मन माझे पाखरू !

कवितेतून मनाचा गुंता सोडविण्याचा प्रयास..!



|| हरि ॐ ||

मन माझे पाखरू

बघते धरू आभाळ,

विहारते किती उंच

ठाऊक क्षितिज मृगजळ !

मना मनाच्या साखळ्या

गुंतता गुंती गुंता,

सोडविण्या त्या सगळ्या

हैराण जीव पुरता !

मना मनाचे द्वैत

भांडते आतल्या आत,

भांड भांडूनिया भूस

नकळे कश्यात अंत !

होण्या मन मोकळे

फिरे गरगरा भोवर्‍यावाणी,

पळे इकडून तिकडे,

मग भटके रानोमाळी !

मन गेले बुद्धीकडे

विचारावया यावरील उपाय,

फिरवी बुद्धी प्रेमाने

मनाच्या डोक्यावरुनी हात !

सांगतसे बुद्धी मनाला

युक्तीच्या गोष्टी चार,

शांती, तृप्ती, प्रेम, आनंद

मान मनाचा आधार !

फिरू नको दारोदारी

सोडवीण्या मनातील गुंता,

तुझ्या मनाचा लगाम

दे माझ्या हाता !

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author