सूर्य आणि चंद्र

सूर्य आणि चंद्र दोघे सख्खे भाऊ. सूर्य मोठा तर चंद्र धाकटा होता. त्यांच्या घरची परिस्थिती कमालीची खालावलेली. घरी त्यांची आई आणि हे दोघे असे तिघेच जण होते. आई काबाडकष्ट करून दोघांना भरवत होती. पण तिच्या मिळकतीत एकवेळचे पोटभर जेवणही मिळत नव्हते.



(बंजारा लोककथा)

सूर्य आणि चंद्र दोघे सख्खे भाऊ. सूर्य मोठा तर चंद्र धाकटा होता. त्यांच्या घरची परिस्थिती कमालीची खालावलेली. घरी त्यांची आई आणि हे दोघे असे तिघेच जण होते. आई काबाडकष्ट करून दोघांना भरवत होती. पण तिच्या मिळकतीत एकवेळचे पोटभर जेवणही मिळत नव्हते. मोठा सूर्य. त्याची भूक भागत नव्हती. तेव्हा चंद्र आपल्या हिश्श्यातील त्याला खायला द्यायचा. आईच्या हिश्श्यातील त्याला थोडे मिळत होते, तरी त्याची चिडचीड सुरूच असे.

एकदा गावजेवण होते. गावातल्या सगळ्यांनाच जेवणाचे आमंत्रण होते. एरव्ही दुर्लक्षित असलेले हे म्हातारीचे घर, आज त्यांना जेवणाचे आमंत्रण आहे म्हटल्यावर सूर्य-चंद्राला आनंद होतो. सूर्याला विशेष आनंद होतो. आजतरी पोटभर जेवायला मिळेल. विविध पदार्थ खायला मिळतील. तो खुशीत होता.

दोघे भाऊ जेवायला जातात. आई वृद्धापकाळाने थकली होती. ती आपल्या मुलांनाच जेवायला पाठवते. जेवणाचे ताट समोर येताच सूर्य भराभर खायला सुरुवात करतो. पण चंद्राने तोंडात घास घेतल्याबरोबर त्याला घरी आई उपाशीच झोपल्याचे आठवते. आपण मिष्टान्नावर ताव मारायचा आणि आईने उपवास काढायचा. त्याला या विचाराने जेवण जात नाही.

सूर्य पोट तट्ट फुगेपर्यंत जेवतो. चंद्राच्या तोंडातला घास तोंडातल्या तोंडातच फिरत राहतो. काय करावे? आईसाठी अन्न घरी न्यावे तर चोरी केल्यासारखे होईल. काय करावे म्हणजे आईलाही जेवण मिळेल आणि ती चोरीही ठरणार नाही. तो आपल्या हाताच्या मोठमोठ्या वाढवलेल्या नखात अन्न भरतो. घरी आल्यावर प्रत्येक नखातील अन्न तो आईसमोर ठेवतो. आई धन्य होते. तृप्त होते. अन्न किती आणले याला महत्त्व नाही. ते आईसाठी आठवणीने आणले याला महत्त्व आहे. आई आपल्या धाकट्या मुलाला आशीर्वाद देते, “मुला तू सदोदित शीतल छायेत राहशील. तुझा सहवास सर्वांनाच आवडेल.” तर सूर्याला शाप देते, “तुला कडक उन्हात राहावे लागेल. तुझ्या तप्त उन्हाने लोक त्रस्त होतील.”

आईच्या या शापामुळे दोघा भावांचे विभाजन झाले असे बंजारा लोक मानतात. तसेच आईच्या शापामुळे सूर्य तप्त कडक उन्हाचा दाह सहन करतो, तर आईच्या वरदानाने चंद्र शीतल प्रकाशात सर्वांना हवाहवासा वाटतो. सूर्य मोठा असूनही लोक चंद्र-सूर्य असे म्हणतात, याचे कारण दोघांचे स्वभाव आहेत.

Author