“ए तेजू दादा, चल ना रे खेळायला. आपण लपंडाव खेळूया का “नको गं सानू, मी नाही येणार आज खेळायला…’ ”
“का? नुसतंच बसायचं का मग घरात? किती कंटाळा आलाय…..
चल ना रे, चलना, चल ना, चल की रे दादुटल्या.”
“नाही म्हटलं ना सानू ! आज माझा मूडच नाहीय खेळायचा, आणि तुला काही होमवर्क नाही का आज? जा अभ्यासाला बस जा. ”
‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
“सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.
”
“तुझी शप्पथ, दादू. सांग ना ती गोष्ट. मोठी गंमत आहे का रे? ”
“गंमत तर अगदीच नाही. म्हणून तर खेळावसंच वाटत नाहीय.
अगं आज आत्या आली होती ना दुपारी, ती अनं आजी बोलत होत्या. मी झोपलोय असं वाटत होत त्यांना पण मी जागाच होतो. डोळे मिटून होतो फक्त तर ना आत्या आजीला काय काय सांगत होती… आपल्या आई-बाबांबद्दल… वाईटच आहे ती अगदी. ”
“ए दादा, रडू नको ना रे ! काय झालं सांग ना. आपल्या आई-बाबांना काय झालंय? ”
” त्यांना काही नाही झालं गं. पण आता ना आपण पोरके होणार म्हणत होती. आपल्याला बिच्चारे म्हणाली.
“पोरके? म्हणजे काय? ”
”
“म्हणजे अगं आई, बाबा नसले ना की आपण पोरके होतो आणि मग म्हणून बिच्चारे पण होतो.’ ”
“हात रे ! काही पण काय बोलतोस? आपल्याला आई, बाबा आहेत ना! माझ्या वर्गातली ती आशू आहे ना, तिला बाबा नाहीत बरं का. फक्त आईच आहे; पण ती तर आपल्यासारखीच दिसते. ‘
“तुला काही कळत नाही. सानू, आत्या आजीला म्हणाली की आपले आई-बाबा आता वेगवेगळे राहणार आहेत. आई मामाकडे जाणार आहे राहायला दादरला, आणि बाबा इथेच राहाणार.
“पण असं का? उन्हाळ्याच्या सुटीत आपण जातोच की मामाकडे. ”
“ते ना… काय ते … डिव्हर्स की डायव्हर्स असं काही तरी होणार आहे दोघांचं. ते झालं की वेगवेगळ्या घरात राहायला जावंच लागतं. ”
“ए दादू, परत रडायला लागलास का? ते जे काय व्हायचं आहे ते होऊच नाही द्यायचं ना त्यांनी. आपण सांगू की त्यांना. आपले बाबा फार शूर आहेत हं. ते तसं काही होऊच देणार नाहीत. मग आईला मामाकडे जावं लागणार नाही. मी सांगते बाबांना अन् तू सांग आईला. तू काय रडूबाई झालायस का आज? ”
“ए बावळट, मला रडूबाई म्हणायचं नाही. सांगून ठेवतो. स्वतः तर भित्री भागुबाई आहे नुसती.”
“हे … ! चिडका बिब्बा चिडला, चिडका बिब्बा चिडला… ”
, “आता मात्र खरंच मारीन हं तुला. जा पळ जा तिकडे उद्या पोरकी अन् बिच्चारी झाल्यावर बसशील मग रडत. ”
” सानू… ए सानू…, अगं इथं का बसलीस मागच्या अंगणात? ”
”
“सानू, ए सानेटले, काय झालं. डोळे असे का झालेत लाल लाल?
रडलीस का?”
“दादा, अरे ना, मघाशी मी बालमित्रमधलं चित्र रंगवून आईला दाखवायला खोलीत गेले ना… तर तिथे बाबा पण होते. आई रडत होती रे खूप. तोंडात ना साडीचा पदर घातला होता म्हणून आवाज येत नव्हता आणि बाबा नुसतेच बसून होते. काहीच बोलत नव्हते. मग मी… मी पण घाबरले… एकदम बाबांच्या मांडीवर बसायला गेले तर ना… आईने मला खसकन् ओढलं अन् जोरात रागावली की आता बाबांच्या मांडीवर कधीच नाही बसायचं…… . ए…. असं कारे म्हणाली ती? मला म्हणाली चालती हो बाहेर, अजिबात यायचं नाही इकडं. माझं चित्र पण पाहिलं नाही रे कोणीच. ”
“मी पाहतो ना, दाखव मला. अरे वा ! छान रंगवलं आहेस की अन् सानू आता शहाण्यासारखं वागायचं आपण. मला पण आज आजी म्हणाली की लवकर मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं आणि ना आजी पण रडत होती बरं का मघाशी.
“ती का रडत होती? तिचं पण भांडण झालं का कुणाशी?
“नाही गं, ती आत्याला फोनवर म्हणताना मी ऐकलं. ती म्हणाली की ते डायव्हर्स लवकरच होणार आहे आईबरोबर. आता आई मामाकडे जाणार आहे अन् सानू, तुला पण घेऊन जाणार आहे म्हणत होती आणि फोनवर बोलतानाच रडत होती. ”
“ए, मी नाही हं जाणार मामाकडे. मला आवडत नाही तिकडे. तू पण जाणार आहेस का?
“मी नाही, तुला एकटीलाच नेणार आहे आई.”
“मग तर मी अजिबात जाणार नाही म्हणजे नाही… बघच तू. ”
“अगं आपल्याला ऐकावच लागत म्हणे त्यांचं.”
‘हे काय असतं रे डायव्हर्स म्हणजे? हे नक्की त्या आत्याने केलंय बघ. वाईटच आहे ती. काल ना शाळेत ड्रॉईंगच्या तासात मी हॅपी होमचं चित्र काढलं होतं. त्यात ना मी फक्त आई, बाबा, तू आणि मी एवढेच काढले.
आजीचं मला काढताच आलं नाही. अन् आत्याचं मी नाही. ‘ मुद्दामच काढलं “नाही गं सानू, आत्यानं काही नाही केलं. ते एक मोठ्ठ ऑफिस असतं. कोर्ट नावाचं. त्या ऑफिसातच करतात म्हणे डायव्हर्स. आमच्या शाळेतला सातवीतला तो रोहन सांगत होता मला. त्याच्या आत्याचं पण झालंय म्हणे असंच.
“हो का? पण मग त्या ऑफिसात गेलेच कशाला आपले आई-बाबा? आपण कधीच नाही जायचं बरं का तिथं. नाही तर आपला पण डायव्हर्स करून टाकतील.
”
“पण…. सानू, तू गेलीस तर मला करमणार नाही इथं.”
“दादा, मी जाणारच नाही, नक्की जाणार नाही. आईला जाऊ दे, एकटीलाच. कशाला गेली त्या कोर्ट ऑफिसमधे? होऊदे आता तिलाच शिक्षा, आपण दोघं इथं राहायचं, बाबा आजी आहेत ना. ”
“सानू, पण आईशिवाय आपण काय करणार? आपल्याला शाळेसाठी तयार कोण करणार? अभ्यास कोण घेणार? बाबा तर सारखे कामासाठी बाहेरच फिरतात. आई ऑफिसात जाते तरी आपलं सगळं करते ना? ती नसेल तर आपल्याला झोप तरी लागेल का?
“”खरंच रे दादा, चल आपण दोघंही जायचं का आईबरोबर?
“नाही गं, मला इथंच ठेवून घेणार आहेत म्हणे बाबा. मी मोठ्ठा आहे ना ! तू अजून लहान आहेस. म्हणून तू आईबरोबर जायचं असा.
हुकूम दिला आहे म्हणे त्या ऑफिसनं. ”
“अरे वारे वा ! त्या ऑफिसला काय करायचंय आपल्याशी?
आम्ही कुठंही राहू, आमची मर्जी. “म्हणूनच तर म्हणालो ना, की तू लहानच आहेस अजून काहीच कळत नाही तुला. तो हुकूम पाळावाच लागतो सगळ्यांना. आई-बाबांना पण; अन् आपल्याला पण.’ ”
“बरं बरं, चल झाली का सुरूवात पुन्हा रडायला. आता कोण झालंय रडूबाई? त्या दिवशी मला चिडवत होतीस ना. ”
“हॅलो, तेजसदादा, गुडमॉर्निंग”
” हॅल्लो, सानिका, गुडमॉर्निंग कसलं, इथे रात्र आहे.”
”
“अरे पण, इथं तर सकाळच आहे ना, म्हणून म्हटलं. बरं जाऊ दे कसा आहेस? मजेत ना! आज रविवार ना, खूप बोलायचंय तुझ्याशी. ‘ “अगं बोल ना, मी पण निवांत आहे आता. बाबा आलेच नाहीत अजून. आई कशी आहे ग?” “ठीक आहे रे ती. तुझ्याशी बोलणं झालं वाटतं ना परवा? आणि बाबा कसे आहेत. मागच्या आठवड्यात बरं नव्हतं ना त्यांना? अन् लगेच लागले का कामाला? दादा, थोडं लक्ष दे रे त्यांच्याकडे. ते आपणहून काहीच सांगणार नाहीत त्यांचा त्रास.” “हो गं, सानिका, आहे माझं लक्ष त्यांच्याकडे, तू आता फायनलला आहेस अन् लवकरच डॉक्टर होणार आहेस, माहीत आहेच की मला, लगेच डॉक्टरकी नका दाखवू बाईसाहेब. ” ” ए नाही रे दादा. खरंच मनापासून काळजी वाटते म्हणून म्हटलं. ए दादा, बाबा माझी आठवण काढतात का रे? कधी बोलतात तुझ्याशी माझ्याबद्दल?” “म्हणजे काय सानिका? ते नेहमीच बोलतात तुझ्याबद्दल. तुझ्या हुशारीचं नेहमी कौतुक करतात ते. आम्ही काय बाबा ! यंत्राशी खेळणारे इंजिनिअर, आम्हाला कुठला आलाय एवढा भाव? “‘ए दादा, पुरे पुरे मस्काबाजी. दादा एक विचारू? आईविषयी बोलतात कारे बाबा कधी? ” “नाही सानू, माझ्याशी तर कधीच नाही; पण त्यांना आठवण मात्र नक्की येते तिची. ” ‘कशावरून? ‘अगं रात्री नुसतेच जागत बसतात काही न करता. तेव्हा नक्कीच ते आईचा विचार करीत असणार आणि आई गं? ती बोलते का कधी बाबांबद्दल?
“नाही रे, तुझ्याबद्दल मात्र भरभरून बोलत असते. कधी कधी एकदम गंभीर होते, एकदम डिप्रेशनमधे गेल्यासारखी वाटते. बी.पी.चा त्रास जास्त होतोय हल्ली. मला वाटतं आठवण तर येतच असणार दोघांना एकमेकांची. पश्चात्तापही होत असेल कदाचित. मामाचे घर सोडून आम्ही स्वतंत्र राहायला लागल्यावर तर आणखीनच अबोल झालीय. ”
“पश्चात्ताप तर होतच असेल निश्चित ! सानिका, आपले आई-बाबा एक व्यक्ती म्हणून किती चांगले आहेत. कुणीच वाईट नाही, स्वार्थी नाही, भांडखोर तर कुणीच नाही. मग असं काय झालं असेल गं दोघांत की त्यांनी डिव्होर्स घेतला?’ “तू म्हणतोस तसं मला पण वाटतं दादा. का ते दोघं असे पोळले गेलेत? त्याची आच आपल्यालाही लागलीय. आपलं बालपण करपून गेलं त्या आगीत. ‘ ”
”
“जाऊदे दादा, आता नको तो विषय. आपल्या बोलण्याचा काय उपयोग? हे बघ. एक महत्त्वाचं सांगायला फोन केलाचं मी तुला’ “अगं मग बोल की.”
?”
“दादा तुला तो सुजय आठवतो का? दोन वर्षांपूर्वी तू इथे आलास तेव्हा ओळख करून दिली होती बघ तुझी.”
”
” हो गं, चांगला लक्षात आहे तो. त्याचं काय? ”
‘दादा… त्यानं मला प्रपोज केलय… अन् मी विचार करतेय.”
‘अरे वा ! एवढी मोठी झालीस का तू? काय ठरवते आहेस मग?
मला तरी चांगला वाटला होता तेव्हा.’ ” तो चांगलाच आहे रे, माझा चांगला मित्रदेखील आहे. त्याला आपल्या घराविषयी सगळं माहिती आहे. खूप समजून घेतो तो मला.’ ”
‘“मग, अगं काय हरकत आहे? अजून का विचार करते आहेस?
होकार देऊन टाक की. ”
“नाही दादा, तो आवडत असला तरी लग्नाबद्दल मी एक निर्णय घेतलाय स्वत:शीच. तो त्याला पटेल की नाही, अशी शंका वाटतेय म्हणून……
‘कसला निर्णय. ”
“दादा, मला असं वाटतं की लग्न झाल्यावर किमान पाच वर्षे तरी बाळ होऊ द्यायचं नाही. हे जर त्याला मान्य असेल तरच….
“‘पण का सानू? असं का ठरवलंस तू? ”
“दादा, आपल्या आई-बाबांच्या लग्नाचं काय झालंय? हे जर त्यांच्यासारख्या चांगल्या माणसांच्या बाबतीत होऊ शकतं तर माझ्या बाबतीतही होऊ शकत. अन् तसं झालं तर त्याची शिक्षा माझ्या बाळाला कशाला व्हायला हवीय? म्हणून….दादा मी अगदी मूर्ख वाटतेय का तुला या बोलण्यानं?
“नाही गं बाळा, पुढचा छान विचार करते आहेस तू; पण पाच वर्षांची अट का? ”
“दादा, माझं माझ्या नवऱ्याशी आयुष्यभर पटणार की नाही हे कळण्यासाठी एवढा अवधी पुरेसा आहे. नाहीच पटलं तर काय त्रास होईल तो मला एकटीलाच. माझ्यामुळं अजून सानिका आणि तेजस होऊ नयेत मनस्ताप सोसायला. ”
“बरोबर आहे. पटतंय मला. इथं तर डिव्होर्सचं प्रमाण फारच आहे. लग्नाचंही काहीच महत्त्व नाही. लिव्ह इन रिलेशनशिपचे दिवस आहेत. कदाचित त्याचा उगम तुझ्यासारख्याच विचारातून झाला असेल.
“ती लिव्ह इन रिलेशनशिप इकडे भारतात पण घुसली आहे तुमच्याकडून येऊन; पण मी तो विचारही करणार नाही. आपल्या आई-बाबांनी आधीच इतकं सोसलंय. माझ्याबाजूनं त्यात अजून भर नको पडायला.
“”सानिका, खरंच मोठी झालीस तू. सुजयशी बोलून घे लवकर.
मला खात्री आहे. त्यालाही पटेल ते. तोही आजच्याच पिढीचा आहे ना.
“तुझ्याशी बोलून खूप हलकं वाटलं दादा अन् तुझं काय? तू तर मोठा आहेस. माझी वहिनी इथली असेल का तिकडलीच? ”
“सानू, मी तर तो विचारही अजून करीत नाहीय. मला ही आई.
बाबांकडे पाहून वाटतं की लग्नात काही अर्थच नाही. ‘ “पण दादा, एकटेपणा कुणालाच नको असतो. कुणाची तरी सोबत हवीच. तू असा नकारात्मक विचार नको करूस.
“ठीक आहे सोनू. तुझं पटलंय मला. करीन मी आता विचार.
खरंच तुझा निर्णय मला अधिक चांगला वाटतोय. मी पण त्याच दिशेनं जाईन कदाचित आणि हो, तुझी वहिनी नक्कीच भारतातली असेल. इथली नाही.
इथं लग्नाकडे आजची तरुण पिढी गांभीर्यानं पाहतच नाही.’ ”
“फार छान दादा, वाट पहाते मी तुझ्याकडून गोड बातमीची.”
“मी पण सानिका, आपल्याला चांगले जोडीदार मिळाले तर आई बाबांना केवढा आनंद देऊ शकू आपण नाही का? ”
“हो रे, बरं आता चल फार वेळ झाला. तुला झोपायला उशीर होत असेल ना? ठेवते मी आता फोन. गुड नाईट, स्वीट ड्रिम्स!”
“ओ. के. गुड बाय. हॅव अ नाईस डे. “