जगामध्ये बाकी सर्व पशुंपेक्षा माणूस वेगळा आहे तो त्याच्या मानसिक विकासामुळे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टीत सर्व पशूंना देखील येतात. मात्र याच्या पलीकडे जाऊन मानसिक, बौद्धिक विकास साधतो तोच खरा माणूस. माणसाच्या या नैतिक उन्नतीसाठी भारतीय संस्कृतीने निर्माण केलेल्या असंख्य ग्रंथांमध्ये विश्वविख्यात असणारा सर्वाधिक लोकप्रिय असा एक ग्रंथ म्हणजे महाकवी भर्तृहरी विरचित नीतीशतकम् .
नावातच आपल्याला लक्षात येते की या ग्रंथाचा विषय नीतीशास्त्र हा आहे. त्याचप्रमाणे शतकम् या शब्दातून या ग्रंथात शंभर सुभाषिते आहेत असा अर्थ स्पष्ट होतो. अर्थात येथे शंभर या शब्दाचा केवळ एकच अंक एवढा अर्थ नसून शेकडो या अर्थाने तो शब्द घेतला तर विविध हस्तलिखितात किंवा प्रकाशित पुस्तकात सापडणाऱ्या अधिक श्लोकांचा विचार करता येतो. नीती शतकम् च्या विविध हस्तलिखितात सापडणाऱ्या श्लोकांचे संकलन केल्यास ही संख्या साधारण १४० च्या घरात जाते.
महाकवी भर्तृहरी यांनी या ग्रंथात समाविष्ट केलेल्या श्लोकांच्या विषयांचा विचार करता यामध्ये आपल्याला दहा पद्धती पहावयास मिळतात.
सुरुवातीला परब्रह्म परमात्म्याला वंदन केल्यानंतर पहिल्या अज्ञ पद्धतीमध्ये माणसाच्या मूर्खपणाचे वर्णन केले आहे. अशा मूर्खांना सुधारणे हे अत्यंत कठीण काम आहे असे म्हणत आपण किती महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे हेच वेगळ्या अर्थाने कवी सांगतात.
मूर्खांच्या मूर्खत्वावर विद्याप्राप्ती हाच उपाय असल्याने दुसरी पद्धती आहे विद्यापद्धती. यामध्ये कोणी चोरू शकत नाही राजा काढून घेऊ शकत नाही सतत वाढतच राहते असे जे अद्भुत विद्या रूपी धन असे महत्त्व वर्णन केले आहे.
माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे सन्मान. आवश्यक गरजा तर पूर्ण झाल्याच पाहिजे पण त्यासाठी आत्मसन्मान सोडून लाचारी पत्करण्याची वेळ येत असेल तर त्या उपलब्धीचा फायदा काय असे म्हणत कुत्र्याची लाचारी नको तर हत्ती सिंहासारखे भारदस्त जीवन असावे हे महाकवींनी विविध उदाहरणातून दाखवले आहे.
ज्याच्याजवळ सन्मान आहे त्याने त्या सन्मानाने धन प्राप्त करावे. व्यावहारिक जीवनात सुख मिळवण्यासाठी धन आवश्यक आहे. धनाचे महत्त्व सांगणारी सुभाषिते धन पद्धतीमध्ये मांडलेली आहेत. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्या जवळ जगातले सगळे गुण आहेत असे लोक मानतात असे म्हणत महाकवी भर्तृहरी धनाचे महत्त्व स्पष्ट करतात.
दुर्जन पद्धतीमध्ये दृष्टांचे विविध पद्धतीने वर्णन करून कोणत्या गोष्टींना टाळावे आणि सज्जन पद्धतीमध्ये साधुसंतांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करून कोणत्या गुणांचा अंगीकार करावा हे महाकवींनी आपल्यासमोर सादर केले आहे.
धैर्य पद्धती, परोपकार पद्धती यांच्या नावातच त्या विषयाचा अर्थ आपल्याला समजतो. या जगामध्ये सर्वच पशुपक्षी सुद्धा परोपकारासाठी जगतात मग केवळ स्वार्थासाठी जगणाऱ्याला माणूस कसे म्हणावे? असे प्रश्न विचारत महाकवी आपल्याला अंतर्मुख करतात.
पुढे दैव पद्धती आणि कर्म पद्धती यामध्ये माणसाच्या जीवनात असणारे नशिबाचे महत्त्व स्पष्ट केले तरी शेवटी नशीब आपल्या कर्माने तयार होते आणि म्हणून कर्मच सगळ्यात महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करण्यासाठी ती पद्धती सगळ्यात शेवटी ठेवण्यात आली आहे. नशीब नशीब म्हणत रडत बसणाऱ्याला आयुष्यात काहीही प्राप्त होत नाही. प्रयत्न केल्यानंतर यश आले नाही तर नशीब म्हणून शांत बसता येते. पण प्रयत्न केले तर वाटेल ते प्राप्त होते हाच सिद्धांत कर्म पद्धतीमध्ये अधोरेखित केला आहे.
प्रत्येक सुभाषित अत्यंत कमी शब्दात अत्यंत श्रेष्ठ अर्थ सांगत आपल्यावर एक एक संस्कार रुजवत जाते हेच या ग्रंथाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. असंख्य पौराणिक संदर्भ वापरत देवतांच्या श्रेष्ठ माणसांच्या आणि पशुपक्षांच्या माध्यमातून सुद्धा महाकवींनी मानवी जीवनात अत्यावश्यक असणाऱ्या विविध मूल्यांना या ग्रंथातून आपल्यासमोर सादर केले आहे. मूल्य शिक्षणाचा हा अलौकिक पाठ आहे. जगाने सन्मान दिलेल्या या ग्रंथाला आयुष्यात एकदा तरी वाचावे म्हणजे आपले देखील जीवन अनेक अंगाने उजळून निघेल यात शंका नाही.
रितिका मनोज राजूरकर
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बीए भाग २
दि. २७. ०७. २०२२
