गोष्ट एका डिव्होर्सची

‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
“सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.



“ए तेजू दादा, चल ना रे खेळायला. आपण लपंडाव खेळूया का “नको गं सानू, मी नाही येणार आज खेळायला…’ ”
“का? नुसतंच बसायचं का मग घरात? किती कंटाळा आलाय…..
चल ना रे, चलना, चल ना, चल की रे दादुटल्या.”
“नाही म्हटलं ना सानू ! आज माझा मूडच नाहीय खेळायचा, आणि तुला काही होमवर्क नाही का आज? जा अभ्यासाला बस जा. ”
‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
“सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.

“तुझी शप्पथ, दादू. सांग ना ती गोष्ट. मोठी गंमत आहे का रे? ”
“गंमत तर अगदीच नाही. म्हणून तर खेळावसंच वाटत नाहीय.
अगं आज आत्या आली होती ना दुपारी, ती अनं आजी बोलत होत्या. मी झोपलोय असं वाटत होत त्यांना पण मी जागाच होतो. डोळे मिटून होतो फक्त तर ना आत्या आजीला काय काय सांगत होती… आपल्या आई-बाबांबद्दल… वाईटच आहे ती अगदी. ”
“ए दादा, रडू नको ना रे ! काय झालं सांग ना. आपल्या आई-बाबांना काय झालंय? ”
” त्यांना काही नाही झालं गं. पण आता ना आपण पोरके होणार म्हणत होती. आपल्याला बिच्चारे म्हणाली.
“पोरके? म्हणजे काय? ”

“म्हणजे अगं आई, बाबा नसले ना की आपण पोरके होतो आणि मग म्हणून बिच्चारे पण होतो.’ ”

“हात रे ! काही पण काय बोलतोस? आपल्याला आई, बाबा आहेत ना! माझ्या वर्गातली ती आशू आहे ना, तिला बाबा नाहीत बरं का. फक्त आईच आहे; पण ती तर आपल्यासारखीच दिसते. ‘

“तुला काही कळत नाही. सानू, आत्या आजीला म्हणाली की आपले आई-बाबा आता वेगवेगळे राहणार आहेत. आई मामाकडे जाणार आहे राहायला दादरला, आणि बाबा इथेच राहाणार.
“पण असं का? उन्हाळ्याच्या सुटीत आपण जातोच की मामाकडे. ”

“ते ना… काय ते … डिव्हर्स की डायव्हर्स असं काही तरी होणार आहे दोघांचं. ते झालं की वेगवेगळ्या घरात राहायला जावंच लागतं. ”

“ए दादू, परत रडायला लागलास का? ते जे काय व्हायचं आहे ते होऊच नाही द्यायचं ना त्यांनी. आपण सांगू की त्यांना. आपले बाबा फार शूर आहेत हं. ते तसं काही होऊच देणार नाहीत. मग आईला मामाकडे जावं लागणार नाही. मी सांगते बाबांना अन् तू सांग आईला. तू काय रडूबाई झालायस का आज? ”
“ए बावळट, मला रडूबाई म्हणायचं नाही. सांगून ठेवतो. स्वतः तर भित्री भागुबाई आहे नुसती.”
“हे … ! चिडका बिब्बा चिडला, चिडका बिब्बा चिडला… ”
, “आता मात्र खरंच मारीन हं तुला. जा पळ जा तिकडे उद्या पोरकी अन् बिच्चारी झाल्यावर बसशील मग रडत. ”
” सानू… ए सानू…, अगं इथं का बसलीस मागच्या अंगणात? ”

“सानू, ए सानेटले, काय झालं. डोळे असे का झालेत लाल लाल?
रडलीस का?”
“दादा, अरे ना, मघाशी मी बालमित्रमधलं चित्र रंगवून आईला दाखवायला खोलीत गेले ना… तर तिथे बाबा पण होते. आई रडत होती रे खूप. तोंडात ना साडीचा पदर घातला होता म्हणून आवाज येत नव्हता आणि बाबा नुसतेच बसून होते. काहीच बोलत नव्हते. मग मी… मी पण घाबरले… एकदम बाबांच्या मांडीवर बसायला गेले तर ना… आईने मला खसकन् ओढलं अन् जोरात रागावली की आता बाबांच्या मांडीवर कधीच नाही बसायचं…… . ए…. असं कारे म्हणाली ती? मला म्हणाली चालती हो बाहेर, अजिबात यायचं नाही इकडं. माझं चित्र पण पाहिलं नाही रे कोणीच. “

Author