यक्षप्रश्न

वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.



(महाभारताच्या ‘वनपर्वा’तील कथा )

वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे. जयद्रथाच्या तावडीतून द्रौपदीची सुटका केल्यावर वनवासी पांडव काम्यवनाचा त्याग करून पुन्हा द्वैतवनात आले. त्यावेळी त्यांना खूप तहान लागलेली होती. तेव्हा युधिष्ठिराने नकुलास सांगितले.

‘झाडावर चढून जवळपास कुठे सरोवर आहे का? ते पहा.’ नकुलाने झाडावरून हिरवळलेला टापू पाहिला आणि तिथे जलाशय असेल असा निश्चय करून धर्मराजाची आज्ञा घेऊन तो पाणी आणायला निघाला.

सरोवरापाशी येताच तहानेने व्याकूळ झालेला नकूल पाणी प्यायला पुढे सरसावताच त्याच्या कानावर कुठून तरी शब्द पडले. ‘हे माद्रीसुता हे सरोवर पूर्वीपासून माझ्या ताब्यात आहे. तू पाणी पिण्याचे साहस करू नकोस. प्रथम माझ्या प्रश्नांची उत्तरे दे आणि त्या उत्तराने जर माझे समाधान झाले तर पाणी पी आणि घेऊन जा.’ नकुलाने त्या शब्दांकडे दुर्लक्ष करून पाणी प्राशन केले आणि त्याचा परिणाम म्हणून तो निश्चेष्ट झाला.

नकुलाला उशीर का झाला? म्हणून पहायला सहदेव गेला. त्याचीही तीच गत झाली. शेवटी अर्जुन आणि भीम गेले. त्यांचीही तीच अवस्था झाली. शेवटी वाट पाहून युधिष्ठिर तेथे आला. आपले चारही भाऊ असे मृतवत पडलेले पाहून त्याला अतिशय वाईट वाटले आणि एखाद्या भुताच्या प्रभावाने तर हे झाले नसेल ना असे त्यांना वाटले. शेवटी विचाराअंती ह्या पाण्याचाच तर हा प्रभाव नसेल ना? म्हणून पाण्याची परीक्षा घेण्यासाठी तो सरोवरात उतरला. तोच याच्या कानावर शब्द आले. ‘हे राजा. माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत म्हणून तुझ्या भावंडांची ही गत झाली आहे. तरी तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दे आणि माझे समाधान झाले की मग पाण्याला स्पर्श कर? ‘ एक बगळा हे सांगतो आहे हे युधिष्ठिराला समजताच ‘माझ्या भावंडांना मारण्याचे सामर्थ्य सामान्य पक्षांत नाही. तरी तू कोण आहेस हे मला सांग. मग मी प्रश्नांची उत्तरे देईन.’ असे धर्मराजाने सांगितले. यावर तो यक्ष रूपात प्रगट झाला आणि यक्ष व धर्मराज यात प्रश्नोत्तरे झाली.

यक्ष – कोण एकटा हिंडतो? नाश झाला तरी पुन्हा कोण उत्पन्न होतो? थंडीचे औषध कोणते?

युधिष्ठिर – सूर्य एकटाच हिंडतो. नाहीसा झाला तरी चंद्र पुन्हा उगवतो. अग्नी हेच थंडीचे औषध आहे.

असे अनेक प्रश्न विचारल्यानंतर शेवटी महत्त्वाचा प्रश्न यक्षाने विचारला, ‘जगातील सर्वांत मोठे आश्चर्य काय आहे? ‘ त्यावर धर्मराज म्हणाला, “दररोज लोक मृत्युमुखी पडून यमलोकाला जात आहेत आणि हे स्वतःच्या डोळ्यांनी पहात असून सुद्धा राहिलेले लोक ‘अमर’ बनण्याची इच्छा करतात हे आश्चर्य नाही का?”

धर्मराजाच्या उत्तराने यक्ष समाधानी झाला. धर्मराजाची आणखी एक परीक्षा घ्यायचे त्याने ठरविले. यक्ष म्हणाला, “या चारांपैकी कोणा एकाला मी जिवंत करू ते सांग? ” त्यावर धर्मराज म्हणाला, ‘कुंतीचे तीन आणि माद्रीचे दोन असे आम्ही पाचजण आहोत. कुंतीचा मी एक जिवंत आहे. आता माद्री-मातेचा पुत्र म्हणून नकुलाला जिवंत कर.’ धर्मराजाची ही समबुद्धी पाहून यक्षाला अधिकच समाधान वाटले आणि त्याने चौघाही भावांना जिवंत केले.

यक्षाचे प्रश्न अतिशय कठीण होते म्हणूनच आजही काही कठीण प्रश्न उद्भवला की ‘मोठा यक्षप्रश्न उभा राहिला’ असे आपण म्हणतो.

Author