पाऊस खुळा । किति पाऊस खुळा |!
शिंपडून पाणी, आई ! भिजवि फुला ।।धृ।।
नाचे किती वेड्यापरी,
बडेबडे काहीतरी
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ।।1।।
दीनवाणी वेलीबाई,
पांघधराया नाही काही
काय करु, उघडा हा राहे छकुला ! ।।2।।
उचलून आणू काय,
पुसू डोके, अंग, पाय?
काकडून गेला किती
बघ माकुला ! ।।3।।
निजवू या गादीवर,
पांघरुण घालू वर,
देऊ काय, सांग आई,
आणुन तुला? ।।4।।
काय – “नको तोडूं फूल,
वेल – पावसाचें मूल ?
ऊन येतां चमकेल
त्याचा डोळुला? ।।5।।
आणि ‘येऊ मी घरात?
भिजू नको अंगणात ?’
नको आई – ! चमकेन
मीही आपुला ! ॥6॥
मज वेडा म्हणतील ?
फूल शहाणें होईल?
मग वेडी म्हणतील
सगळे तुला ! ।।7॥
Post Views: 12