व्यक्तिवेध : लिसा कार्प्रिनी स्थळेकर
बुधवार, १९ मे २०१०
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघामध्ये भारतीय वंशाच्या वा भारतामध्ये जन्मलेल्या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. नासिर हुसेन, हाशिम अमला यांच्यासारखी कितीतरी उदाहरणे देता येतील. ऑस्ट्रेलियाकडूनही एक भारतीय क्रिकेटपटू चमकदार कामगिरी करीत आहे. लिसा कार्प्रिनी स्थळेकर कांगारूंच्या महिला संघाचा आधारस्तंभ ठरली आहे.
नुकत्याच विश्वविजेत्या झालेल्या संघाचे उपकर्णधारपदही तिने भूषविले. इतकेच नव्हे तर काही हंगामांपूर्वी ऑसी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीसुद्धा तिने समर्थपणे पेलली. लिसा जन्माने पुणेकर! मात्र त्यानंतर तिचा पुण्याशी फारसा संबंध आला नाही. बालपणीच कुटुंबीय ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्याने लिसा अनिवासी भारतीय ठरली. वडील महाराष्ट्रीय, आई ब्रिटिश आणि आता वास्तव्य ऑस्ट्रेलियामध्ये, असे आगळे नागरिकत्व लिसाने पटकावले. लिसा क्रिकेटवेडी झाली ती वडिलांमुळे! १९८० च्या दशकामध्ये भारतीय संघाचा सिडनीच्या ऐतिहासिक मैदानावरील कसोटी सामना पाहण्याची संधी मिळाल्यानंतर लिसाने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. शालेय स्तरावर क्रिकेटच्या मैदानात चमकून तिने विभागीय स्तरावर लक्ष वेधून घेतले. त्यानंतर न्यू साऊथ वेल्स संघाची ती नियमित सदस्य ठरली. २००१ पासून कांगारूंच्या संघातील तिचे स्थान अबाधित आहे. उजव्या हाताची घणाघाती फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी अशी उपयुक्त कामगिरी ती करते. विंडीजमधील विश्वचषकात उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ भारतीय महिलांशी पडली. त्यावेळी मिताली राज या ‘टीम इंडिया’च्या भरवशाच्या खेळाडूला बाद करीत लिसाने ४ षटकांत फक्त २५ धावा दिल्या. अंतिम सामन्यात लिसाने चार षटकांत फक्त १९ धावा देत न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा काढणे मुश्कील केले. परिणामी कांगारूंना सलग दुसऱ्या विश्वचषकाचे मानकरी ठरता आले. पाच वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकून देताना लिसाने अर्धशतकी खेळी केली होती. २००७ आणि ०८ अशी सलग दोन वर्षे ऑस्ट्रेलियातील सवरेत्कृष्ट महिला क्रिकेटपटू होण्याचा मान तिने मिळवला. २००७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक समारंभात सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू किताबाच्या शर्यतीत लिसा होती. मात्र भारताच्या ‘झुलान एक्स्प्रेस’, म्हणजेच झुलान गोस्वामीने तो किताब पटकावला. सध्याही गोलंदाजांच्या मानांकनामध्ये झुलानपाठोपाठ लिसा दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये लिसा एक हजार धावा व १०० विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात लिसाचा खेळ बहरतो. अॅडलेड कसोटीमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतर ३० धावांत पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाला डावाने विजय मिळवून दिला होता, तसेच ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत या महिला क्रिकेटविश्वातील आघाडीच्या संघांमध्ये झालेल्या चौरंगी मालिकेत लिसाने ९८ च्या सरासरीने ३९४ धावा कुटल्या. ‘महिला क्रिकेटपटू म्हणून भारतात खूपच कष्टप्रद वाटचाल करावी लागली असती. आता भारतीय क्रिकेट मंडळ महिला क्रिकेटपटूंना चालना देत आहे. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचे बाळकडू मिळाल्याने व्यक्तिमत्त्व व खेळाचा विकास करण्याची खूप संधी मिळाली,’ असे लिसाचे मत आहे. महिला क्रिकेटसाठी टी-२० सामने अतिशय प्रोत्साहनपर आहेत. त्यामुळेच गृहपाठ म्हणून ‘आयपीएल’चे सामने आवर्जून पाहाते, असेही लिसा स्पष्ट करते. मैदानाबाहेर मात्र पाककला आणि चित्रपट पाहण्याची लिसाला खास आवड आहे. वेस्ट इंडिजच्या डिंड्रा ड्रॉटिन या अठरावर्षीय महिला क्रिकेटपटूने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात अवघ्या ४५ चेंडूंत सात चौकार व नऊ षटकारांच्या जोरावर ११२ धावा फटकावल्या. कोणत्याही टी-२० सामन्यामधील हे सर्वात जलद शतक ठरले. महिला क्रिकेटनेही ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला आहे. आता प्रतीक्षा आहे, ती पुरुषांप्रमाणेच पुरस्कर्त्यांच्या गलेलठ्ठ पॅकेजची!