असतिल तेथे जिकडे तिकडे
विखरुनि पडली फुले
असतिल पक्षी झाडावरती
गोड गात बेसले
असेल तेथे वहात सुंदर
दुधासारखी नदी
असतिल डोलत हिरवी पिवळी
कमळे पाण्यामधी
घरे तेथली सुरेख असतिल
चमकत सोन्यापरी
आत लाविल्या असतिल
रंगी बेरंगी तसबिरी
झगमग झगमग करीत असतिल
तिथले सुंदर दिवे
विझतहि नसतिल ते वाऱ्याने,
जणु दुसरे काजवे
रोजच जत्रा भरत असावी
तिथे नदीच्या तटी
असतिल खाऊ देत घेऊनि
पैसे दाटुमुटी
पंख लावुनि हिंडत असतिल
वरती तिथली मुले
असतिल चालत ढगावरुनहि
टाकित हळु पावले
असतिल भारी रंगित कपडे
बाळांचे तेथल्या
शिवले असतिल शेवंतीच्या
गुंफुनिया पाकळ्या
खूप दागिने असतिल त्यांनी
अंगावर घातले
पुन्हा काढुनि नसतिल कधीही
पेटीमधि ठेवले
मनास माने तितुके भटकत
असतिल मेघांवर
स्वर्ग असा हा बघावयाला
मिळेल का लोकर
Post Views: 27