कला क्षेत्र व तंत्रज्ञानाच्या विश्वाकडे कल असणारी कल्पनाशक्ती यांचा सुरेख मिलाफ साधला की एका व्यावसायिक चित्रकाराचा जन्म होतो. हे चित्रकार आपली निर्माणशक्ती कागदावर उतरवून केवळ त्यांच्या वैयक्तिक संग्रही ठेवित नाहीत तर जाहिराती, डिझायनिंग, ग्राफिक्स, व एखाद्या कंपनीच्या वस्तूंचा खप वाढविण्याकरिता त्या शक्तीचा फलदायी उपयोग करतात. ग्राहकांना विशीष्ठ ब्रँडस् कडे चुंबकांप्रमाणे आकर्षित करण्यात अशा कलाकारांचा सिंहाचा वाटा असतो, व बाजारात अशा हाडाच्या कलाकारांना प्रचंड मागणी असते. आजचे युग हे जहिरातींचे युग आहे व गुणवत्तेपेक्षाही आज सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले जाते ते वस्तूच्या मर्केटिंगवर. या टप्प्यावर अशा कलंदरांची गरज सर्वात जास्त लागते. दोन चार रूपयांच्या साध्या पेनाला पार्कर च्या पेनाच स्वरूप व महत्व प्राप्त करून देण्याच्या या प्रक्रियेला कलेबरोबर तल्लख मेंदुची जोड लागते, तसेच अस्खलित कल्पनाशक्तीला व्यावसायिकतेचीही किनार लागते. अशाच एका बहुगुणी कलाकाराचे नाव आहे सौरभ चांदेकर, जो त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे आजगायत सोने करीत आलाय.
सौरभने रेडिओ सिटी 91.1 एफ. एम. च्या उपक्रमासाठी ओजिलव्ही, आणि मॅथर .इंडिया.कंपनीमध्ये आपल्या उत्तुंग प्रतिभेची चुणुक दाखविली आहे. इंडिया मॅनेजमेंट स्कुल करिता बनविलेले ‘हॅलो इंडिया’ हे रेडिओ जिंगल, तसेच हिडन कोमोस ह्या त्याच्या, चळवळ्या व संशोधक स्वभावातुन आकारास आलेल्या उपक्रमामुळे तो व त्याची कला मुंबईमध्ये सर्वपरिचीत आहेत. ह्या उपक्रमाच्या लेखन व दिग्दर्शनापासून ते त्याची आकर्षक, व रेखीव मांडणी करण्यापर्यंतच्या सर्व जबाबदार्यांची पुर्तता सौरभनेच एकहाती केली होती. तमाशा ही या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती व या उपक्रमाची निवड ही इंटरनॅशनल कल्चर एक्सचेंज सारख्या जागतिक व्यासपीठावर करण्यात आली. तसेच कॅलिफोर्निया फिल्म फेस्टिवल मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार्या, काही निवडक दृष्यफितींच्या लघुयादीमध्येसुध्दा या उपकमाने मानाची जागा पटकावली. या अभुतपुर्व यशानंतर हुरळुन न जाता त्याने आपल्या शिरपेचात अजुन कितीतरी सन्मानित तुरे खोवले. कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांच्या मनावर बिंबवणारी जनकल्याण उपक्रमांअंतर्गत येणारी जहिरात, त्याचा परिसस्पर्श मिलाल्यानंतर बेस्ट मास पीपल अॅडव्हर्टाइज म्हणून गौरवली गेली. समडे, तिमाडी यांसारख्या लघुचित्रपटांसाठी त्याने संगीत जुळवणीचे व विश्लेशकाचे काम केले.
याशिवाय इ. टी.व्ही. वाहिनीतर्फे घेण्यात येणार्या झलक या स्पर्धेचे रेकॉर्डिंग, महापौर दिप्ती चौधरी यांच्याकरिता विशेष ऑडियो कॅम्पेन, रोटारॅक्ट क्लब ऑफ पुणे यांच्यासाठी जहिरात करण्याची व मिडीया कंपोसिशनची सर्व जबाबदारी, आय किड्स नॉलेज स्कुल साठी ऑडियो रेकॉर्डींग, व व्यावसायिक कलाकार प्राध्यापक जयप्रकाश जगताप यांनी लिहीलेल्या सौंदर्यशास्त्र व ललितकला अभिव्यक्ती या पुस्तकाच्या मुखपृष्ठ सजावटीचे काम अशा अनेक प्रकारच्या कलांमध्ये सर्वस्व ओतून त्याने काम केले. यातील प्रत्येक कामाला त्याची छाप असलेला सौंदर्यवादी व वैचारिक रित्या समृध्द असा स्पर्श होताच.