नैषधीयचरितम्

महाकवी श्रीहर्ष विरचित नैषधीयचरितम् हे अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक महाकाव्य. संस्कृत पंचमहाकाव्यांत नैषधीयचरित्र हे काळाचा विचार करता नवीन आणि विस्ताराने सगळ्यांत विशाल. नैषधचरित, नैषधकाव्य व नैषध, निषधराजचरित अशा नावांनीही हे महाकाव्य ओळखले जाते.



महाकवी श्रीहर्ष विरचित नैषधीयचरितम् हे अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक महाकाव्य. संस्कृत पंचमहाकाव्यांत नैषधीयचरित्र हे काळाचा विचार करता नवीन आणि विस्ताराने सगळ्यांत विशाल. नैषधचरित, नैषधकाव्य व नैषध, निषधराजचरित अशा नावांनीही हे महाकाव्य ओळखले जाते.

श्रीहर्ष नावाच्या कवीने ते रचिले. प्रत्यक्ष ह्या महाकाव्यात आढळणाऱ्या उल्लेखांवरून, तसेच राजशेखर सूरी च्या प्रबंधकोशनामक ग्रंथात आलेल्या श्रीहर्षविषयक माहितीवरून असे दिसते, की श्रीहर्षाच्या वडिलांचे नाव श्रीहरी आणि आईचे नाव मामल्लदेवी असे होते. कनौजच्या विजयचंद्र आणि जयचंद्र ह्या राजांच्या आश्रयास श्रीहर्ष होते. सन्मानचिन्ह म्हणून राजसभेत त्याला दोन तांबूलांचा आणि आसनाचा मान होता. उपर्युक्त बाब लक्षात घेऊन श्रीहर्षाचा काळ बाराव्या शतकाचा उत्तरार्ध असा सामान्यतः मानला जातो.

या महाकाव्याची कथा महाभारतातील नलोपाख्यानावर आधारलेली आहे. हे नलोपाख्यान लहानसेच असले तरी २२ सर्गांचे आणि २,८०० हून अधिक श्लोकांचे महाकाव्य श्रीहर्षाने त्यातून उभे केले आहे. तरीही महत्वाची बाब म्हणजे महाभारतांतर्गत नलोपाख्यानातील सर्व कथानक ह्या महाकाव्यात आलेले नाहीच.

नलदमयंतीचे स्वयंवर आणि कलीचे नलाच्या राजधानीत आगमन इथ पर्यंतचाच कथाभाग येथे आलेला आहे. त्यावरून हे महाकाव्य अपूर्ण राहिले असावे, असेही एक मत आहे.

नैषधीयचरित शीर्षकावरून श्रीहर्षाला समग्र नलकथा ह्या महाकाव्यात आणावयाची होती, असे दिसते. नलकथेच्या उत्तरभागाची पार्श्वभूमीही उपलब्ध महाकाव्यात श्रीहर्षाने निर्माण करून ठेवलेली दिसते. नैषधीयचरिताच्या सतराव्या सर्गात नलदमयंतीची ताटातूट घडवून आणण्याची प्रतिज्ञा कली करतो, त्याअर्थी ह्या प्रतिज्ञेची पूर्तता कली कशी करतो हे उत्तरभागात दाखविण्याचा श्रीहर्षाचा संकल्प असणार, असे वाटते. तथापि ह्या महाकाव्याचा उत्तरभाग आजतागायत उपलब्ध झालेला नाही.

नैषधीयचरिताचा एक प्राचीन टीकाकार चांडुपंडिताने रचिलेली टीकाही फक्त २२ सर्गांपर्यंतची आहे. अशाच अन्य प्रमाणांवरून हे महाकाव्य २२ सर्गांन्तीच पूर्ण झाले असे मानणाराही एख पक्ष आहेच.

नलोपाख्यानातील कथेचा आराखडा श्रीहर्षाने कायम ठेविलेला आहे परंतु काही नव्या प्रसंगांची त्याने केलेली निर्मिती, विस्तृत वर्णने आदींनी हे महाकाव्य विस्तारत गेले आहे. नलाचा मृगयाविहार, हंसाचे ग्रहण, मुक्ती आणि संदेशवहन, दमयंतीचा पूर्वानुराग, विवाहपूर्व विरहव्याकुल दशा, स्वयंवर, कलीबरोबर देवांचे तात्त्विक वाग्‌युद्ध इ. अनेक प्रसंग विस्तारपूर्वक रंगविलेले आहेत. शंभरांहून अधिक श्लोकांचा संपूर्ण ७वा सर्ग दमयंतीच्या आपादमस्तक सौंदर्यवर्णनाला वाहिलेला आहे.

तसेच दमयंतीच्या स्वयंवरवर्णनासाठी कवीने स्वतंत्र सर्ग योजिलेला आहे. सतराव्या सर्गातील अद्वैतवेदान्ताची थोरवी गाईली आहे.
भाषेचे व वृत्तांचे प्रभुत्व, काव्यरचनेच्या आणि अलंकरणाच्या अंगांची दिमाखदार योजना, श्लेष-यमकांच्या चमत्कृती असे काव्यरचनेच्या तंत्राशी निगडीत असलेले गुण श्रीहर्षाच्या ठायी आहेत. कल्पनाशक्तीही. तथापि हे सर्व पांडित्याने प्रकट करण्याचा त्याचा सोस अनावर आहे. काही वेळा औचित्यभंगाचा दोषही त्याच्याकडून घडलेला आहे.

सातव्या सर्गात दमयंतीच्या देहाचे आणि अंगप्रत्यंगांचे वर्णन नल स्वतःच करतो. श्लेषाचा तर श्रीहर्षाने अतिरेकच केलेला आहे. स्वयंवरप्रसंगी प्रत्येक देवाचे आणि स्वतःचेही वर्णन नल दमयंतीपुढे विस्तारपूर्वक करीत असतो, त्यासाठी योजिलेले श्लोक द्वयर्थी आहेत. एक अर्थ देवप्रशस्तीचा दुसरा नलाचे वर्णन करणारा. श्रीहर्षाची विनोदबुद्धी मात्र लक्षणीयपणे व्यक्त झालेली आहे. दमयंतीच्या स्वयंवरप्रसंगी सुंदर, चतुर नलाला पाहिल्यानंतर वरुण, यम, अग्नी व इंद्र ह्या चार देवांची काय अवस्था झाली ते वर्णन करताना तसेच दमयंतीने नाकारलेल्या राजांच्या वर्णनात ह्या विनोदबुद्धीचा प्रत्यय श्रीहर्ष देऊन जातो. काही सुंदर, चमकदार सुभाषितेही या महाकाव्यात आहेत. असे असले, तरी हे काव्य श्रीहर्षानेच त्यासंबंधी म्हटल्याप्रमाणे, विद्वज्जन्यभोग्य आहे.

कु.निकिता सुरेश जुनगरी
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. २२. ०६. २०२२

Author