धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती .
स्वामीजींचं चरित्र लिहायचं आणि तेही अत्यंत कमी शब्दात…
हे खरंतर खूप मोठं आव्हान होतं.
ज्यांच्याविषयी लिहायचं ती व्यक्ती अनन्यसाधारण , भक्तीमार्गातील दीपस्तंभ , स्वातंत्र्यचळवळीतील सैनिक, लो.टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वसा कोकणात निष्ठेनं चालविण्याचा कष्टप्रद मार्ग स्वीकारलेली आणि सर्वाना सोहम साधनेला प्रवृत्त करणारी…
त्यामुळं अल्प शब्दात चरित्र मांडणं खरंच अवघड होतं.
पण स्वामींनी माझ्याकडून ते लिहून घेतलं असंच आता म्हणायला हवं.
खरं सांगायचं तर स्वामींचा वरदहस्त लहानपणीच मला लाभला होता.
इयत्ता आठवीत असताना त्यांच्यावर कविता लिहिली होती . माझी काकू ( सीताबाई रघुनाथ जोशी , जी रत्नागिरीत आत्याबाई जोशी म्हणून प्रसिद्ध होती )मला पावसला घेऊन गेली, आणि स्वामीजींसमोर ती कविता वाचायला लावली , अर्थात तेव्हा कविता वाचून दाखवायचं धाडस केवळ काकूमुळे शक्य झालं .
तेव्हा मी घाबरलो होतो , पण कविता वाचली स्वामीजी मंदपणे हसले .
आजही मला , त्यांचा , माझ्या पाठीवरून फिरलेला मृदुमुलायम हात आठवतो. वाचत राहा आणि लिहीत राहा असं मृदू आवाजात सांगितलेलं आठवतं , त्यांनी दिलेला खडीसाखरेचा प्रसाद आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठाचं लहान पुस्तक हेही आठवतं . आणि ते मंद स्मितसुद्धा आठवतं .
आणि धन्यता वाटते.
मंडळानं सांगितल्याप्रमाणे चैतन्यमूर्ती स्वामी स्वरूपानंद हे त्यांचं छोटेखानी चरित्र लिहिलं आणि कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.
हे पुस्तक समाजातील दृष्टीबाधित दिव्यांगाना (अंध बांधवांना ) ब्रेल लिपीत उपलब्ध करून दिलं आहे. मी लिहिलेल्या छोट्या चरित्राचं ब्रेल लिपीत रूपांतर झालं आहे
चरित्र लेखनाअगोदर स्वामीजींच्या संदर्भातील दोन सीडीज साठी मी पटकथा लेखन केलं होतं .
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव
स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी उत्सव
या त्या दोन सीडीज .
आजही त्या सीडी पावसला काऊंटरवर उपलब्ध आहेत .
हे सर्व स्वामीजींच्या आज्ञेनुसार घडत आहे , याची मला नम्र जाणीव आहे .
माझ्या अल्प कुवतीनुसार गुरुऋण अंशतः फेडल्याची भावना मनात आहे . हे स्मरण गाथेत नमूद करणं आवश्यक आहे .
– डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
८९५१९०६७०१
२९ जुलै २०२५
—————–
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही .