मिलींद मुळिक हे प्रख्यात चित्रकार प्रताप मुळीक यांचे सुपूत्र. लहानपणी अगदी पाच वर्षांचे असल्यापासूनच मिलींद यांना त्यांच्यामधील नैसर्गिक व प्रतिभावंत चित्रकार गवसला होता. तेरा वर्षांचे असल्यापासून त्यांनी वॉटर कलर्स मध्ये सुंदर व देखणी चित्रे साकारण्यास सुरूवात केली. निसर्गाच्या, प्रत्येक ऋतुंनुसार बदलणार्या सुक्ष्म रूपांना अचूक टिपणारी निसर्गचित्रे, शहरी व ग्रामीण संस्कृतींचे नयनरम्य दर्शन घडवणारी, तिथल लोक जीवन व वन्य जीवन अलगदपणे उलगडणारी चित्रे, स्थीर चित्रे, मुक्तहस्त चित्रे हे प्रांत त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे आहेत.
मिलींद मुळीक यांना भारत सरकारची राष्ट्रीय कौशल्य शिष्यवृत्ती मिळाली होती परंतु त्यांनी तेव्हा कलाक्षेत्रात न जाता इंजिनीअरींग करण्याचा निर्णय घेतला. इंजिनीअरींग ची पदवी मिळवल्यानंतर मात्र त्यांनी आपला पुर्ण वेळ चित्रकलेच्या नव नव्या अविष्कारांच्या निर्मीतीसाठी वेचायचे ठरविले. एकीकडे वास्तुशास्त्राची व चित्रकलेशी निगडीत असलेली व्यावसायिक कामे स्वीकारून दुसरीकडे त्यांनी होतकरू विद्यार्थ्यांना जमवून चित्रकलेचे पाठ शिकवायला सुरूवात केली. त्याचबरोबर मनात दरदिवशी निर्माण होणार्या नवभावनांच्या व विचारांच्या वादळांना सौंदर्यपुर्ण रितीने कागदावर ते उतरवत राहिले, आशयपुर्ण व संवेदनशीलतेला साद घालणारी चित्रे रेखाटत राहिले. सध्या मात्र त्यांनी वास्तुशास्त्र किंवा व्यावसायिक कामे घेण्यापेक्षा वेगवेगळी चित्रे साकारण्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय ते शासनाच्या विद्यापीठांमध्ये जावून तिथल्या विद्यार्थ्यांना जलरंगांची प्रात्यक्षिके करून दाखवतात, शास्त्रोक्त जलचित्रे बनविण्यासाठी मुलांचे कोर्सेस घेतात, त्यांची स्वःतची अशी आर्ट टुडे गॅलरी सुध्दा आहे. त्यांनी अनेक चित्रकलेच्या सामुहिक कार्यक्रमांमध्ये उत्साही सहभाग घेतला आहे, व मुंबई पुण्यामधे मिळुन त्यांचे एकट्याचे असे वीस कार्यक्रम झाले आहेत. मिलींद यांनी निर्माण केलेल्या कित्येक संस्मरणीय कलाकृती ह्या भारतातील व परदेशातील बड्या व्यवसायिकांच्या संग्रही जतन आहेत.