वेदसार शिवस्तोत्रम् – ३

वेदसार शिवस्तोत्रम् – ३

भगवान शंकरांच्या पंचवक्त्र स्वरूपाचे अधिक गुणवर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….



गिरीशं गणेशं गले नीलवर्णं
गवेन्द्राधिरूढ़ं गणातीतरूपम्।
भवं भास्वरं भस्मना भूषितांग
भवानीकलत्रं भजे पंचवक्त्रम्।।3।।

भगवान शंकरांच्या पंचवक्त्र स्वरूपाचे अधिक गुणवर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
गिरीशं – गिरी म्हणजे पर्वत. पर्वत हा स्थिर, अविचल असतो. तसे परमस्थिर असणारे तत्व ते गिरीश.
गणेशं – सर्व देवी देवता हेच जणू गण आहेत. त्या सगळ्यांचे अधिपती भगवान शंकर या अर्थाने गणेश आहेत ‌.
गले नीलवर्णं – हलाहल विष प्राशन केल्यामुळे ज्यांच्या गळ्याचा रंग काळसर निळा झालेला आहे असे. वास्तविक तो रंग काळा आहे. पण भगवान शंकर इतके कर्पूरगौर आहेत की त्या तेजाने तो निळसर दिसतो.
गवेन्द्राधिरूढ़ं – गो म्हणजे गाय. तिचा पती बैल तो गव. त्या सगळ्या बैलां मधील श्रेष्ठ तो नंदी. च्या नंदीवर बसणारे ते गवेन्द्राधिरूढ़.
गणातीतरूपम्- सगळ्या गणांपेक्षा अर्थात देवतांपेक्षा अत्यधिक सुंदर रूप असणारे.
भवं – भव शब्दाचा अर्थ आहे प्रकट होणारे. जे स्वतः ज्योतिर्लिंग रूपात प्रगट होतात त्यांना भव म्हटले आहे. भव शब्द संसारासाठी वापरतात. या संसारात सर्वत्र व्यापून असणारे.
भास्वरं- भा म्हणजे तेज. तेजाने युक्त असणारे. तेज, चैतन्य, ज्ञान हेच त्यांचे स्वरूप आहे असे.
भस्मना भूषितांग – ज्यांनी भस्म आणि आपल्या अंगाला विभूषित केले आहे असे.
भवानीकलत्रं – भवानी अर्थात आई जगदंबा पार्वती. ती ज्यांची कलत्र अर्थात अर्धांगिनी आहे असे.
भजे पंचवक्त्रम् – अशा पंचतुंडधारी भगवान शंकरांचे मी भजन करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

Author