दिल से हिंदुस्तानी

गेल्या तीन दशकात म्हणजे उदारीकरणाच्या धोरणानंतर आणि ‘आय.टी.’ सेक्टरची बूम आल्यावर अनेक भारतीय नागरिक जगभरात विशेषत: अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी युरोपियन देश, येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झालेले दिसतात. पण त्याआधी परदेशांत भारतीय नागरिकांचे प्रमाण अपवाद वगळता फारच तुरळक असे. तथापि क्रिकेटमध्ये आढळून येईल की फार पूर्वीपासून अनेक भारतीय खेळाडू वेस्ट इंडिज, इंग्लंड तसेच १९९१ सालानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आले आहेत.



दिल से हिंदुस्तानी

(पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्यरंग’ दिवाळी अंक २०२५)

{लेखाची संक्षिप्त आवृत्ती} 

गेल्या तीन दशकात म्हणजे उदारीकरणाच्या धोरणानंतर आणि ‘आय.टी.’ सेक्टरची बूम आल्यावर अनेक भारतीय नागरिक जगभरात विशेषत: अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी युरोपियन देश, येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झालेले दिसतात. पण त्याआधी परदेशांत भारतीय नागरिकांचे प्रमाण अपवाद वगळता फारच तुरळक असे. तथापि क्रिकेटमध्ये आढळून येईल की फार पूर्वीपासून अनेक भारतीय खेळाडू वेस्ट इंडिज, इंग्लंड तसेच १९९१ सालानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आले आहेत.

यामागचे कारण म्हणजे, क्रिकेट हा खेळ मूळ ब्रिटिशांचा असल्याने ते जिथेजिथे म्हणून राज्यविस्तारासाठी गेले तिथेतिथे क्रिकेट खेळही पोहोचला. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत असे झाले की, ब्रिटिशांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातून विशेषत: उत्तर आणि दक्षिण भागातून अनेक गरीब लोकांना, तिकडे मनुष्यबळ कमी असल्याने उसाच्या मळ्यांतून आणि शेतांमधून काम करायला शेतमजूर म्हणून नेले. ही मंडळी तिथेच स्थायिक झाली आणि ब्रिटिशांनी त्या देशाचा कब्जा सोडल्यावरही तिकडेच स्थिरावली. त्यांच्याच वारसांमधून मग अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निर्माण झाले आणि त्या त्या देशांकडून खेळले.

त्याशिवाय खुद्द इंग्लंडकडून बरेच भारतीय खेळलेले दिसतील, कारण भारताचा त्या देशाबरोबर आलेला दीडशे वर्षांचा (जुलूम-जबरदस्तीचा) संबंध. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडतर्फे खेळलेले बहुतेक भारतीय खेळाडू मात्र अलीकडच्या काळातली स्वत:हून तिकडे स्थायिक झालेल्या पालकांची अपत्ये आहेत. आपला शेजारी देश ‘श्रीलंके’कडूनही खेळलेले भारतीय वंशाचे क्रिकेटपटू अर्थातच आहेत. आता भारतीयांचा वावर आणि क्रिकेटचा प्रसारही जगात सर्वत्र झाल्याने, ICCच्या १०८ मान्यतापात्र देशांपैकी (१२ पूर्ण + ९६ सह-सदस्य) बहुतेक सर्वांचे प्रतिनिधित्व करताना भारतीय वंशाचे खेळाडू आढळतात.

कसोटी दर्जा असणाऱ्या संघांची आकडेवारी बघायची झाल्यास वेस्ट इंडिजतर्फे सर्वाधिक ४२ भारतीय वंशाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत. ही संख्या इंग्लंडसाठी १३, न्यूझीलंडसाठी ८ तर द. आफ्रिका आणि श्रीलंकेसाठी प्रत्येकी ७ एवढी आहे. झिंबाब्वेकडून ३ तर ऑस्ट्रेलियाकडून दोन भारतीयांना हे जमले आहे. यातील विशेष नोंद घ्यावी असे खेळाडू खालीलप्रमाणे सांगता येतील :-

वेस्ट इंडिज – सोनी रामाधीन, रोहन कन्हाय, ऑल्विन कालीचरण, शिवनारायण चंद्रपॉल, रामनरेश सारवान, डॅरेन गंगा, रवी रामपॉल, दिनेश रामदिन, देवेंद्र बिशू, सुनिल नारायण.

इंग्लंड – रणजीतसिंहजी, दुलिपसिंहजी, ईफ्तेकार अलीखान पतौडी, रमण सुब्बाराव, नासिर हुसैन, मार्क रामप्रकाश, रॉनी इराणी, रवी बोपारा, मॉन्टी पनेसर.

न्यूझीलंड – दीपक पटेल, जीतन पटेल, जीत रावळ, ईश सोधी, एजाज पटेल, रचीन रवींद्र.

दक्षिण आफ्रिका – हशीम अमला, केशव महाराज, तबरेझ शम्सी.

श्रीलंका – मुथय्या मुरलीधरन, रसेल अरनॉल्ड, एंजेलो मॅथ्यूज, रवींद्र पुष्पकुमारा.

झिंबाब्वे – अली शाह, उजेश रणछोड.

ऑस्ट्रेलिया – गुरिंदर संधू, तनवीर संघा.

यातील काही विशेष कर्तृत्ववान किंवा वैशिष्ट्यपूर्ण खेळाडूंवर दृष्टिक्षेप टाकणे रंजक ठरेल :-

वेस्ट इंडिज :

सोनी रामाधीन : त्रिनिदाद येथे १९२९ साली जन्मलेले ‘सोनी रामाधीन’ हे वेस्ट इंडिजसाठी कसोटी क्रिकेट खेळणारे भारतीय वंशाचे पहिले खेळाडू होते. मुख्यत: उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी टाकणारे रामाधीन, त्याकाळचे ‘मिस्ट्री स्पिनर’ होते. त्यामुळे अनेक फलंदाज त्यांना खेळताना गोंधळत असत. ते आपला पहिला सामना जून १९५० मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळले. पहिल्याच मालिकेत ते अतिशय यशस्वी ठरले. आल्फ वॅलेन्टाईन बरोबर त्यांची चांगली जोडी जमली आणि त्यांनी इंग्लंडची भंबेरी उडवली. त्यांच्या पराक्रमामुळे वेस्ट इंडिजने प्रथमच इंग्लंडविरुद्ध मालिका ३-१ अशी जिंकली. इंग्लंडविरुद्धच १९५७ च्या मालिकेत एजबॅस्टन येथील कसोटीत त्यांनी एका डावात सर्वाधिक ५८८ चेंडू टाकण्याचा, तसेच पूर्ण सामन्यात ७७४ चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम केला जो अजूनही अबाधित आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४३ कसोटीत १५८ बळी घेतले.

रोहन कन्हाय : ‘रोहन भोलालाल कन्हाय’ या मूलत: तमिळ वंशीय क्रिकेटपटूचा जन्म गयाना बेटावर १९३५ साली झाला. मे-१९५७ मध्ये इंग्लंडविरुद्ध यष्टीरक्षक म्हणून पदार्पण करणाऱ्या कन्हायने नंतर मात्र मधल्या फळीतील शैलिदार व आक्रमक फलंदाज म्हणून क्रिकेटविश्व गाजवले. कन्हायने गॅरी सोबर्सच्या साथीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीड दशकाहून अधिक काळ राज्य केले. त्यांनी ७९ कसोटीत ६२२७ धावा केल्या ज्यात १५ शतके आणि २८ अर्धशतके होती. आपली सर्वोच्च २५६ ही धावसंख्या त्यांनी १९५८ च्या भारत दौऱ्यात नोंदवली. त्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण फटका म्हणजे अनेकदा वेगवान गोलंदाजांना हूक मारताना ते खेळपट्टीवर पाठीवर पडून लोळण घेत असत. महान फलंदाज ‘सुनिल गावसकर’ म्हणतो की रोहन कन्हाय हा त्याने पाहिलेला सर्वश्रेष्ठ फलंदाज होय. इतकेच नाही तर सुनिलने कन्हायच्या आदर व प्रेमापोटी आपल्या मुलाचे नाव “रोहन” असे ठेवले आहे.

ऑल्विन कालीचरण : तमिळ मूळ असलेल्या ‘ऑल्विन आयझॅक कालीचरण’ यांचा जन्म गयानात १९४९ साली झाला. बुटक्या पण आकर्षक डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या कालीचरण यांनी कसोटी पदार्पण न्यूझीलंड विरुद्ध १९७२ साली केले. त्यांनी पदार्पणात शतक तर ठोकलच पण लगेच दुसऱ्या कसोटीतही शतक झळकावले. त्यांनी ६६ सामन्यांत ४३९९ धावा काढताना १२ शतके आणि २१ अर्धशतके फटकावली. मात्र १९८२ साली बंदी घातलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या बंडखोर खेळाडूंच्या दौऱ्यात सामील झाल्याने त्यांची क्रिकेट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. १९७५ आणि १९७९ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघांचेही ते सदस्य होते.

शिवनारायण चंद्रपॉल : कामराज आणि उमा ह्या भारतीय वंशाच्या जोडप्याच्या पोटी ‘शिवनारायण चंद्रपॉल’ ह्याचा जन्म गयाना येथे १९७४ साली झाला. मधल्या फळीतील हा डावखुरा फलंदाज नेत्रसुखद नसला तरी खडूस, लढवय्या आणि सातत्यपूर्ण खेळासाठी लक्षात रहात असे. स्टंपवरच्या बेलला बॅटने पिचमध्ये ठोकून घेतलेला बॅटिंग गार्ड, फलंदाजीचा विचित्र पवित्रा आणि डोळ्यांखाली उष्णताप्रतिरोधक पट्ट्या, ह्या तीन गोष्टींमुळे चंद्रपॉल प्रथमदर्शनीच लक्ष्यवेधी दिसे. मार्च-१९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा चंद्रपॉल इंग्लंडविरुद्धच २०१५ मध्ये अखेरचा सामना खेळला. २१ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीमध्ये त्याने तब्बल १६४ कसोटींमध्ये ५१.३७ च्या सरासरीने ११८६७ धावा काढल्या ज्यामध्ये ३० शतके आणि ६६ अर्धशतके आहेत. २६८ एकदिवसीय आणि २२ टी-२० सामनेही त्याच्या नावावर आहेत. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व त्याचा सहकारी ब्रायन लारा याच्यापेक्षा ही कामगिरी काही अंगुळेच कमी आहे, पण लाराची प्रसिद्धी, लोकप्रियता आणि कौतुक त्याला मिळाले नाही. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात विश्वविक्रमी ४१८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याचे १०४ धावांचे मोलाचे योगदान होते. संथ, संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपॉलने २००३ सालीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच अवघ्या ६९ चेंडूत शतक झळकावले होते. लाराच्या निवृत्तीनंतर अतिशय दुबळ्या झालेल्या विंडीजच्या फलंदाजीला त्याने स्थैर्य दिले व अनेकदा आपल्या संघाला आपल्या चिवट, लढाऊ फलंदाजीने सावरले.

रामनरेश सारवान : गयानामध्ये १९८० साली जन्मलेल्या ‘रामनरेश सारवान’ याने ८७ कसोटीत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. त्यात ह्या मधल्या फळीतील आकर्षक फलंदाजाने ५८४२ धावा केल्या असून त्यामध्ये १५ शतके तर ३१ अर्धशतके आहेत. १८१ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामनेही त्याच्या नावावर आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २९१ त्याने इंग्लंड विरुद्ध २००९ मध्ये नोंदवली. अखेरचा कसोटी सामना तो जून-२०११ मध्ये भारताविरुद्ध खेळला. २००६ मध्ये ‘सेंट किट्स’ कसोटीत त्याने भारताच्या मुनाफ पटेल या जलदगती गोलंदाजाला एका षटकात ६ चौकार ठोकण्याचा पराक्रम केला.

इंग्लंड :

रणजीतसिंहजी : गुजरातच्या नवानगर संस्थानचे महाराजा असलेल्या ‘रणजितसिंहजी विभाजी जाडेजा’ हे इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळणारे पहिले भारत-वंशीय खेळाडू होते. ते १८९६ ते १९०२ या कालावधीत इंग्लंडकडून १५ कसोटी सामने खेळले ज्यात त्यांनी ९८९ धावा केल्या. त्यांनी लेग-ग्लान्स ह्या मुलायम फटक्याचा शोध लावला असे म्हणतात. ते एक महान भारतीय फलंदाज म्हणून गणले जातात आणि त्यांच्याच नावे भारतातील प्रतिष्ठित ‘रणजी’ क्रिकेटस्पर्धा आयोजित केली जाते.         

दुलिपसिंहजी : रणजितसिंहजी ह्यांचे पुतण्या असलेले ‘कुंवर श्री दुलिपसिंहजी’ यांचा जन्म काठियावाड येथील राज्यघराण्यात झाला. त्यांनी इंग्लंडसाठी १९२९-१९३१ या कालावधीत १२ कसोटी सामन्यांमध्ये ५८.५२ च्या सरासरीने ९९५ धावा केल्या. ते सुद्धा एक महान भारतीय फलंदाज मानले जातात आणि भारतातील प्रसिद्ध ‘दुलिप’ चषक क्रिकेटस्पर्धा त्यांच्याच नावे आयोजित केली जाते.

ईफ्तेकार अलीखान पतौडी : ‘ईफ्तेकार पतौडी’ हे एकमेव असे खेळाडू आहेत की ज्यांनी (१९३२ ते १९४६) या काळात भारत व इंग्लंड या दोन्ही देशांचे प्रत्येकी ३ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले.  तसेच त्यांनी भारताचे त्या तीनही कसोटी सामन्यांत नेतृत्व केले होते. ते पतौडी या संस्थानचे नवाब होते व पुढे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवलेले ‘मन्सूर अलीखान पतौडी’ हे त्यांचे पुत्र होत.

रमण सुब्बाराव : तेलगू वडील आणि ब्रिटिश आई असलेल्या ‘रमण सुब्बाराव’ यांचा जन्म १९३२ साली लंडन येथे झाला. शैलिदार डावखुरे सलामी फलंदाज असलेल्या रमण यांनी प्रारंभिक क्रिकेट केंब्रिज विद्यापीठ आणि सरे परगण्यासाठी खेळल्यावर, त्यांनी पहिला कसोटी सामना न्यूझीलंड विरुद्ध १९५८ मध्ये खेळला. त्यांनी १३ कसोटीत ९८४ धावा ४६.८५ च्या सरासरीने काढल्या, ज्यात ३ शतके आणि ४ अर्धशतके होती. स्लिपमधील चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या व्यवसायाकडे पूर्णवेळ लक्ष्य देण्यासाठी त्यांनी अवघ्या २९ व्या वर्षी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर काही वर्षांनी त्यांनी इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांचे रेफ्री म्हणूनही काम बघितले.

नासिर हुसैन : मद्रास(चेन्नई) मध्ये जन्मलेल्या ‘नासेर हुसैन’चे वडील तमिळ-मुस्लिम होते तर आई ब्रिटिश. ईसेक्स परगण्याच्या हुसैनने इंग्लंडकडून ९६ कसोटी सामने खेळले आणि त्यात तब्बल ४५ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि ५७६४ धावा काढल्या. त्याचबरोबर तो ८८ एकदिवसीय सामने खेळला आणि त्यातील ५६ सामन्यांत त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले.

रॉनी इराणी : ‘रॉनी इराणी’चे वडील जिमी इराणी हे मुंबईत जन्मलेले पारशी गृहस्थ होते तर आई ब्रिटिश होती. लॅंकेशायरचा अष्टपैलू रॉनी इंग्लंडसाठी ३ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळला. विशेष म्हणजे तो आपला पहिला कसोटी, तसेच पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना भारताविरुद्धच खेळला. इंग्लंडसाठी खेळलेला तो आतापर्यंतचा एकमेव भारतीय-पारशी क्रिकेटपटू आहे.

न्यूझीलंड :

दीपक पटेल : केनियातील नैरोबी येथे जन्मलेला ‘दीपक पटेल’ हा न्यूझीलंडसाठी खेळणारा पहिला भारतीय वंशाचा क्रिकेटपटू ठरला. त्याने ३७ कसोटी सामन्यांमध्ये १२०० धावा केल्या आणि ७५ बळी घेतले. ७५ एकदिवसीय सामने खेळणारा दीपक खरा हीरो ठरला ते त्याच्या १९९२च्या एकदिवसीय विश्वचषकातील कल्पक फिरकी गोलंदाजीमुळे.

एजाज पटेल : मुंबईत जन्मलेला ‘एजाज पटेल’ वयाच्या १० व्या वर्षी कुटुंबासहित ऑकलंड येथे स्थायिक झाला आणि आता न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. डिसेंबर-२०२१ मध्ये भारताविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर त्याने एका डावात ११९ धावा देवून १० बळी मिळवण्याचा पराक्रम केला. असे करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या नंतरचा तिसराच गोलंदाज ठरला.

दक्षिण आफ्रिका :

हशीम अमला : सुरत(गुजरात) येथील पूर्वज असलेल्या ‘हशीम मोहम्मद अमला’ याचा जन्म दरबान(नाताळ) येथे ३१-मार्च-१९८३ रोजी झाला. भरघोस लांब दाढी, पूर्ण टक्कल आणि कायम शांत चेहरा, अशा व्यक्तिमत्वामुळे अमला लक्ष्य वेधून घेत असे. त्याचे कसोटी पदार्पण २००४ मध्ये भारताविरुद्ध झाले तर अखेरचा सामना तो श्रीलंकेविरुद्ध २०१९ मध्ये खेळला. १२४ कसोटी सामन्यांत त्याने २८ शतके आणि ४१ अर्धशतके यांच्या सहाय्याने ९२८२ धावा काढल्या. त्याशिवाय १८१ एकदिवसीय आणि ४४ टी२० सामने तो खेळला आहे. कसोटीतील ३११नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या त्याने इंग्लंडविरुद्ध नोंदवली आणि त्रिशतक झळकवणारा तो आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला. २०१० साली त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामने दोन्हीमध्ये एका वर्षात १००० धावा काढण्याचा विक्रम केला. २०१०च्या भारत दौऱ्यात त्याने दोन कसोटीत केवळ एकदा बाद होत तब्बल ४९० धावा ठोकून काढल्या. कलकत्ता कसोटीमध्ये त्याने दोन्ही डावात शतके करण्याचा पराक्रम केला. फेब्रुवारी-२०१३ मध्ये ICC फलंदाजांच्या क्रमवारीत तो अग्रस्थानी होता.

केशव महाराज : दरबान(नाताळ) येथे १९९० मध्ये जन्मलेला ‘केशव आत्मानंद महाराज’ हा डावखुरा फिरकी गोलंदाज आता आफ्रिकेचा कसोटी संघातील अविभाज्य घटक बनलेला आहे. १८७४ मध्ये त्याचे पूर्वज सुलतानपूर(उ.प्र.) येथून द.आफ्रिकेत स्थायिक झाल्याची नोंद आढळते. त्याचे कसोटी पदार्पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोव्हेंबर २०१६ मध्ये झाले. आतापर्यंत ५९ कसोटी सामन्यांत त्याने २०३ बळी घेतले आहेत. त्याशिवाय ५४ एकदिवसीय आणि ३९ टी२० सामने तो खेळला आहे. श्रीलंकेविरुद्ध २०१८ मध्ये त्याने डावातील ९/१२९ तसेच सामन्यातील १२/२८३ ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली. जून-२०२१ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि असे करणारा तो आफ्रिकेचा दुसराच गोलंदाज ठरला. त्याची ६ अर्धशतके असून खालच्या क्रमांकावर येवून अनेकदा तो संघाचा डाव सावरत असतो.

श्रीलंका :

एंजेलो मॅथ्यूज : तमिळ पिता आणि बर्घर-वंशीय माता यांच्या पोटी ‘एंजेलो डेव्हिस मॅथ्यूज’ याचा जन्म कोलंबोमध्ये १९८७ साली झाला. २००८ साली श्रीलंकन एकदिवसिय संघात अस्सल अष्टपैलू खेळाडू म्हणून पदार्पण करणारा मॅथ्यूज कसोटी संघात उपयुक्त गोलंदाजी करणारा भरवश्याचा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून स्थिरावला. अनेक प्रमुख फलंदाजांच्या निवृत्तीनंतर तो श्रीलंकेच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ बनला. पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा मॅथ्यूज ११९ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ९० टी२० सामने खेळला. कसोटीत त्याने ८२१४ धावा केल्या असून, मध्यमगती गोलंदाजीने ३३ बळी घेण्याबरोबरच ७८ झेलही टिपले आहेत. त्याने ३४ कसोटीत नेतृत्व केले असून वयाच्या २५ व्या वर्षी तो श्रीलंकेचा सर्वात तरुण कप्तान झाला. २०१४ मध्ये त्याच्या कर्णधारपदात श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्येच कसोटी मालिका प्रथमच जिंकण्याचा पराक्रम केला.

मुथय्या मुरलीधरन : आपल्या लेखातील शेवटचा पण कामगिरीबाबत सर्वात यशस्वी अश्या “मुथय्या मुरलीधरन” ह्या फिरकीच्या जादूगाराचा जन्म ‘सिंहास्वामी व लक्ष्मी’ या तमिळ आईवडिलांच्या पोटी कॅंडि येथे १९७२ मध्ये झाला. उजव्या हाताने ऑफ स्पिन टाकणारा ‘मुरली’ इतर ऑफ-स्पिनर प्रमाणे बोटांनी चेडू न वळवता, आपल्या निसर्गदत्त अतिशय लवचिक अशा मनगटाच्या सहाय्याने चेंडूला फिरकी देत असे. मुरलीने कसोटी पदार्पण मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९२ मध्ये केले. चेंडू हातभर वळवण्याच्या कौशल्याला, त्याने सरळ जाणारा जलद चेंडू (टॉप स्पिन), बाहेर वळणारा चेंडू (दुसरा), अशी विविध अस्त्रे जोडल्याने तो फलंदाजांचा कर्दनकाळ ठरू लागला. चेंडू वळवण्यासाठी त्याला खेळपट्टीच्या अनुकूलतेची गरज लागत नसे. ‘दगडावर वा काचेवरही चेंडू वळवू शकेल’ असे त्याच्याबाबतीत कौतुकाने म्हटले जाई.

१९९५ नंतर काही ऑस्ट्रेलियन पंच, अवैधरित्या चेंडू फेकण्याच्या आरोपाखाली मुरलीला दंडित, गोलंदाजीस प्रतिबंधीत करू लागले. ह्या अडचणीच्या काळात कर्णधार अर्जुना रणतुंगा आणि श्रीलंकन बोर्ड ठामपणे त्याच्यामागे उभे राहिले व त्यांनी ICC बरोबर दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे मुरलीची ह्या किटाळातून सुटका झाली व पुढे अनेक जागतिक विक्रम करत तो दीर्घकाळ क्रिकेट खेळला. तो अखेरची कसोटी जुलै २०१० मध्ये भारताविरुद्ध खेळला ज्यामध्ये त्याने ८ बळी मिळवत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. त्याने एकूण १३३ सामने खेळत ८०० बळी मिळवले. डावात ९/५१ तर, कसोटीत १६/२२० ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. एकदिवसीय क्रिकेटमध्येही सर्वाधिक ५३४ बळी त्याच्या नावावर असून १९९६ च्या एकदिवसीय विश्वविजेत्या श्रीलंकन संघाचा तो अविभाज्य घटक होता.

मुरलीचे जागतिक क्रिकेटमधले काही विक्रम आणि साध्य केलेल्या काही विशेष गोष्टी खालीलप्रमाणे :-

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी, एकाच मैदानावर सर्वाधिक बळी, डावात ५-बळी सर्वाधिक वेळा, सामन्यात १०-बळी सर्वाधिक वेळा, सामन्यात १०-बळी सलग ४ कसोटीत तेही २ वेळा; कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक चेंडू, मालिकावीराचा पुरस्कार सर्वाधिक वेळा, सर्व संघांविरुद्ध कसोटी सामन्यात १० बळी; ४००,५००,६००,७००,८०० बळी मिळवणारा सर्वात तरुण गोलंदाज व ही कामगिरी सर्वात जलद.

*****

हे झाले पुरुषांच्या क्रिकेटबद्दल, पण जाता जाता महिला क्रिकेटचा उल्लेख करावाच लागेल. सध्या  बाळसे धरलेल्या महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची महान अष्टपैलू खेळाडू ‘लिसा स्थळेकर’, इंग्लंडची ‘ईशा गुहा’, वेस्ट इंडिजची ‘अनिसा अहमद’ आणि दक्षिण आफ्रिकेच्या ‘ट्रिशा चेट्टी’ व ‘शबनिम ईस्माइल’ या विशेष कर्तृत्ववान भारतीय वंशाच्या महिला खेळाडूंची नोंद घेणे क्रमप्राप्त आहे.

असे हे परदेशात जन्मून किंवा स्थायिक होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे भारतीय वंशाचे वीर, ज्यांची मुळे हिंदुस्तानी होती किंवा आहेत. सद्य काळातील भारतीयांच्या आणि क्रिकेटच्या वैश्विक संचारामुळे, भविष्यात आपल्याला असे आणखी कित्येक गौरवास्पद दाखले दिसतील यात शंका नाही.

** (सर्व आकडेवारी ‘सप्टेंबर २०२५’ पर्यंतची )

 गुरुप्रसाद दि पणदूरकर (माहिम, मुंबई)

लेखकाबद्दल

This is gurudaspandoorkar

सर्व लेख पहा →