माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा

प्रारंभी तालुका बोर्डाची निवडणूक जिंकणाऱ्या देवेगौडा यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय अनपेक्षित असाच झाला. त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला, त्यांचा पुढील प्रवास मात्र जनता पार्टी आणि ती दुभंगल्यानंतर जनता दल (से.) असा झाला.



कार्यकाळ: १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७

जन्म: १८ मे १९३३

प्रारंभी तालुका बोर्डाची निवडणूक जिंकणाऱ्या देवेगौडा यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय अनपेक्षित असाच झाला. त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला, त्यांचा पुढील प्रवास मात्र जनता पार्टी आणि ती दुभंगल्यानंतर जनता दल (से.) असा झाला.

भारताचे अकरावे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे कर्नाटकातील जनता दलाचे ज्येष्ठ नेते. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपा या प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ न लाभल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला होता. जनता दलासह अन्य काही प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला आणि देवेगौडा यांची अनपेक्षितपणे पंतप्रधानपदी वर्णी लागली. देवेगौडा यांचा जन्म होलेनरसिंगपुरा तालुक्यातील हरद्दनहल्ली या गावी झाला. १९५३ साली काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या देवेगौडा यांनी नंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत जनता पार्टीत प्रवेश केला. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. कर्नाटकातील रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषविले. त्यानंतर जनता पार्टी दुभंगली. देवेगौडा यांनी १९९४ सालच्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाच्या माध्यमातून सत्ता हस्तगत केली. त्यांची कर्नाटकचे १४वे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. १९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा केला, परंतु बहुमत सिद्ध करता येणार नसल्याचे लक्षात येताच अटलीजींनी अवघ्या तेरा दिवसात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेगौडा यांची नाट्यमयरीत्या पंतप्रधान म्हणून निवड झाली आणि तितक्याच नाट्यमयरीत्या वर्षभराच्या आत त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामाही द्यावा लागला.

Author