चौकशी जीवनानेच केली

प्रदीप निफाडकरांची गझल



चौकशी जीवनानेच केली
हासलो, वेळ मारून नेली

बोलणे तिखट माझे जरासे
शब्द माझा, गुळाची न भेली

दृष्ट लागू नये सुखाला
मी व्यथेलाच केले रखेली

चंद्र येणार होता म्हणाला
वाट पाहून थकली चमेली

मुत्त* वावर इथे आठवांचा
हदय हे की,भुतांची हवेली

रामराज्यात आपण जगू ही
आमची आज इच्छाच मेली

— प्रदीप निफाडकर

Author