क्यूबा (स्पॅनिश: República de Cuba) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य, ईशान्येस बहामास व टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, पश्चिमेस मेक्सिको, दक्षिणेस केमन द्वीपसमूह व जमैका तर आग्नेयेस हैती व डॉमिनिकन प्रजासत्ताक हे देश आहेत. हवाना ही क्यूबाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
स्पॅनिश महान नाविक ख्रिस्तोफर कोलंबस येथे इ.स. १४९२ मध्ये पहिल्यांदा दाखल झाला. काही काळातच स्पेनने हा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. पुढील अनेक शतके स्पेनची वसाहत राहिल्यावर १८९८ सालच्या अमेरिका-स्पेन युद्धानंतर १९०२ साली क्यूबाला स्वातंत्र्य मिळाले. पुढील काही दशके येथे लोकशाही राहिल्यानंतर १९५२ साली फुल्गेन्स्यो बतिस्ताने क्यूबामध्ये येथे हुकुमशाही स्थापन केली. बतिस्ताच्या जुलुमी राजवटीविरुद्ध क्रांती उभारणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो ह्या सेनानीने लष्करी लढा देऊन १९५९ साली बतिस्ताची सत्ता उलथवून लावली. १९६५ सालापासून क्यूबामध्ये कॅस्ट्रो व त्याचा भाऊ राउल कास्त्रो ह्यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी प्रशासन अस्तित्वात आले. शीत युद्धादरम्यान क्यूबा सोव्हियेत संघाच्या निकटवर्ती राष्ट्रांपैकी एक होता.
जगात अस्तित्वात असलेल्या फार थोड्या कम्युनिस्ट राजवटींपैकी एक असलेल्या क्यूबामध्ये सध्या राजकीय स्थैर्य व सुबत्ता आहे.
क्यूबा हा अमेरिकेतील फ्लॉरीडा द्विपकल्पाच्या दक्षिणेस असलेला देश आहे. वेस्टइंडिज द्विपसमुहापैकी हे सर्वात मोठे बेट आहे. क्यूबाचे क्षेत्रफळ १,१०,९२२ चौ.कि.मी. आहे. १९ अंश ४९ ते २३ अंश १५ उत्तर आणि ७४ अंश ८ ते ८४ अंश ५७ पश्चिम या दरम्यान क्यूबाचा विस्तार आहे. याची पूर्व पश्चिम लांबी १, २०० कि.मी. तर दक्षिणोत्तर रुंदी ४० ते २९०.कि.मी. आहे. ३,५०० कि.मी.चा समुद्र किनारा याला लाभलेला आहे.
क्यूबाच्या उत्तरेस अटलांटिक महासागर आणि फ्लॉरीडांचे द्विपकल्प व बहामा बेटे आहे.
पूर्वेस विंडवर्ड पॅसेज आणि हैती, दक्षिणेस कॅरिबियन समुद्र, त्यातील जमेका इ. बेटे, पश्चिमेस मेक्सिकोचे आखात व युकातान द्विपकल्प हे देश आहेत. मेक्सिको आणि पनामा यांच्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी क्यूबाचे स्थान असल्यामुळे त्याला महत्त्व आहे. हवाना ही क्यूबाची राजधानी आहे. क्यूंबाची लोकसंख्या ११,२३६,४४४ इतकी असून २० मे, १९०२ हा क्यूबाचा स्वातंत्र्य दिन आहे. क्यूबामध्ये गोमूखाच्या आकाराची अनेक उत्तम नैसर्गिक बंदरे आहेत. येथील मृदा तांबूस रंगाची असून ती ऊसासाठी आणि इतर पिकांसाठी चांगली आहे. दक्षिण किनाऱ्याला समांतर पूर्व पश्चिम पर्वतराजी असून १, ९७३ मी. उंचीचे पीकोतुर्किनो हे क्यूबामधील सर्वात उंच शिखर आहे. या भागात लोखंड, तांबे, निकेल, मँगेनिज इत्यादींच्या खाणी आहेत. क्यूबाची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची १०० मीटरच्या जवळपास आहे. येथील किनारा दलदलीचा असून क्यूबात मोठ्या नद्या किंवा सरोवरे नाहीतं; परंतु लहान आकाराच्या २०० नद्या आहेत. येथील सर्वात मोठी नदी कॉटो ही आहे. क्यूबाचे हवामान उपोष्ण कटिबंधीय आहे. १० अंश से. ते ३२ अंश से. पर्यंत येथील तापमानाचे प्रमाण असते. ७५ से.मी. ते १६५ से.मी. पर्यंत पावसाचे प्रमाण असते. ऊस, कॉफी, कोको, केळी, डिंक, सळ, ओक, मॉहॉगनी, आकाना इ. पिके आणि वृक्ष उत्पन्न देणारे आहेत.
२५ मी. पर्यंत उंच वाढणारा रॉयल पाम हा क्यूबाचा राष्ट्रीय वृक्ष असून त्याचे सर्व भाग उपयोगात येतात. येथील सिबा हा रेशमासारखा मऊ आणि शेवरीसारखा कापूस देणारा वृक्ष आहे.. नारळ, सॅव्हाना जातीचे गवत इत्यादीचेही बरेच प्रमाण आहे. सफरचंद, सिताफळ, ॲव्होकॅडो आणि पपई ही येथील प्रमुख फळे आहेत. क्यूबात मोठ्या प्राण्यांची संख्या कमी असून लहान जातीचे प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. वटवाघळे, गोगलगाई, मगरी इत्यादींचे इ. प्राणी आढळतात. समुद्र किनाऱ्यामुळे माशांपासून बरेच उत्पन्न मिळते. क्यूबातील उद्योग हे राष्ट्रीय मालंकीचे आहेत. दूध, खाद्यपदार्थ यांचे हवाबंद डबे, सिगारेट, औद्योगिक रसायने, प्लास्टिक, रंग, लाकूड यांचे कारखाने आहेत. १८ टक्के खनिज तेलाचा पुरवठा क्यूबामधून युरोपिय देशांना होतो.
क्यूबाचा मुख्य धर्म ख्रिस्ती असून अधिकृत भाषा स्पॅनिश आहे. पेसो हे येथील चलन आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : हवाना
अधिकृत भाषा : स्पॅनिश
स्वातंत्र्य दिवस : मे 20, 1902
राष्ट्रीय चलन : क्युबा पेसो, क्युबन परिवर्तनीय पेसो
( Source : Wikipedia )