मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. येथे एशिया (६५% लोकसंख्या भारतीय वंशज), युरोप, आफ्रिका या खंडातून आलेल्या लोकांचे वास्तव्य आहे.
मॉरिशस हा देश हिंदी महासागरातील द्वीपसमूहांचा बनलेला देश आहे. यामध्ये मॉरिशस बेट, रोड़ीगेस बेट, आगालेगा बेटे, सेंट ब्रांडन द्वीपसमूह यांचा समावेश होतो. मॉरिशस हे यातील सर्वात मोठे व प्रमुख बेट असून त्यावरूनच देशाला मॉरिशस असे नाव पडले आहे. हे बेट आफ्रिकेच्या सर्वात जवळच्या किनारीप्रदेशापासून २,००० कि.मी. अंतरावर आहे. मॉरिशसचे क्षेत्रफळ २,०४० चौ.कि.मी. आहे. १९ अंश ५० ते २० अंश ५ दक्षिण आणि ५७ अंश ८ ते ५७ अंश ४८ पूर्व या दरम्यान या देशाचा विस्तार आहे. मॉरिशसची लोकसंख्या १,२८८,००० इतकी असून १२ मार्च १९६८ रोजी मॉरिशसचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. २१७ कि.मी. ही समुद्र किनाऱ्याची लांबी आहे. मॉरिशस हे प्रामुख्याने ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेले बेट आहे.
त्यामुळे सभोवताली प्रवाळशील जमिनीची निर्मिती झाली आहे.. पिटोन द ला पेटीट रिव्हिएरे नवार हे देशातील ८२६ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. मॉरिशस बेटावर ६ मृदा प्रकार आढळतात. तेथील काळीमृदा शेतीच्या दृष्टीने सुपीक आणि महत्त्वाची आहे. ग्रँड रिव्हर साऊथ ईस्ट ही सर्वात लांब आणि मोठी नदी आहे. तसेच खोल दऱ्यातून अनेक लहान लहान वाहाणारे नदीप्रवाह ही आढळतात. ग्रँड बासी आणि मारे ऑक्स व्हाकोआस ही दोन मोठी सरोवरे आहेत. यांच्या पाण्याचा जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. मॉरिशसचे हवामान समशितोष्ण कटिबंधीय सागरी आणि आर्द्र प्रकारचे आहे. येथील तापमान १८ ते ३० अंश से.च्या दरम्यान असते.
वार्षिक पर्जन्यमानाचे सरासरी मॉरिशस प्रमाण ९० सें.मी. ते ५०० सें.मी. पर्यंत असते. देशात ६०० च्यावर वनस्पतींचे प्रकार आढळतात; परंतु सध्या या वनस्पतींचे प्रमाण फारच थोडे आहे. त्यामुळे वनस्पती संवर्धनाच्या दृष्टीने पांप्लमूस येथे एका वनस्पती उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्वी आढळणारे बरेच प्राणी नामशेष झाल्यामुळे युरोपीय वसाहतकारांनी कुत्रा, मांजर, उंदीर, माकड, रानडुक्कर, सांबर, हरीण, मुंगूस इ. अनेक प्राणी येथे आणले. डासांचे प्रमाण बरेच असल्यामुळे मलेरियाचे आगमन होऊन त्याचा प्रभाव जवळ जवळ एक शतकभर येथे होता. नाग आणि सापांच्या अनेक जाती येथे आढळतात. मॉरिशस हा कृषीप्रधान देश असून साखर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. निर्यातीच्या उत्पन्नापैकी ७० टक्के उत्पन्न साखरेच्या निर्यातीपासून मिळते. त्यामुळे साहाजिकच ऊस हे देशातील मुख्य पिक आहे. तांदूळ हे येथील प्रमुख अन्न आहे. हिंदू, इस्लाम आणि ख्रिस्ती हे येथील प्रमुख धर्म असून अधिकृत भाषा इंग्रजी आहे. पोर्ट लुईस ही येथील राजधानी असून रुपया हे येथील चलन आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :पोर्ट लुईस
अधिकृत भाषा :इंग्लिश
राष्ट्रीय चलन :मॉरिशियन रुपया (MUR)
सौजन्य : विकिपीडिया