमचा विजेता होता. सात वर्षांच्या सोनूच्या खेळातील कौशल्याबद्दल त्याच्या सर्वच सवंगड्यांना आदर होता. जेव्हा छोटासा, गोबऱ्या गालाचा आणि गोड दिसणारा सोनू खेळाच्या मैदानावर उभा राही, तेव्हा त्याच्या विरोधात खेळण्याची कुणाची हिंमत होत नसे. त्याच्या विरोधात खेळणे म्हणजे निश्चितपणे स्वत:च्या गोट्या गमावणे व त्याच्या गोट्यांचा वैयक्तिक संग्रह वाढवणे हे ठरलेले होते.

त्याला स्वतःच्या गोट्यांच्या संग्रहाविषयी उचित अभिमान होता. गावातील कुणा दुकानातही माझ्याइतक्या गोट्या नसतील असे तो काहीशा गर्वाने नेहमी म्हणत असे आणि प्रत्येक जण त्याला होकारार्थी मान डोलवत असे. कधी कधी मुलांची त्याच्याशी खेळावरून किरकोळ भांडणे होत असत; परंतु अंतिमत: त्याचे खेळातील वर्चस्व ते मान्य करीत.

त्याच्याशी खेळण्याच्या अटीवर कधी कधी अतिशय उदार होऊन तो मित्रांना स्वत:च्या गोट्या उधारीवर देत असे; पण त्याचाही परिणाम ठरलेलाच असे. काही मित्र त्याचे कर्जदार झाले होते व अनेकांची दिवाळखोरी जाहीर झाली होती. गोट्या खेळण्याचे कौशल्य ही सोनुसाठी दैवी देणगी होती व स्वत: देवच त्याच्या हातून खेळत असे याची सोनूला पक्की खात्री झाली होती. अगदी आजसुद्धा सोनू खिसाभरून गोट्या घेऊन एका दोन मजली इमारतीच्या तळातील अरूंद जागेत खेळासाठी आला होता. त्याच जागेत खेळण्याचे दुसरे कारण असेही होते की तिथे त्याला त्याच्या आईचा हाका सहज ऐकू येत असत.

खरे तर त्याचे नाव शाळेत घातलेले होते व कधी कधी तो तेथे गेलाही होता; पण जेव्हा त्याच्या लक्षात आले की गोट्यांचा खेळ त्याच्या अभ्यासात नाही, तेव्हा शाळेतून त्याचे मनच उडून गेले. या चुकीसाठी शाळा बंदच पाडल्या पाहिजेत असा विचार त्याने मित्राजवळ बोलून दाखवला होता. त्यानंतर त्याचे दप्तर म्हणजे गोट्यांचा खजिना बनला होता.

सोनू त्याच्या आईसोबत गल्लीच्या पार टोकाच्या एका छोट्याशा खोलीत राहत होता. त्याच्या वडिलांचा चेहराही त्याला आठवत नव्हता.
तसेच कुणाला ‘बाप’ म्हणावे याबाबत तो जरा साशंक होता. शाळेत नाव घालतेवेळी जेव्हा शिक्षकाने त्याच्या वडिलांचे नाव आईला विचारले होते तेव्हा तिने काहीच उत्तर दिले नव्हते हे त्याच्या लक्षात होते.

हा गोट्यांचा राजा वडील नसल्यामुळे स्वतःला खूप गरीब समजायचा. त्याच्या मित्रांप्रमाणे आपणही आपल्या वडिलांच्या हाताला धरून फिरायला जावे असे त्याला वाटत असे. कधी कधी तो आईला वडिलांबद्दल विचारत असे तेव्हा आई त्याला चॉकलेट देऊन त्याचा प्रश्न टाळत असे. गल्लीतल्या त्याच्या काही मित्रांचीही सोनूसारखीच परिस्थिती होती. काही पाहुणे काही वेळासाठी त्याच्या घरी येत असत तेव्हा त्याला खेळण्यासाठी बळंच बाहेर पाठवले जाई. इतर घरांपेक्षा त्याच्या घरी जास्त पाहुणे येत असत. याबद्दल त्याने त्याच्या एका मोठ्या (१२ वर्षांच्या) मित्राला विचारले तेव्हा त्याच्याकडून असे समजले की त्याची आई इतरांपेक्षा खूप सुंदर व तरुण असल्यामुळे तिचा धंदा जोरात होता. पण तो ‘धंदा’ कोणता हे मात्र त्याला समजले नाही. त्याची पन्नास वर्षांची म्हातारी आजी होती. ती कोणत्या ना कोणत्या आजारांमुळे त्रासलेली होती. तिने ही मागे खूप मोठा धंदा केला होता असे त्याने कुणाकडून तरी ऐकले होते. या एका गोष्टीचा त्याला अभिमान होता की, त्याची आजी, आई व तो स्वतः सगळेच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अव्वल होते.

एकदा एक पाहुणा सोनूच्या आईला म्हणाला होता की सोनू जर मुलगी असता तर त्याने खूप मोठा धंदा केला असता आणि खूप पाहु त्याला भेटायला आले असते. गेल्या वीस वर्षांपासून तो सोनूच्या घरी येत होता. पण सोनू मुलगा असल्यामुळे पुढील तीन पिढ्यांच्या कमाईला मुकला होता. सोनूला त्या बोलण्याचा अर्थ कळलाच नाही; पण काही वेळासाठी त्याला तो ‘मुलगा’ असल्यामुळे व आजी व आईप्रमाणे त्याच्याकडे येणाऱ्या पुष्कळ पाहुण्यांची संधी चुकल्यामुळे त्याला दुःख वाटले.

समाधानकारक उत्तरे न मिळालेले अनेक प्रश्न त्याच्या मनात होते. गल्लीबाहेरील मोठ्या बाजारातील लोक सोनू राहत असलेल्या गल्लीची निंदा करीत; पण संध्याकाळी मात्र गल्लीत येत असत. ही गोष्ट सोनूच्या लक्षात आली होती. बाजारामध्ये तो ‘शांताबाईचा मुलगा’ म्हणून प्रसिद्ध होता आणि काही लोक त्याच्याशी अतिशय आपुलकीने वागत. त्याच्या हेही लक्षात आले होते की त्याच्या घरी पाहुणे आले की त्याची आजीदेखील बाहेर जात असे. हेही त्याच्यासाठी एक कोडेच होते.

पुष्कळदा त्यांच्या घरी आलेले पाहुणे तो घराबाहेर बसलेला असताना त्याला पैसे देत. अतिशय आनंदात ते म्हणत “आज तबियत एकदम खुश आहे, बाळा हे घे पैसे तुझ्या चॉकलेटसाठी.” त्यांच्या या दिलदारपणाबद्दल सोनू अतिशय कृतज्ञ होत असे.

विशेषत: संध्याकाळी त्या अरुंद गल्लीत खूप गर्दी होत असे. शिवाय अजून एक गोष्ट सोनूच्या लक्षात आली होती की त्याच्याप्रमाणेच त्याच्या अनेक मित्रांनाही वडील नव्हते, तसेच तेथे फार थोडे पुरुष नेहमीसाठी राहणारे होते. पाहुणे लोक बहुधा दारू पिऊन येत असत. गल्लीच्या प्रत्येक कोपऱ्यावर दारूचा वास रेंगाळत असे. खास करून संध्याकाळी आईच्या आग्रहावरून सोनू व त्यांच्या सर्व मित्रांना त्या दोन मजली इमारतीच्या तळातील जागेत गोट्या खेळण्यास जावे लागे. या गोष्टींचा त्या सर्वांना अतिशय आनंद होत असे. कारण त्यांच्या शाळेतील इतर मित्रांना त्यांचे आई-बाप अशा प्रकारे तासन्तास खेळायला पाठवत नव्हते.

रोज संध्याकाळी सोनूची आई व गल्लीतील इतर आज्या त्यांची घरे सोडून त्या भागातील एकुलत्या एक दिव्याच्या खांबाखाली एकत्र बसत असत. त्यांच्या तारुण्यातील सोनेरी दिवसांच्या आठवणी हा त्यांच्या गप्पांचा आवडता विषय होता. त्याच वेळी सोनू व त्यांच्या मित्रांनी गोट्या खेळण्याच्या जागेच्या ताबा घेतलेला असे. त्या प्रत्येकाच्या आईचा फोटो त्यांच्या शर्टच्या खिशात असे. नियमित येणारे पाहुणे त्यांची मदत न घेता थेट त्यांच्या आवडीच्या घरात जात; पण नवीन येणाऱ्या पाहुण्यांसाठी कोणाच्या घरी जावे हा मोठाच प्रश्न असायचा.

पण त्यांची मदत करण्यात सोनू व त्यांची टोळी पारंगत होती. गोट्या खेळत असताना एक डोळा अशा नवख्या लोकांवर लक्ष ठेवूनच असे आणि अशी व्यक्ती आली ते सर्व तिच्या भोवती जमून त्यांच्या आयांचे एकामागून एक फोटो दाखवीत.

सोनूच्या आईची निवड बहुधा होतच असे. त्या गोष्टीचा त्याच्या आजीला अभिमान वाटे. कधी कधी एकाच वेळी अनेक पाहुणे येत. अशा वेळी सोनू त्यांची यादी तयार करून एकानंतर एक अशा क्रमाने त्यांना त्याच्या घरी सोडत असे. येणारे पाहुणे त्या छोट्या मुलाच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक करीत व भविष्यात तो मोठा दलाल होईल असा आशीर्वाद देत. काही लोकांना त्याची चॉकलेटची आवड माहिती होती. त्यामुळे ते त्याला चॉकलेटची लालूच दाखवून त्यांचा नंबर लवकर लावण्याचा प्रयत्न करीत. पण सोनू त्याच्या कामात अतिशय प्रामाणिक होता. अशा आमिषांना बळी न पडता तो त्याचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडत होता.

हे लक्षात आल्यावर एकदा त्याची आजी त्याला म्हणाली की, जर असे घाईत असणारे पाहुणे आले तर त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेण्यात काही चूक नाही. आपले म्हणणे अधिक स्पष्ट होण्यासाठी उदाहरण देत ती म्हणाली, “सोनू देवाचे दर्शन लवकर व्हावे म्हणून आपण देवळातसुद्धा अधिक पैसे देतो. म्हणजे देवालादेखील ही पध्दत मंजूर आहे.” आजीच्या म्हणण्याप्रमाणे एकदा सोनूने त्याच्या आईसाठी आलेल्या माणसाला जास्तीचे पैसे मागितले. तो भाव ऐकल्यावर माणसाने देण्यास नकार दिला. त्यामुळे सोनू परत गोंधळात पडला; पण आजीने त्याची समजून घालत म्हटले “वाण चांगला असला तर भावही जास्त मोजावा लागतो बाळा.’ ” हे ऐकून सोनू अधिकच गोंधळला. त्या रात्री सर्व पाहुणे संपल्यानंतर खूप रात्री सोनू आईच्या मांडीवर बसला होता. अनपेक्षितपणे त्याने आईला विचारले, “ही सर्व माणसे तुला पैसे देऊन का बरं भेटायला येतात? ” आई क्षणभर स्तब्ध झाली. दीर्घ श्वास घेऊन सोनूच्या कपाळाचा मुका घेत तिने उत्तर दिले, “सोनू, बाळा तू जसा तुझ्या मित्रांना तुझ्या गोट्या उधार देतोस ना तसे या सर्व काकांनी माझ्याकडून पैसे उधार घेतले होते. ते परत देण्यासाठी आता ते येतात.” अर्थात, सोनूचे समाधान करणारे ते उत्तर होते.

आज ना उद्या सोनूच्या या प्रश्नाचा सामना करावाच लागणार होता याची कल्पना त्याच्या आईला असल्याने तिने ते उत्तर आधीच ठरवून ठेवले होते. सोनूने आईला घट्ट मिठी मारली.

खोलीच्या एका कोपऱ्यात मळक्या सतरंजीवर आजी झोपली होती. तशी ती फार म्हातारी नव्हती; पण सततचे आजारपण, औषधपाणी आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या यामुळे ती जास्तच म्हातारी दिसत होती. श्वास घेण्याप्रमाणे रात्रभर कण्हणेदेखील तिच्यासाठी नैसर्गिक झाले होते. तिचा आजार व सोनूच्या आईचे वय जेंव्हा समांतर वाढत गेले तेंव्हा तिने तिचा धंदा बंद केला होता. एकदा तिचा वीस वर्षापूर्वी काढलेला फोटो सोनूने पाहिला. त्यात ती सिनेमाच्या जाहिरातीतील नटीप्रमाणे तरुण आणि खूपच सुंदर दिसत होती. आता मात्र त्या काळाच्या केवळ आठवणी उरल्या होत्या.

थोड्या वेळाने बाहेरुन मोठा आरडाओरडा ऐकू आला. त्या आवाजाने सोनू भेदरून उठला. ‘कदाचित पोलिसांची धाड असेल.’
आई म्हणत असतानाच घाणेरड्या शिव्यांसह दारावर थापा पडू लागल्या. त्याच्या आईने उठून दार उघडले व त्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर जोरात थपडेचा प्रहार झाला. तो इतका जोराचा होता की ती भेलकांडत खाली पडली. एक धिप्पाड पोलीस आत शिरला व त्याने आईच्या मांडीवर बुटाचा पाय रोवला. चॉकलेटी असूनही तो बुटाचा रंग त्यावेळी सोनूला अजिबात आवडला नाही. एका क्षणात आईच्या डोळ्यात वेदना उमटली व तिचा आकर्षक चेहरा वेडावाकडा दिसू लागला.

अतिशय अर्वाच्य शिवीगाळ करीत तो साहेब वाटणारा पोलीस शिपाई तिच्यावर कडाडला, ‘ए भडवे ! आम्हांला गंडवायचं नाही अशी सक्त ताकीद मी तुला मागं दिली होती ना? तुझ्या धंद्याची सगळी माहिती आम्हांला आहे, तरी तुझे हप्ते आमच्यापर्यंत नेमानं पोहोचत नाहीत.” आणि “आमच्या कृपेनं धंदा करुन वर आम्हांलाच फसवतेस काय? “असे म्हणतच त्याने तिच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. आता आजीचे कण्हणे एकदम बंद झाले होते. आजीच्या गळ्यात भयाचा आवंढा दाटून आला. स्वत:चे अस्तीत्व लक्षात येऊ नये म्हणून मुद्दामच ती प्रेताप्रमाणे निश्चल पडून राहिली. आईने ब्लाऊजमध्ये ठेवलेले पैसे काढून त्या पोलिसाला दिले. त्याने तिचा हात धरला व तो नाजूक हात दाबत अधिक पैशाची मागणी केली. त्याच्या हातात तिचा हात मगरीच्या जबड्यातील नाजूक माशासारखा दिसत होता. परिस्थितीचा रागरंग ओळखत आजीने सोनूला बाहेर चलण्याविषयी खुणावले. आईवर ओढवलेल्या प्रसंगामुळे सोनू भीतीने थिजून गेला होता. तो अंथरुणावरून अजिबात हलू शकला नाही.
पोलिसाने त्याच्याकडे अशा भयंकर नजरेने पाहिले की त्याचे कपडे भीतीने ओले झाले. आजीने त्याला धरून उठवले व जवळपास ओढतच खोली बाहेर नेऊ लागली. अश्रूभरल्या डोळ्यांनी आई असहायपणे सोनुकडे पाह होती. दुःखावेगाने सोनू ‘आई’, ‘आई’, असं ओरडू लागला. ते ऐकून तिला रडू कोसळले. ते दोघे बाहेर जाताक्षणी पोलिसाने त्याच्या चॉकलेटी रंगाच्या बुटाने धाडकन दार लोटून घेतले.

त्या गल्लीत अशा घटना नित्याच्याच होत्या. दर एक-दोन महिन्यांतून पोलीस तेथे येत व नेमलेल्या हप्त्यापेक्षा जास्त पैशांची मागणी करीत, शिवाय तेथील स्त्रियांचा उपभोगही घेत. सोनूची आई ही तर त्यांची खास पसंती होती. त्या रात्री गल्लीभर जोरात आरडाओरडा चालू होता. पोलिसांची शिवराळ भाषा आणि त्या असहाय पीडितांच्या किंकाळ्या यांची सरमिसळ झाली होती आणि एक विचित्र कोलाहल वातावरणात भरून राहिला. रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबाखाली पोलिसांची गाडी गुन्हेगारांची वाट बघत थांबली होती. दंडुकेशाही आणि अत्याचार चरमबिंदूवर पोहोचले होते.
पोलीसगाडीच्या समोरील रेडियमने पध्दतशीर रेखलेली ‘सद्रक्षणाय खलनिग्रहाय’ची अक्षरे प्रकाशात चमकत होती. सोनूला पोटाशी घट्ट धरून आजी एका भिंतीच्या आधाराने उभी होती. एकूण सर्व प्रसंग अतिशय करुण होता. भीतीमुळे सोनू नखशिखांत कापत होता. हुंदके देता देता सोनूने त्याच्या खोलीच्या बंद दाराकडे पाहिले. दारावर लटकवलेली त्याची आवडती बाहुली आता खाली पडून फुटली होती. तिचे तुकडे तुकडे झाले होते. सोनूच्या हुंदक्याचे रूपांतर जोरात रडण्यात झाले. पोलिसांनी दोन-तीन बायकांना आतापर्यंत निष्ठुरपणे गाडीत कोंबले होते. एका पोलिसाने एका स्त्रीचे पैसे लुबाडले होते व तो तिला समाजात अनैतिक स्वैराचार पसरवण्याबद्दल शिवीगाळ करीत होता.

अचानक एक कर्णकटू किंकाळी गल्लीत घुमली. सोनूची खोली थरारली. हातातली कामे टाकून सर्व पोलीस शिपाई तिकडे धावले. जोरदार लाथेने दार उघडले आणि आतील दृश्याने सर्वांचा थरकाप उडाला. खोलीत तो धिप्पाड पोलीस फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडला होता. सोनूची आई एका कोपऱ्यात उभी होती. तिच्या हातात धारदार सुरा होता, ज्यावरून रक्त ओघळत होते. ती एकटक त्या पोलिसाच्या मृतदेहाकडे पाहत होती; पण तिच्या डोळ्यात कोणतेच भाव नव्हते.

काही क्षण काय करावे हे पोलिसांच्या लक्षात आले नाही. मग एक शिपाई पुढे येत ओरडला. “ए कुत्तरडे ! हे काय केलंस तू? ” त्या एका प्रसंगामुळे तिचे जगच बदलून जाणार होते. हे कळत असुनही काय बोलावे हे तिला समजत नव्हते. थोड्या वेळाने ती पुटपुटली, ‘मी शिक्षा केली, या सैतानाला, मी शिक्षा केली. मला तर त्याने लुटलेच; पण माझ्याबरोबर मी साठवून ठेवलेले पैसेही तो लुटायला बघत होता. ते पैसे फक्त माझ्या सोनूसाठी होते.” मग जमिनीवर फतकल मारून ती जोरात रडू लागली, “सोनू, माझ्या बाळा, कुठं आहेस तू? ” पैशांनी भरलेला पत्र्याचा तू डबा जमिनीवर त्या पोलिसाच्या शरीराजवळ पडला होता. त्यातील काही नोटा रक्तात भिजल्या होत्या.

एखाद्या मेलेल्या गुराला आणावे तसे तिच्या पदराला धरून खेचत व निर्दयतेने लाथा घालत एका पोलिसाने तिला बाहेर आणले. आपले हात उंचावून तिला मिठी मारण्यासाठी सोनू पुढे धावला; पण तिच्या पर्यंत पोहोचला नाही. मध्येच त्यालाही थपडा मारून अडवण्यात आले. त्याची शुध्द हरपली व तो आजीच्या पायाजवळ कोसळला. त्याच्या आईला गाडीत फेकण्यात आले.

त्या घटनेला एक महिना होऊन गेला. आता त्या गल्लीमध्ये सर्व नेहमीसारखे सुरळीत सुरू होते. फक्त सोनूची आई तेथे नव्हती. आईच्या आठवणीने कधी तरी सोनूला हुंदका यायचा; पण तसे त्याचेही अश्रू सुकले होते.
आजीमध्ये फार मोठा बदल होत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. महागडी औषधे घेऊन ती तिच्या आजारातून बरी होण्याचा प्रयत्न करू लागली होती. तिच्या नियमित दवाखान्यात जाण्यामुळे तिची प्रकृती आधीपेक्षा चांगली दिसू लागली. वारंवार लावलेल्या शाम्पूमुळे तिचे केस सिनेमाच्या नट्यांप्रमाणे चमकू लागले. ब्युटीपार्लरमुळे तिच्या चेहऱ्याला तजेला मिळाला आणि ती दहा वर्षांनी तरुण दिसू लागली. अत्तरामुळे तिची काया अधिक सुगंधित झाली. ती रोज झकपक कपडे वापरू लागली.
एकंदरीत तिच्या दुखण्यापेक्षा अधिक काळजी ती तिच्या कमनीय शरीराची करू लागली.

आता आजी ही ‘आजी’सारखी दिसत नव्हती. तिचा सुवर्णकाळ परतल्यासारखे तिला वाटू लागले. स्वत:ला रूपवती बनवत तिने आजूबाजूच्या बायकांना थोड्याच दिवसांत आव्हान दिले. तिची दुखणी मध्येच त्यांचे अस्तित्व जाणवून देत. पण प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर तिने त्यांना दाबून टाकले.

इकडे उलटणाऱ्या दिवसागणिक सोनू त्याच्या आईचे अस्तित्व विसरू लागला. क्वचितच तिच्या आठवणींनी सोनूला रडू येई. त्याला खूश ठेवण्यासाठी आजीने खूप लाड केले. एक दोन वेळा तो आजीबरोबर जेलमधे जाऊन आईला भेटून आला होता. नंतर तिने त्याला सोबत नेल्याचे टाळले होते.

गोट्या खेळण्याचे कसब सोनू पुन्हा दाखवू लागला. काही दिवसांतच त्याने त्याचे वर्चस्व पुन्हा स्थापन केले. बाजारात लोक पुन्हा त्याचे सहानुभूती दाखवून लाड करू लागले. तासन्तास तो गोठ्या खेळण्यामध्ये घालवू लागला. त्याचे दप्तर पुन्हा शेकडो गोट्यांनी भरून वाहू लागले.

सर्व काही सुरळीत चालू झाले. काहीच बदलले नाही. बदलली होती फक्त एक गोष्ट. ती लोकांच्याही लक्षात आली होती. त्याच्या खिशात आता आईऐवजी तरुण दिसणाऱ्या आजीचा फोटो आला होता.

गोट्या खेळण्यात रमणाऱ्या निरागस सोनूला या गोष्टीचा अर्थ मात्र कळत नव्हता. तसा तो आधी तरी कुठे कळला होता रे.

मूळ इंग्रजी कथा (Innocent sin)
– डॉ. विशाल तायडे.

रामकृष्ण
त्या दिवशी सकाळी सकाळी झोपमोड झाली ती खर्रऽ खर्रऽऽ अशा अवाजाने. आवाज कशाचा याचा अंदाज येईना. घरातील अजून कुणीही उठले नव्हते. घराबाहेरून पण अगदी जवळून तो आवाज येत होता. मी उठले. दार उघडून बाहेर आले. कम्पाऊण्ड गेटच्या बाहेरचा रस्ता व गेट यामधील जागा एक माणूस खराट्याने जोरदारपणे झाडत होता. हा कोण? आणि माझ्या घरासमोर का झाडतो आहे? मी गेट उघडत त्याला विचारले. त्याबरोबर झाडू हातात घेऊन ताठ उभा राहून मला त्याने कडक सलाम ठोकला व म्हणाला, “त्या डागदरांकडे मी झाडून काढत असतू, त्यांची गाडी पुसितो. त्येंनी मला इकडे धाडलया.” त्याने हाताने दाखवलेल्या दिशेवरून मला अंदाज आला की तो आमच्या कॉलनीतल्या डॉ. गजेंद्र गडकरांबद्दल बोलत होता. मग तो आत आला. अंगण झाडायला सुरुवात केली. बागेतला पालापाचोळा गोळा करून बाहेर फेकला. न मागता एक मदतनीस मिळाल्याचे मला समाधान वाटले. एव्हाना अनिलही बाहेर आले होते. त्यांनाही त्याने एक झकास रामराम केला. एक कपडा मागून घेतला व मोटारसायकल आणि कार पुसून स्वच्छ केली. अंगणातल्या टाकीतले पाणी घेऊन अंगणात शिंपडले. स्वतःचे हात-पाय धुतले व “बरं आता उद्यांच्याला येईन” असे म्हणत तो निघून गेला. मला गंमत वाटली.
कामाची वेळ, त्याचा पगार याविषयी काहीही बोलणे न होताच तो आमच्याकडे कामालाही लागला. मग तो दिनक्रम सुरू झाला. भल्या पहाटे तो यायचा. बाहेरचे झाडून झाल्यावर आम्ही गेट उघडेपर्यंत बसून राहायचा. गेट उघडावे म्हणून त्याने कधीही आवाज दिला नाही. हळूहळू त्याची सवय होत गेली.

काम, तसे पाहता, ते त्याचे काम करण्याचे वय नव्हते. सत्तरीच्या थोडा मागेपुढे असेल. अतिशय कृश अंगकाठी, रंग अगदी काळा, बारीक डोळे, मध्यम उंची, केस अस्ताव्यस्त व पांढरे. एरवीही दिवसातून अधूनमधून तो दृष्टीस पडायचा. डोक्यावर सरपण घेऊन जाताना, एका लहान मुलाच्या हाताला धरून त्याचे दप्तर सांभाळून शाळेत पोहोचवताना. कधी साधे, उसवलेले ढगळे कपडे तर कधी खाकी गणवेशात वावरायचा. सकाळचे काम करून जाताना अंगणात उभा राहायचा. आमचे कुणाचे तरी लक्ष त्याच्याकडे गेल्यावर “बरं आता जातू,” असे शब्द उच्चारूनच जायचा. मला त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. असूनमधून मी अंगणातल्या कट्ट्यावर बसून त्याच्याशी बोलू लागले. थोडे बहिरेपण असल्यामुळे त्याला बोललेले नीट समजायचे नाही. तो नुसताच बघत राहायचा. मग जरा मोठ्या आवाजात बोलावे लागायचे. त्या गप्पांमधून समजत गेले ते असे होते की, तो जवळच्याच झोपडपट्टीत राहत होता. घरात बायको, मुलं, सुना, नातवंडे. एका मुलीचे लग्न लहानपणीच झालेले; पण नवऱ्याने सोडून दिल्याने ती परत आलेली. बायको आजारी, त्यामुळे सुनेचे घरात सर्वस्व. घरातले सगळेच कष्ट करीत. त्याचे नाव होते रामकृष्ण. एवढे महान नाव असलेल्या माणसाची ही दैना पाहून हळहळ वाटायची.

हळू हळू त्याने आमचा विश्वास संपादन केला. काही कारणास्तव गावाला जाताना घराच्या सुरक्षेची चिंता असायची. एकदा तो म्हणाला, ‘’बाईसायब, जावा तुम्ही बिनघोर. मी हाये ना. बरुबर ध्यानात ठिवतू.” तो घराचे काय रक्षण करू शकणार होता. हे दिसतच होते. तरी पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने आम्ही त्याच्यावर घराच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली. दोन दिवसांनी परत आल्यावर पाहतो तर तो गेटबाहेर बसूनच होता. लगेच उठून उभा राहून त्याने सलाम ठोकला. गाडी पुसून, अंगण झाडून, दुधाचे पाकीट आणून देऊन मगच गेला. आम्हाला खरेच त्याचे कौतुक वाटले. मग ते वारंवार घडत राहिले. घरात उरलेसुरले मी त्याला द्यायची. तो म्हणायच्या, “मी घरी नितू.”
एक, दोन उरलेल्या पोळ्या व भाजी घरी नेऊन किती जणांना ते देऊ शकेल अशी शंका मला वाटायची. त्यालाही आमच्याबद्दल आपलेपणा वाटू लागला होता. नोकर आणि मालक असे स्वरूप आमच्यातील संबंधाला कधीच आले नाही. वयाने तो खूपच मोठा असल्याने त्याला कधीच अरे, जारे केले नाही. तो मला वाईसायब आणि अनिलला ‘सायब’ म्हणायचा. खायला मागायचे असेल तर बाईसायब आणि पैसे मागायचे असतील सायब असे त्याने ठरवलेले दिसत होते. महिना संपल्यावर अमुक इतकी ठराविक रक्कम असे काही बोलणे झालेले नव्हते. त्याला गरज लागेल त्याप्रमाणे आठ-पंधरा दिवसांतून तो कधीतरी पैसे मागायचा. वीस रुपयांपासून ते दोनशे रूपये अशी त्याच्या मागणीची रेंज असायची. कधी घरातले संपलेले सामान आणायचे असायचे, कधी औषध, कधी पाहुणे, कधी सुनेने मागितले म्हणून अशी विविध कारणे असायची. म्हातारा माणूस या वयातही कष्ट करतेय या विचाराने अनिलही त्याला पैसे द्यायचे. मग तो कडक सलाम ठोकयचा. कधी तरी नेलेले पैसे परत करून आम्हाला तो बुचकळ्यातही टाकायचा.

एकदा असेच पैसे परत केल्यावर मी विचारले की पैसे कुठून आणले! त्यावर ‘पेन्शन आली’ असे उत्तर दिले. मी ताडकन उडालेच ‘पेन्शन’? कुठं नोकरीला होता तुम्ही?” “बाईसायब, मी नगरपालिकेत सफाई कामगार होतो. या युनिफारम बी तिथलाच हाय.” मग मला त्याचे काम, त्याचा गणवेश, त्याचा सलाम या सगळ्याचाच उलगडा झाला. कार पुसून झाल्यावर मोटारसायकल पुसायची राहिली म्हणून ‘सायब’ बाहेरून येईपर्यंत बसून राहायचा. “का थांबलात जायचं असेल तर जा. असे म्हटल्यावर तो म्हणायचा. “थांबावंच लगतं सायब येईतो.” त्याची नोकरी अशी त्याच्या वृत्तीत भिनली होती.
एकदा असेच आम्ही दोघे बोलत असताना तो म्हणाला “बाईसाय तुम्ही आता कामाला जाताना दिसत नायी.” “अहे, मी आता रिटायर झाले. ”

“मग… पेन्शन किती बसली या?” मला हसू आले. अधिक खुलासा न करता म्हणाले, “अजून मिळायची आहे.” “मिळंल… मिळंल…” असे म्हणत त्याने मला जणू दिलास दिला. त्याला किती पेन्शन मिळते हे मात्र त्याला नक्की सांगता आले नाही किंवा खरे सांगावे की नाही अशी त्याची द्विधा मनःस्थिती असावी. त्यामुळे कधी एक हजार तर कधी दोन हजार अशी त्याची रक्कम बदलत जायची.

असेच अनेक ऋतू आले, गेले. त्याचे वय वाढत गेले. काम तसेच चालू राहिले. माझ्या पेन्शनची चैकशी सुरू राहिली. माझी नोकरी पेन्शनेबल नव्हतीच. हे सगळे त्याला सांगत बसायचे म्हणून मी प्रत्येक वेळी अजून सुरी झाली नाही असे सांगायची त्याचे त्यालासुद्धा वाईट वाटत असावे. तो म्हणायचा, “मिळल.. मिळल.. सरकारी काम हाय, सावकाश हुतं” या बोलण्यातून त्याला माझी काळजी व्हायचे. हे स्पष्ट वाटायचं. एकदा म्हणाला, “म्या फकस्त त्या डागदराकडे आणि तुमच्या हिथंच काम करतू बाकी न्हाय करणार दुसरीकडं.” असे करून त्याने आमच्या घराचीच निवड केली हा त्याच्या मोठेपणा मी मनोमन मान्य केलेलाच होता; पण पुढे पुढे असे होत गेले की त्याचे थोडे बहिरे असलेले कान पूर्णतः बहिरे झाले. दृष्टी अधू झाली. गवत काढण्याऐवजी तो शेपे उपटायला लागला. गाड्या पुसताना धूळ तशीच राहू लागली. तो गेल्यावर परत गाड्या पुसून घ्याव्या लागायच्या. बोललेले ऐकू येत नसल्यामुळे हातवाऱ्यांवर निभावून न्यावे लागायचे. लक्ष वेधून घेण्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवत असे किंवा त्याच्या अगदी जवळ जाऊन बोलायचे. त्याचे काम करून न केल्यासारखे होऊ लागले; पण तो येत राहिला, आम्हीही येऊ नको असे कधी म्हणाले नाही; पण ‘संवाद’ पूर्णतः थांबला. बाईसायबांना त्याच्याशी बोलायला आवडतं. हे त्याला कळालेले होते. त्यानुसार तो कधी कधी मुद्दाम थांबायचा. मग तारस्वरात माझे बोलणे सुरू व्हायचे. त्यात त्याची, घरच्यांची, पेन्शनची चौकशी असायची. एखादा प्रश्न ऐकू गेला नाही तर केवळ बरं बरं म्हणत मान हलवत ररहायचा. त्याला दिलेला सायबांचा टी-शर्ट, माझ्या बाबांचा शर्ट अगदी कौतुकाने कितीही ढगळा झाला असला तरी घालायचाच. माझे मन नकळत त्याच्याशी तुलना करायचं. सुखवस्तू घरातली माणसं आणि झोपडीतली माणसे. माणूस म्हणून सगळ सारखच ना! आम्हाला जेवढे मिळते ते कमीच वाटते. साठवून साठवून ठेवायचे आणि आणखी हवे आणखी हवे म्हणत धावत राहायचे. त्या सुखाचेही अनंत प्रकार. सगळच हवे असते आपल्याला आणि हा रामकृष्ण !
इतके वय झाले, जवळपास माझ्या वडिलांच्या वयाचा खाटल्यावर बसून आराम करण्याचे वय. अजून मोळी गोळा करतो, झाडझूड करतो आणि तेही एकही तक्रार न करता. महिनातर सोडाच दिवस कसा जाईल, मूलभूत गरजा तरी भागतील की नाही अशी परिस्थिती असतानाही हा इतका संतुष्ट कसा राहू शकतो? पोटभर ताजे अन्न, स्वच्छ, न फाटलेले कपडे, आराम अशा गोष्टी याच्या मनातच येत नसतील का? त्या इच्छांवर कशी मात केली असेल त्याने? घेतलेले पैसे न मागता परत करण्याची आणि माझ्या पेन्शनची काळजी करण्याची ही वृत्ती त्याच्यात आली तरी कोठून !

त्याच्याशी कामानिमित्ताने जुळलेले बंध तोडणे आम्हाला जमलेच नाही. आम्ही ते घर, ते गाव सोडपर्यंत ते तसेच राहिले. आम्ही तेथून जाणार समजल्यावर त्याला अतिशय वाईट वाटले.

आता तो कुठे काम करीत असेल, काय करीत असेल, त्याला नवीन सायब, बाईसायब भेटल्या की नाही देव जाणे. आम्हाला मात्र तसा ‘रामकृष्ण’ अद्याप भेटायचा आहे.

Author