भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट आहे तेथील अध्यात्म. सहा वेगवेगळ्या दर्शनांना भारतीय संस्कृतीमध्ये षटदर्शन म्हणतात. त्यातही प्राधान्याने उत्तर मीमांसा अर्थात वेदांत सर्वोपरी श्रेष्ठ आणि लोकप्रिय दर्शन आहे. वेदांता मध्ये देखील केवल अद्वैत नावाने प्रसिद्ध वेदांत तत्वज्ञान म्हणजेच वेदांत अशीच अनेकांची धारणा आहे.
जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी मांडलेल्या मायावादाचा विचार वेदांत शास्त्राचा प्रमुख विचार समजला जातो. या वेदांत तत्त्वज्ञानावर निरूपण करणारे हजारो ग्रंथ भारतात निर्माण झाले. यापैकी अभ्यासकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असा ग्रंथ म्हणजे वेदांतसार
सदानंद यती नावाच्या लेखकांनी लिहिलेल्या या ग्रंथाच्या नावातच आपल्याला ग्रंथाचे स्वरूप लक्षात येते. वेदांत तत्वज्ञानातील सर्व महत्वपूर्ण गोष्टी जणू काही सार रूपात या ग्रंथात आपल्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत.
स्वाभाविकच ग्रंथ नवीन काही सांगण्यासाठी नाही तर वेदांत तत्वज्ञानात असणाऱ्या विविध परिभाषांना आपल्यासमोर स्पष्ट करण्यासाठी तयार करण्यात आला आहे हे सहज लक्षात येते. अधिकारी, विषय, संबंध प्रयोजन अशा अनुबंध चतुष्टया पासून जीवनमुक्त वर्णनापर्यंत साधकाचा क्रमविकास या ग्रंथात स्पष्ट करण्यात आला आहे.
साधन चतुष्टय वर्णन, महावाक्य विवरण, जीवन मुक्त वर्णन अशा अनेक गोष्टी या ग्रंथात खूप सविस्तर रीतीने मांडण्यात आलेल्या आहेत.
वेदांत शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध परिभाषा अर्थात विशिष्ट अर्थाचे शब्द सांगून त्यांच्या मागील नेमक्या भूमिका, त्यांचे अपेक्षित अर्थ, त्या अर्थाचे विविध पैलू या ग्रंथात स्पष्ट करण्यात आलेले आहेत.
वेदांत शास्त्र म्हणजे काय? अशी उत्सुकता मनात असलेल्या ज्या नवीन वाचकाला या शास्त्राची तोंड ओळख करून घ्यायची आहे आणि या शास्त्राचा अभ्यास सुरू केल्यानंतर सुद्धा ज्यांच्या काही संकल्पना पुरेशा स्पष्ट नाहीत अशा प्रत्येक व्यक्तीसाठी अभ्यासकांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयोगी आहे. इतर वेळा क्लिष्ट वाटणाऱ्या परिभाषा येथे नेमकेपणाने उलगडून दाखविल्या असल्याने अभ्यासकांमध्ये हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय आहे.
संस्कृत विषय शिकवला जात असणाऱ्या प्रत्येक विद्यापीठात सामान्यतः पदव्युत्तर स्तरावर किंवा काही वेळा पदवी स्तरावर देखील दर्शनशास्त्र विभागात हा ग्रंथ निश्चितपणे समाविष्ट असलेला पहावयास मिळतो यातच त्याचे महत्त्व अधोरेखित होते. वेदांत शास्त्रातील महत्त्वपूर्ण सिद्धांत सहज समजून घेण्यासाठी हा ग्रंथ जरूर वाचायला हवा.
अनीषा सुरेश बोर्डे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. २
दि. २८. ०९. २०२२
