ज्येष्ठ मराठी अभिनेत्री किशोरी अंबिये यांचा जन्म २५ जून १९७० रोजी झाला.
मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर गेल्या तीन दशकांपासून वावरणारा चेहरा म्हणजे किशोरी अंबिये. किशोरी अंबिये यांनी अनेक विनोदी नाटकात भूमिका तसेच छोटय़ा छोटय़ा पण आपला ठसा उमटविणाऱ्या भूमिका मराठी चित्रपटांमधून केल्या आहेत. महेश कोठारे यांच्या झपाटलेला या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.
‘झपाटलेला’, ‘खतरनाक’, ‘चश्मेबहाद्दर’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘आबा झिंदाबाद’, ‘सालीनं केला घोटाळा’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बाबा लगीन’, ‘लाडी गोडी’, ‘पकडापकडी’, ‘वन रुम किचन’, ‘पुणे व्हाया बिहार’, ‘लावू का लाथ?’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. किशोरी अंबिये यांनी १५० हून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे.
कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे त्यांनी ‘फु बाई फु’ हा कार्यक्रमही गाजविला. ‘तुझे माझे जमेना’, ‘देवयानी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मंगळसूत्र’, ‘पडोसन’ (हिंदी) या मालिकांमध्येही त्या झळकल्या.
‘भोळे डांबिस’, ‘लगे रहो राजाभाई’, ‘चुप गुपचुप’, ‘उसना नवरा’, ‘महासागर’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही काही त्यांची उल्लेखनीय नाटके होत.
किशोरी अंबिये सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात.