एक दिवस

लेडीज जिमपाशी रेणू पोहोचली तेव्हा सकाळचे ७.३० वाजले होते. पार्किंगमध्ये नॅनो पार्क करून ती लगबगीने जिममध्ये शिरली. समोरच सुधा दिसली. “हाय रेणू ! गुडमॉर्निंग, लुकिंग व्हेरी फ्रेश !” सुधाने तिचे स्वागत केले. ‘व्हेरी गुड मॉर्निंग सुधा. आय अॅम ऑल्वेज फ्रेश.’ रेणूचा हसत प्रतिसाद.



लेडीज जिमपाशी रेणू पोहोचली तेव्हा सकाळचे ७.३० वाजले होते. पार्किंगमध्ये नॅनो पार्क करून ती लगबगीने जिममध्ये शिरली. समोरच सुधा दिसली. “हाय रेणू ! गुडमॉर्निंग, लुकिंग व्हेरी फ्रेश !” सुधाने तिचे स्वागत केले. ‘व्हेरी गुड मॉर्निंग सुधा. आय अॅम ऑल्वेज फ्रेश.’ रेणूचा हसत प्रतिसाद.

दोघी चेंजिगरूम मध्ये जाऊन ड्रेस बदलून आल्या. अॅरोबिक्सची वेळ ७.३० ते ८.३० होती. रेणूच्या बॅचला एकूण पंधरा जणी होत्या. सगळ्याच उच्चभ्रू सोसायटीतल्या उच्चशिक्षित, फिगरकॉन्शस, स्वत:ला फॅशनबरोबर अपडेट ठेवणाऱ्या होत्या. त्यामुळे सर्वांची जीवनशैली एकाच स्तरावरली होती. रेणूची सुधाशी विशेष मैत्री होती. दोघी एका बुटिकमध्ये पार्टनर्स होत्या.

तासभर व्यायाम झाल्यावर पुन्हा ड्रेस बदलून दोघी बाहेर पडल्या. “सुधा, आज मिसेस बजाजना सकाळी दहाची अपॉइंटमेंट दिली आहे. अगदी अर्जंटली त्यांना ड्रेस शिऊन हवा आहे. उद्याचं फंक्शन आहे त्यांच्याकडे ‘ – रेणू.

“अगं, एका दिवसात कसं होणार? ” – सुधाची शंका रास्त होती.

“बघ ना, अगं या बायका पण इतक्या वेळेवर जाग्या होतात ना ! पण नाही तरी कसं म्हणणार? नेहमीच्या कस्टमर आहेत ना ! आता आपल्या कारागिरांना फोन करून लवकर या म्हणते. तू कधी येशील वर्कशॉपमध्ये?” – रेणू.

“मी फार तर १०.३० पर्यंत येईनच; पण रेणू, आज संध्याकाळचं लक्षात आहे ना? आपल्या क्लबमध्ये मंथली मीटिंग आहे. आपल्या साड्या

आणि ड्रेसच्या एक्झिबीशनबद्दल बोलायचं आपण लक्षात आहे ना? ” सुधा.

“ओ गॉड ! विसरलीच होते मी अगदी. बरं, तिथं सगळ्याजणी जमेपर्यंत सात तरी वाजतील. आपल्या परवाच्या एक्झिबिशनला जवळजवळ सगळ्याच आल्या होत्या की क्लबमधल्या.”-रेणू.

“चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही का आपल्याला यंदा? ऑर्डर्स पूर्ण करायची घाई करायला हवी आता. डिझाईन्स तर आपली तयारच आहेत.”-सुधा.

“हो ना ! अगं हे सणावाराचे दिवस. आता दिवाळीही जवळच आली आहे. दिवाळीच्या सगळ्या कामांतून स्वतःला घरातून मोकळं ठेव हं. तरच आपल्याला चांगला प्रॉफिट मिळेल. ” ‘ – रेणू.

“हो ना ! तूसुद्धा फराळाचं करण्याचा घाट घालत बसू नकोस. सरळ बाईकडून करून घे, नाहीतरी हल्ली काय गं, सगळंच छान विकत मिळतं. स्वयंपाकघरात अडकायला आपल्याला वेळच नाही”-सुधा.

“अच्छा, चल, बाय! आता तर निघू. भेटूया वर्कशॉपमध्ये.

‘ रेणू घरी पोहोचली. ऋषिकेश जॉगिंग पार्कवरून परतत होते व गार्डनमध्ये पेपर वाचत-बसले होते. रेणू त्यांच्याजवळ जात म्हणाली.

“हाय ! गुड मॉर्निंग ! चहा झाला ना? ”

“नाही अजून. तुझ्यासाठीच थांबलो होतो.”

रेणूने दोघांचा चहा करून आणला.

“आज काही विशेष अपॉइंटमेंटस्? ‘ तिने विचारले.

“अगं, आता दहा वाजता मी निघेन. दुपारी घरी येणार नाही.

क्लायंट बरोबरच लंच घेईन बाहेर कुठंतरी आणि महत्त्वाचं म्हणजे आज सायंकाळी सात वाजता कलेक्टरांकडे पार्टीला जायचं आहे आपल्याला. मी तोपर्यंत येतोच. तू अगदी तयार राहा. ”

“अहो पण… आज तर मला क्लबमध्ये …” रेणू.

“मला काय वाटतं रेणू ! लेडीज क्लबपेक्षा कलेक्टर जास्त महत्त्वाचे आहेत, नाही का? आपल्या बिझिनेसच्या दृष्टीनं असे कॉन्टॅक्टस् ठेवणं गरजेचं नाही का? त्यांच्या आमंत्रणाला नाकारणं बरं तरी दिसेल का? त्यात त्यांच्या मुलीचा बर्थ डे आहे आज. छानपैकी गिफ्ट देऊ या निमित्तानं.”

“अहो, पण… मंथली मीटिंगला सगळ्या जणी एकत्र येतात. आपल्या बुटिकबद्दल, एक्झिबिशनबद्दल सांगायचं आहे. तेही नाही का महत्त्वाचं? तुम्ही एकटे गेले पार्टीला तर नाही का चालणार?”

“हे पाहा रेणू ! तुझं बुटिक, ड्रेस डिझाइनिंग हे सगळं तुझा छंद म्हणून तू सुरू केलं आहेस. आपल्या बिझनेसमध्ये तूही एक पार्टनर आहेस हे नको विसरूस. कामापेक्षा छंद महत्त्वाचा असतो का? तुला मी एरवी कधी अडवतो का तुझ्या मनासारखं करायला? पण जिथं दोघांनी जाणं आवश्यक आहे तिथे जायलाच हवं नाही का? It’s a part of our business.”

बोलण्याचा व चहाचा समारोप करीत ऋषिकेश उठले.

रेणूपुढे चांगलाच पेच पडला. दिवसभर चांगलीच धावपळ होणार म्हणायची आज. ती मनातल्या मनात दिवसाचे प्लॅनिंग करू लागली. ऋषी आज लंचला नाहीत. मलाही वेळ बहुधा मिळणार नाही. सारंग आणि सुजाता असतील. आता ब्रेकफास्ट काय करावा बरं? विचारात असतानाच सविता आली. तिला पाहून रेणूला हायसं वाटलं. तिच्यावर स्वयंपाकघर सोपवून रेणू अगदी निर्धास्त होती. तिला पटपट सूचना देऊन रेणू स्वत:च्या खोलीत गेली. तयार होत असताना ती बाहेरच्या हालचालींचाही वेध घेत
होती. सुजाता व सारंग ब्रेकफास्टसाठी आले होते. छोटा, दोन वर्षांचा आर्यन काही तरी गमतीशीर बडबडत होता. पटकन जाऊन त्याला उचलून घ्यावे, त्याचे लाड करावे असे तिला वाटले; पण वेळ नव्हता. घड्याळाचा काटा नऊवर आला होता. तिला आता घाई करावी लागणार होती. अचानकच तिला एकदम थकल्यासारखे झाले. पायतले त्राण निघून गेले. ती नाइलाजाने आरामखुर्चीत विसावली. असं आताशा अधूनमधून का बरं होतं? मनाचा उत्साह शरीराला झेपेनासा झाला की काय? ती या कल्पनेने चमकली. नाही म्हटले तरी चाळिशी पार केली होती. स्वतःला छान मेंटेन केलं होतं. आजी तर ती अजिबातच वाटत नव्हती. पण निसर्गांच काय? आतून होणारे बदल ती थोपवू शकत होती काय? त्यातच शुगर आणि बी.पी. या मोठ्यांच्या आजारांनी तिलाही नुकतेच गाठले होते. घर आणि बुटिक सांभाळताना हल्ली ती जरा थकू लागली होती. त्यात कधी कधी बिझनेस मिटींग्ज, सोशल कॉन्टॅक्टस्साठी पार्टीज हाही तिच्या कामाचाच भाग होता. बसून चालणार नव्हतं. थकून तर अजिबात चालणार नव्हतं.
‘“ऊठ ऊठ रेणू ! आटप लवकर !” स्वतःला बजावत ती खुर्चीतून उठली. फुल साईझ आरशासमोर उभी राहून तिने बाहेर जायचा सुटसुटीत, ‘पँट व शर्ट’ असा ड्रेस घातला. बॉबवरून घाईने कंगवा फिरवला. बरं झालं, मोठ्या वेणीला सुटीच दिली ते. तिच्या मनात आले. ती डायनिंग रूममध्ये आली. आता ब्रेकफास्ट करून दहा मिनिटांतच तिला निघायचं होतं. टेबलापाशी उभी राहून सविता वाढत होती. सुजाता व सारंग त्यांच्या दिवसभराच्या कामाचे बोलत होते; त्यातून रेणूला समजलं की दोघांनाही बाहेर जायचं होतं. पण आर्यनला सांभाळणारी मरियम अजून आली नव्हती. “ममा, मरियम अजून आली नाही. आर्यनचं काय करायचं? तो आता उठला आहे. त्याचं खाणं, आंघोळ सगळं राहिलं आहे. आता आम्हाला दोघांनाही ऑफिसात जाणं भाग आहे. ‘ सुजाताचे ऐकून रेणू मनात काहीशी वैतागली. वरकरणी शांतपणे म्हणाली तुम्ही दोघं नीट प्लॅन करा. मी थांबू शकत नाही. मला आता दहापर्यंत बुटिकला पोहोचायचं आहे. अर्जंट कामं आली आहेत. दुपारी यायलाही बहुधा उशीर होईल. संध्याकाळी कलेक्टरच्या पार्टीला जायचं आहे. तरी मी आर्यनसाठी संध्याकाळी चार ते सहा एवढा वेळ थांबू शकेन घरात. त्याप्रमाणे तुमचा प्रोग्राम तुम्ही अॅडजस्ट करा.” रेणूने निर्णय घेऊन व देऊनही टाकला. केलॉग्ज व ज्यूसचा ब्रेकफास्ट करून ती घराबाहेर पडली. ऋषिकेशच्या ब्रेकफास्टचं काय हे विचारायला ती विसरलीच. तिला थोडीशी चुटपूट लागली. निघताना आर्यन तिच्याजवळ आला होता व कडेवर घे म्हणत होता. पण तेही राहून गेले घाईत. तिला अधिकच वरमल्यासारखे झाले.

धावपळ करीत बरोबर दहाच्या ठोक्याला ती बुटिकला पोहोचण्यात यशस्वी होणार होती. गाडी चालवताना वाटेतच मिसेस बजाजच्या ड्रेसचे डिझाईन कसे करावे याचा विचार केला होता, कारागिरास फोन केला होता. वर्कशॉपमध्ये टेलर पोहोचल्याची फोन करून खात्री करून घेतली होती. तिची सहायक ज्योतीही आलेली होती. तिला हायसे वाटले चला सुरुवात तर चांगली झाली दिवसाची. तिला सकाळी अॅरोबिक्स करतानाचं वाक्य आठवले, “The mind is telling the body to coordinate the movements. The mind is telling the body to balance.” खरोखरच शरीर आणि मनाचे कोऑर्डीनेशन व्हायला हवे. दोन्हीचा समतोल असला तरचे आपली गाडी सुरळीत चालणार. ओ गॉड! या गडबडीत बी.पी.ची गोळी विसरलेच घ्यायला. आर्यनची आंघोळ झाली असेल का? नेमकी आजच मरियम का बर आली नाही? तिच्या अंगावर चांगला झालाय तो. ती ही जीव लावते त्याला. तिच्यामुळे सुजाता फ्री आहे एकदम. आई म्हणून काहीच करावे लागत नाही तिला. सारंगच्या बरोबरीने

बिझनेस सांभाळते आहे की. तिला स्वतःचे आईपण आठवले. संसार सुखाचा आणि समृध्दीचा असला तरी कामासाठी सतत घराबाहेर रहाणे तिला व ऋषिकेश दोघांनाही मान्य नव्हते. घरात तेव्हा सासू सासरे होते. मोठी सून म्हणून घरातल्या कुलाचारांची वगैरे जबाबदारी तिच्यावर होती. तिचा हौशी स्वभाव, फॅशन डिझायनर म्हणून तिने कमावलेले कौशल्य हे सगळे नाही म्हटले तरी मोठ्या कुटुंबात थोडे बाजूलाच पडले होते. तिनेही घरची जबाबदारी उचलण्यात आनंद मानला होता. यथावकाश सारंग व सुजाता याचे तिच्या संसारात आगमन झाले. ते मोठे झाले. शिकलेसवरले. चांगले घडले. सुजाता सासरी गेली. सारंगची जोडीदार बनून सुजाता घरात आली. आर्यन झाला. कालौघात सासूसासरे गेले. सगळे दीर व्यवसायनिमित्ताने वेगळे झाले. ऋषिकेशच्या पार्टनर मित्राने व्यवसाय सोडल्यानंतर रेणूला बिझनेसमध्ये घेतले गेले. जात्याच स्मार्ट व बुध्दिमान असलेल्या रेणूने तेही शिकून घेतले. ऋषिकेशना तिची मदत होऊ लागली. सुखसमृध्दीत भर पडत गेली. घरात नवीन व मोकळे विचार सारंग व सुजातामुळे आले. सुजातावर सून म्हणून रेणूने कोणतीच बंधने टाकली नव्हती. या सगळ्यामुळे घराचे ‘घरपण’ थोडे कमी झाल्यासारखे झाले. कामानिमित्त सतत बाहेर राहणे, बाहेरचे जेवणे, रात्री उशिरा घरी येणे. या सगळ्या गोष्टींमुळे घर कामवाल्यांवर सोपवले गेले. त्यात आता बुटिकची ही भर पडली होती.

ती वेळेवर बुटिकमधे पोहोचली. तिने आधी विसरलेली बी.पी.ची गोळी घेतली. तोच मिसेस बजाज आल्या. त्यांचे समाधान होईपर्यंत त्यांच्याशी बोलली. डिझाईन निश्चित केले. त्या गेल्या तोपर्यंत सुधाही आली. दोघींनी टेलर व कारागिरांना त्यांची कामे समजाऊन सांगितली. ड्रेससाठी लागणारे कुंदन, लेस, टिकल्या आणायला ज्योतीला बरोबर घेऊन मार्केटमध्ये जाऊन आली. दोघी-तिघी कस्टमर्स आल्या. त्यांचे कापड व माप घेतले. त्यांना एक्झिबिशनबद्दल माहिती दिली. थोडी उसंत मिळताच घरी फोन लावला. कारण आर्यन नकळत मनात डोकावत होता. मरियम आलीच नव्हती. आर्यन खेळत होता. सुजाता चारपर्यंत थांबणार होती. तोपर्यंत घरी पोहोचण्याचे आश्वासन रेणूने तिला दिले. हे सगळे होईपर्यंत तीन वाजून गेले होते. “संध्याकाळी निदान सातपर्यंत येशील ना रेणू? “सुधाने विचारले, “आज तर कठीणच आहे गं मला येणं.” आजच्या दिवस घेना सांभाळून तूच. आता चारपर्यंत मला घरी आर्यनसाठी जायचं आहे. संध्याकाळी कलेक्टरांकडे पार्टीला जावंच लागणार आहे. सगळं एकदमच आलं बघ आज. मला तर आता गरगरायला लागलंय.” रेणू.” अगं रेणू, थकल्यासारखी दिसतेस आज. कामाचा ताण चांगलाच आलाय तुला. त्यातलं काही तरी एक कमी कर अन् आराम घे बरं जरा.” सुधा म्हणाली.

“नाही गं, मी यातलं काहीच कमी करू शकत नाही आज आणि थकण्याचं काय गं एवढं? सगळं माझ्याच आवडीनं सुरू केलंय ना मी? रात्री झोप झाली की सकाळी एकदम फ्रेश होते मी आणि आता घरी तरी काय काम आहे? आर्यनला सांभाळायचं आहे तेवढेच. तेवढाच आरामही होईल. आजचं क्लबमधलं तेवढं तू बघ. छापलेले पॉम्प्लेटस् न्यायला विसरू नकोस.” रेणू.

रेणू घरी पोहोचली तेव्हा सुजाता तयार होउन वाटच पहात होती. आर्यन खेळत होता. ती रेणूला म्हणाली, “ममा, आर्यन नीट जेवला नाही की झोपला नाही. मरियम आली नाही तर सगळं रूटीनच बदललं त्याचं. तुमच्याबरोबर काही खातो का बघा. मी निघते हं. सातपर्यंत येते. तुम्हाला डॅडींबरोबर पार्टीला जायचं आहे ना? त्यांनी सांगितलं मला. सुजाता गोड हसत म्हणाली व निघून गेली. रेणू स्वत:च्या खोलीत गेली. कपडे बदलले. गाऊन घातल्यावर तिला एकदम हलके वाटलं गार पाण्याने हातपाय, तोंड धुऊन अधिकच टवटवीत झाली. आर्यनकडे बघून तिला विशेष प्रसन्न वाटले. डायनिंग टेबलवर बसून वाढून घेतले. आर्यनला मांडीवर घेत कुरवाळत, थोपटत ती त्याचे लाड करू लागली. तो हीबेटा खुश झाला अगदी. चिऊकाऊचे घास त्याला भरवत तीही जेवली. आता सहापर्यंत किंवा ऋषिकेश येईपर्यंत तिचा वेळ अगदी तिच्या मालकीच्या होता. सोबत फक्त आर्यन होता. एवढी गोड सोबत, तीही दोन अडीच तासांची याचा तिला फार आनंद झाला, आजी म्हणून आपण त्याला फार वेळ देऊ शकत नाही. त्याची थोडी तरी भरपाई आता करूयात. पण ‘ थोडंसं आडवं व्हायला मिळालं तर बरं होईल. ‘ असे तिच्या पाठीने तिला सांगितले. आर्यन झोपला तरच ते शक्य होणार होते.
त्याला भरपूर खेळणी देऊन ती सोफ्यावर आडवी झाली व त्याच्या खेळाकडे बघू लागली. तो खेळण्यात व ती स्वत:च्या विचारात रमली. तिला आठवलं, तिची मुलं लहान असताना मुलांची सगळी जबाबदारी तिनेच घेतली होती. घरकामाला माणसे असूनही स्वयंपाकघर तिच्याच हातात होते. आता मात्र काय झाल होतं? आता घर कुणाच्या हातात होत? तिच्या नाही, सुजाताच्या नाही तर सविता व मरियमच्या हातात तिचं घर होतं. त्या दोघी तिच्या घराच्या आधारस्तंभ बनल्या होत्या म्हणून ती व सुजाता बाहेर पडू शकत होत्या. त्या होत्या म्हणून या दोघींच्या कर्तबगारीला बहर आला होता. त्या दोघींबद्दल आपुलकी दाटून आली रेणूच्या मनात. खरंच काय महत्त्वाचं असते? त्या दोघीही त्यांचे घर सोडून माझे घर सांभाळायला येतात. का? हौशीपोटी तर नक्कीच नाही. ती त्यांची गरज आहे. मी सुजाता घराबाहेर जातो नेमके कशासाठी? ती आमची आर्थिक गरज तर नक्कीच नाही. काय सिध्द करायचे आहे मला? मी कर्तबगार आहे हे? माझे शिक्षण मी वाया जाऊ देणार नाही हे? मला खरंच काय हवे आहे यातून? या प्रश्नापाशी रेणू अडखळली. आत्मसन्मान? कशात आहे नेमका आत्मसन्मान? सोशल सर्कल वाढवण्यात की चार पैसे जास्त मिळवण्यात? घडयाळ्याच्या काठ्यावर चालण्याची ही कसरत का करतेय मी? या गोष्टीतून आत्मसन्मान खरंच मिळतो आहे का मला? पण मग असे करताना मला काहीच तडजोडी कराव्या लागत नाहीत का स्वतःशी? या करतांना कसा सुखावणार माझा आत्मसन्मान? प्रतिष्ठेची गरज हीदेखील स्वाभाविकच गरज आहे असे मॉस्लोने सांगितलेच ना! त्यामुळे मी हे करतेय यात फार काही चूक नाही. थोडफार घराकडे आणि घरातल्यांकडे दुर्लक्ष होतेय एवढेच; पण काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी सोडावंच लागते ना. शिवाय सविता, मरियमच्या संसाराला आपलाही अप्रत्यक्ष हातभारच लागतो आहे. रेणू स्वत:चे योग्य समर्थन शोधू लागली होती नकळत. हे लक्षात येताच ती पुन्हा स्वतःशी अडखळली तेवढ्यात आर्यन तिच्याजवळ आला. त्याचे डोळे पेंगुळले होते. तिने एक चादर हॉलमध्येच जमिनीवर टाकली. त्याला कुशीत घेऊन ती आडवी झाली. त्याला थोपटू लागली. त्याच्या रेशमी केसांतून हळुवारपणे हात फिरवत अंगाईगीत गुणगुणू लागली. मनातली सगळी खळबळ एकदम शांत झाली. सारंग, सुजाता यांना ती अशीच झोपवायची. त्या आठवणींची पुनराभूती घेताना ती फक्त मातृत्वाच्या वात्सल्य भावनेत होती. दुधापेक्षा दुधावरची साय अधिक जपावी लागते हे तिच्या आईचे म्हणणे तिला आठवले. वाढत्या वयात जाणवणाऱ्या अपरिहार्य एकटेपणावर मात करण्यासाठी स्वत:ला सतत गुंतवून ठेवत असली तरी एक नाजूक धागा आर्यनशी जोडला गेला आहे हे तिला नाकारता कसे येईल? त्यापायी त्याला जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा देता येत नाही याची खंत पुन्हा जागी झाली. आर्यनचा चिमुकला तळवा तिच्या गालावर विसावला होता. त्याला अधिक जवळ अगदी कुशीत घेऊन तिने डोळे मिटले. खरंच, स्त्री नऊवारीतली असो की सहावारीतली, अगदी पँटशर्ट घालणारी असली तरी ही दुधावरची साय तिला नेहमीच आवडती असणार आणि तिला जपण्याची, ती न मोडण्याची ती तितकीच हळुवारपणे काळजी घेत राहणार. स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिचा तो पहिलाच अनुभव असतो. सगळे चुकत माकत ती करीत जाते. वेळप्रसंगी आई, सासूचा आधार घेते. स्वतः आजी होईपर्यंत ते मातृत्व अगदी परिपक्व झालेले असते. खरे तर या वयात आल्यावर एखादे बाळ व्हायला हवे, म्हणजे किती बरे चांगले होईले! या विचाराने तिला गंमत वाटून ती स्वतःशीच खुदकन हसली. तिच्या नकळत तिला झोप लागली.

ऋषिकेशच्या फोनमुळे तिला जाग आली. सहा वाजत आले होते. ते तिला लवकर तयार व्हायला सांगत होते. लवकर निघायचे होते. कारण अजून गिफ्ट ची खरेदी बाकी होती. त्यासाठी रेणूचीच मदत लागणार होती.

रेणू धडपडत उठली. पाठ अजून थोडी कुरकुरतेच का? किंचित कणकण वाटतेय का? मनात येऊ पाहणाऱ्या शंकांना दूर लोटत तिने सुजाताला फोन करून लवकर घरी येण्यास सांगितले. स्वतः तयार होऊ लागली. मघाशी काय काय विचार आपण करीत होतो ते तिला आठवले.
त्या विचारांना आता जागा देता कामा नये. आताची गरज वेगळी आहे. फक्त वर्तमानाचा विचार कर बाई रेणू, स्वतःला तिने ठामपणे बजावले आणि तयार होताना ती पार्टीचा, गिफ्टचा पार्टीला जाताना कोणता पोशाख करावा याचा विचार करू लागली. आपण फॅशन डिझायनर आहोत हे त्या पार्टीत सगळ्यांना पटले पाहिजे. कुणाकुणाची भेट होईल? कुणाशी बोलावे? कुणाची मदत होईल माझ्या दोन्ही बिझनेसमध्ये? रेणू निग्रहाने वर्तमानात उतरून एका उद्योजिकेच्या भूमिकेत शिरली. पाठीचे दुखणे, कसकस सगळे विसरली. स्वत:लाच सांगू लागली, “The mind is telling the body to co-ordinate the movements. The mind is telling the body to balance.”

Author