धवलचंद्र नावाने विख्यात असलेल्या बंगालच्या राजाच्या आश्रयाला असलेल्या नारायण पंडिताने संस्कृतात लिहिलेला नीतिकथांचा एक ग्रंथ म्हणजे हितोपदेश. हितोपदेशाच्या अखेरीस नारायण पंडिताचे नाव ग्रंथकर्ता स्वरूपात नोंदवलेले पाहायला मिळते.
संस्कृतातील बोधकथांचा जगद्विख्यात ग्रंथ विष्णू शर्मा विरचित पंचतंत्र हा हितोपदेशाचा आधार. हितोपदेशातील बऱ्याचशा कथा पंचतंत्रातूनच घेतलेल्या आहेत. हितोपदेशाच्या आरंभीच नारायण पंडिताने पंचतंत्रा चे त्याच्यावर असलेले ऋण मान्य केले आहे.
मित्रलाभ, सुहृदभेद, विग्रह आणि संधी अशा चार परिच्छेदांत हा ग्रंथ विभागलेला आहे.सरळ, सुबोध भाषेत हा ग्रंथ लिहिलेला असून पंचतंत्रापेक्षा त्याची लोकप्रियता अधिक आहे. संस्कृत भाषेच्या विषयातील कौशल्य वाढावे तसेच शास्त्रशुद्ध वर्तणुकीचे ज्ञान प्राप्त व्हावे, हा ह्या ग्रंथरचनेचा हेतू.
मूळ बंगालचा राजा धवलचंद्र ह्याच्या आश्रयास असलेले नारायण पंडित ११व्या किंवा १२व्या शतकात होऊन गेला असावे. या ग्रंथाची मूळ रचना प्रथम बंगाली भाषेत केल्या गेली असे मानले जाते.
इ.स.१३७३ मध्ये या ग्रंथाचे हस्तलिखित नेपाळमध्ये प्राप्त झाले. पंचतंत्राचे ऋण मान्य असले तरी यात पंचतंत्रातील कथांशिवाय काही नवीन कथा विशेषतः पंचतंत्रावरील विविध पाठात आढळणाऱ्या असून, कामंदकीय-नीतिसार या ग्रंथातील बराचसा मजकूर नारायण पंडिताने त्यात अंतर्भूत केला आहे.
या ग्रंथाची निर्मिती बंगालमध्ये झाली असल्यामुळे त्यातील एका कथेत गौरीपूजेचा धर्मविधी सांगितला आहे.त्यावरून नारायण पंडितावर शाक्तधर्माचा प्रभाव असल्याचे स्पष्ट होते. हितोपदेश ग्रंथात संस्कृतातील साध्या सोप्या सुभाषितांचा चपखल उपयोग करण्यात आला आहे.
ग्रंथाच्या सुरवातीस विष्णुशर्मा राजकुमारांना कथा सांगत आहे,असे दर्शवून पंचतंत्राविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. हितोपदेशातील सर्व कथा ह्या प्राणिविश्वाच्या कथा असून प्राणिविश्वाच्या परस्पर संवादातून मानवी जीवनाला उपयुक्त अशी नीतिमूल्ये ह्या कथांमध्ये आढळतात. पंचतंत्राप्रमाणेच या ग्रंथाची शैली सुद्धा साधी,सुबोध व आकर्षक आहे.
या ग्रंथाचे पहिले भाषांतर अब्दुल फजलने केले. पुढे त्याची इंग्रजी व मराठीत अनुक्रमे भाषांतरे झाली.ख्रिस्ती धर्मप्रचारक विल्यम कॅरी आणि सर चार्ल्स विलिकन्झ हे काही इंग्रज प्रमुख अनुवादक होत.
साध्या सोप्या शब्दात संस्कृत भाषा आणि नैतिक सिद्धांत सादर करीत असल्यामुळे हा ग्रंथ रसिकांचा अत्यंत प्रिय आहे.
सपना नंदकिशोर देवतळे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. २
दि. ०५. १०. २०२२
