Shri Vinayak Atre is a retired Chief Architect of Government of Maharashtra. He writes as a passion and most of his writing is for children
प्रारब्ध – भाग 2
Category:
साहित्य - ललितगोष्ट सुमारे चाळीस वर्षापूर्वीची. माझ्या वडिलांची बदली झाली त्यावेळची. बदली झाल्यावर नाशिकहून आम्ही मुंबईला आलो. वडिलांना भायखळ्याला राणीच्या बागेजवळ, आता तिला जिजामाताबाग म्हणतात, ससेक्स रोडला मिस्त्री बिल्डिंगमध्ये सरकारी जागा मिळाली.
जागा कसली? एक दुमजली बंगलेवजा घराचा १ल्या मजल्यावरचा अख्खा अर्धा भागच होता तो! दोन मोठे प्रशस्त हॉल. तसंच मोठं स्वयंपाकघर. उंची चांगली बारा पंधरा फूट. मंगलोरी कौलं. तिन्ही बाजूंनी आठ दहा फूट रुंद प्रशस्त व्हरांडा. अगदी राजेशाही थाट! त्याच रस्त्यावरून म्युझियम ते राणीचा बाग अशी एक छोटीशी ट्रॅम गाडी पण यायची. आम्हाला तर फार मजा वाटायची. रात्री राणीच्या बागेतल्या वाघ-सिंहाच्या डरकाळ्या पण ऐकू यायच्या. एखाद्या गव्हर्नरच्या बंगल्यासारखाच थाट होता. नंतर समजले की पूर्वी तो बंगला म्हणजे जर्मन कॉन्सुलेटरचे ऑफिसच होते. आता तो मिस्त्री नावाच्या एका पारशाने विकत घेतला होता.