जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांची एक विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले. भारतातील आवाज साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चरचे ते आद्य प्रणेते आहेत …. त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले … किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले संगीतकार आहेत.
July 8, 2022
गिरीश वासुदेव हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ होते. १९९१ च्या उदारीकरणानंतर देशात येणार्या परदेशी गुंतवणुकीला साचेबद्ध आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
February 5, 2019
नंतर १९६० चे दशक त्यांनी अक्षरशः गाजवले. “गोड गोजिरी लाज लाजरी‘, “परिकथेतील राजकुमारा‘, “मैनाराणी चतुर शहाणी…‘ ही कल्ले यांची गाणी चांगलीच गाजली. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली.
September 26, 2019
सुरेश खरे हे महाराष्ट्राला नाटककार म्हणून परिचित असले तरी ते एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट लेखक, समीक्षक, संवादक, सूत्रसंचालक, संस्थाचालक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. परफॉर्मिग आर्ट्सशी संबंधित जवळजवळ सगळे प्रकार त्यांनी हाताळले आहेत.
सुरेश खरे यांचा जन्म २५ जानेवारी १९३८ रोजी झाला. १९६० साली सुरेश खरे यांनी मित्रांच्या साहाय्याने ’ललित कला साधना’नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या द्वारे त्यांनी रंगमंचावर अनेक नाटके सादर केली. जेव्हा नाटके मिळेनाशी झाली तेव्हा स्वत:च ’सागर माझा प्राण’ हे नाटक लिहिले आणि त्यांच्यातल्या नाटककाराचा जन्म झाला.
सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. सुरेश खरे लिखित ’काचेचा चंद्र’मुळे डॉ. श्रीराम लागू आणि ’मला उत्तर हवंय’ या नाटकामुळे विजया मेहता, या अभिनेत्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास यशस्वीरीत्या सुरू झाला.
दूरदर्शनवर गाजलेला ’नाट्यावलोकन’ नावाचा नाट्यास्वादाचा कार्यक्रम सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता. दूरदर्शनवरच ’गजरा’” नावाच्या कार्यक्रमात सुरेश खरे यांनी लिहिलेल्या नाटुकल्या सादर होत असत.
सुरेश खरे यांना १९९९ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा राम गणेश गडकरी यांच्या नावाचा गडकरी पुरस्कार मिळाला आहे. सुरेश खरे हे २००५ साली भरलेल्या ८५व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मा.सुरेश खरे यांची वेबसाईट.
http://www.sureshkhare.com/biography_m.php
January 27, 2017
‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची त्यांची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी त्या आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९६८ रोजी झाला. किशोरी शहाणे यांचे शिक्षण मिठाबाई कॉलेज मध्ये झाले. त्यांना मिठाबाई कॉलेजमध्ये मिस मिठाबाई हा किताब मिळाला होता. किशोरी शहाणे यांचा पहिला चित्रपट माहेरची साडी.त्या स्वतः डान्सर आहेत, भारतात व परदेशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. किशोरी शहाणे यांची निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट "ऐका दाजिबा' यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअॅलिटी शोज इत्यादीतून त्यांनी कामे केली आहेत. ३० वर्षं त्या मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. पती दीपक बलराज वीज हे निर्माते आहेत. आता किशोरी शहाणे या ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित हॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत. किशोरी शहाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 23, 2017
गोखले, शरद
सरळ नाकाचा, डोक्यावरचे छप्पर जवळजवळ उडालेले, बोलताना जरासा अनुनासिक उच्चार, लाघवी वागणे अशी व्यक्ती बाजारात सहज भेटली तरीही तुमच्या लक्षात येणार नाही, की आदल्या रात्री रंगमंचावर आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे ते हेच शरद गोखले. वयाच्या पस्तिशीत संगीत रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शरद गोखले यांना आयुष्यभर संगीताने स्वरमय साथ दिली.
जयराम आणि जयमाला शिलेदारांच्या संगीत रंगभूमीवर मनापासून सेवा करणारा हा व्रतस्थ कलावंत आयुष्यभर सहजपणे जगू शकला, याचे कारण त्याचे आयुष्य केवळ संगीतावरच अवलंबून होते. संगीत सौभद्र, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी अशा अनेक नाटकांमधून विविधरंगी भूमिका करताना शरदरावांनी आपल्या गायनावर नेहमी लक्ष केंद्रित केले. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीची पक्की तामील मिळाल्यामुळे अभिजात संगीताची उत्तम जाण होतीच. ग्वाल्हेर गायकावर लालित्याचे संस्कार करण्याचे कसबही विनायकबुवांनीच शिकवले असणे शक्य होते. कारण स्वत: विनायकबुवा हेही संगीत रंगभूमीचे पाईक होते. त्यांच्या काळात ही रंगभूमी ऐन भरात होती. शरद गोखले यांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. संगीत रंगभूमी जवळजवळ अस्तंगत होण्याच्या मार्गावर असताना छोटा गंधर्व आणि शिलेदार कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांमुळे ही संगीत रंगभूमी पुन्हा कात टाकू लागली होती. विनायकबुवांकडे गाणे शिकत असतानाच त्यांचे पुत्र रामचंद्र पटवर्धन यांच्याकडून तबला वादनाचे शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठीही गोखले यांनी कष्ट घेतले. लयतालावरील हुकमत आणि रागज्ञानाची शिदोरी यांच्या जोरावर संगीत रंगभूमीवरील पदार्पण करणे त्यांना शक्य झाले. ग. श्री. खैर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू झालेल्या ‘अनाथ विद्यार्थीगृह’ या एका अनोख्या सामाजिक चळवळीचा भाग होण्यासाठी शरद गोखले या संस्थेत अध्यापक म्हणून काम करू लागले. पण अध्यापनाबरोबरच संगीत स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती त्यांनी रंगभूमीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या जगण्यात खरा आनंद निर्माण करणारा ठरला. उत्तम मैफली गवई होण्याची क्षमता असतानाही गोखले यांनी रंगभूमीला आपलेसे केले. रंग लावून रंगमंचावर जाताना त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या गळ्यातील गाणे त्यांना सतत साद घालत होते. त्यामुळे शिलेदार कुटुंबातील जयराम, जयमाला, कीर्ती, दीप्ती यांच्यासारख्या तालेवार कलावंतांबरोबर काम करताना आपली गायन साधनाच आपल्याला मदत करू शकणार आहे, याची पुरेपूर जाणीव शरद गोखले यांना होती. या सगळ्या कलावंतांबरोबर देशभर दौरे करताना त्यांनी आपली अभिजात संगीताची तालीम बंद होऊ दिली नाही. ज्या काळात संगीत हा प्राधान्याचा विषय असणाऱ्या आकाशवाणीचे शरद गोखले हे नेहमीचे यशस्वी कलावंत ठरले. संगीत रंगभूमीवरील दीर्घ कारकीर्दीबद्दल मिळणारे पुरस्कार हा अविभाज्य भाग होता. परंतु गोखले यांनी संगीतावरील आपले चिंतन सतत सुरू ठेवले. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एक हुन्नर संपला आहे.
------------------------------------------------------------------------------
पंडित शरद गोखले यांचे निधन
जयराम शिलेदार यांच्या मराठी रंगभूमी संस्थेतील ज्येष्ठ गायक व अभिनेते पं. शरद घनश्याम गोखले (७१).
संगीत सौभद्र, स्वयंवर, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी, विद्याहरण, शारदा, कान्होपात्रा, एकच प्याला ही त्यांची नाटके गाजली.
गोखले ह्यांचा जन्म दि. २६ मे १९४० ला झाला. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे त्यांनी संगीत अलंकारापर्यंतचे धडे गिरवले.
August 5, 2017
अनुताई वाघ ह्या आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ अशी ख्याती असलेल्या समाजसेविका.
त्या पुण्यातील हुजूरपागा शाळेत १३ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. महात्मा गांधीजींच्या “खेडयाकडे चला” या आदेशाने प्रेरित होऊन १९४५ साली ग्रामसेविकांच्या शिबिरात दाखल झाल्या. तेथे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. बोर्डी येथे बालवाडीत शिक्षिका म्हणून अनुताईंनी काम केले. त्याकाळात बालवाडीत मुले येत नसल्यामुळे अनुताईंनीच मुलांच्या अंगणात जायचे ठरवले. त्यातूनच आंगणवाडी या संकल्पनेचा जन्म झाला.
१९५६ पासून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर “कोसबाडच्या टेकडीवरून” , “कुरणशाळा” , “टिल्लूची करामत”, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले.
अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र, आदर्श माता, सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार, रमाबाई केशव ठाकरे या पुरस्कारांसोबतच भारत सरकारच्या “पद्मश्री” या किताबाने देखील सनमानित करण्यात आले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
(2 सप्टेंबर 1886 ते 25 डिसेंबर 1957)
बहुविविध प्रकारचे ललित व वैचारीक लेखन करणारे लेखक. स्वंतत्र प्रज्ञाचे शैलिकार साहितिक, नामवंत प्राध्यापक , अस्पृश्यासाठी कार्य करणारे समाजसेवक, जन्म विदर्भातील शिरपुर हया गावी. शिक्षण सातारा व पुणे येथे. न्यु इग्लिश स्कुल सातारा आणि न्यु इंग्लिश स्कुल पुणे या शाळेतुन अध्ययन केल्यानंतर 1935 ते 1946 हया कालखंडात सर परशुरामभाऊ महाविद्ययालयात ते इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक होते. प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी व फलदायी ठरली. माटे यांच्या वाड्गमय आंरभीच्या काळी त्यांनी `केसरी प्रबोध` हया ग्रंथाचे संपादक म्हणून परीश्रम पुर्वक काम केले. माटे यांनी या ग्रंथासाठी लेखनही केले. महाराष्ट्र सावत्सरिक हा माटे यांनी संपादलेला आणखी एक महत्त्वपुर्ण ग्रंथ होय. विविध संवत्सरीचा माटे यांनी आभ्यास केला. आणि महाराष्ट्रासाठी स्वंतत्र संवत्सरीचा आभ्यास केला. रोहीणी या मासिकाचे माटे हे पहिले संपादक. शास्त्रीय ज्ञानाचे आणि विज्ञान प्रसाराचे महत्त्व जाणुन त्यांनी `विज्ञानबोध` संपादिला.
March 12, 2015
काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. "पहाडी" सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती छटा दाखवता येतात आणि आपले बुद्धिकौशल्य मांडता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणून खैय्याम यांचे नाव घ्यावेच लागेल.
संस्कारक्षम काळात पंडित अमरनाथ यांच्याकडे शागिर्दी केली आणि आपला कलासंगीताचा पाया घोटवून घेतला. याचे फायदा पुढे जेंव्हा चित्रपटसृष्टीत यायचे ठरविले तेंव्हा तिथे आधीच कार्यरत असलेले पंडित अमरनाथ आणि त्यांचे बंधू - हुस्नलाल/भगतराम यांना साथ करणे क्रमप्राप्तच ठरते. त्याचबरोबरीने विख्यात कवी फैझ-अहमद-फैझ यांच्या संगतीने काव्याचा अभ्यास करून घेतला. याचा पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत होताना, निश्चित फायदा झाला असणार . अर्थात एकूण कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, एकूण ५० एक चित्रपटांना संगीत रचना करणे, हे काही प्रचंड कार्य नव्हे परंतु जे चित्रपट केले, त्याच्यावर स्वतः:ची नाममुद्रा उमटवली, हे विशेष म्हणायला लागेल.
"शामे गम की कसम' सारखे गाणे कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात देऊन, त्यांनी स्वतः:ची ओळख जगाला करून दिली. त्यांनीच एकेठिकाणी म्हटल्याप्रमाणे, गाण्यात कुठलेही पारंपरिक तालवाद्य वापरले नसून, "डबल बेस" आणि "स्पॅनिश गिटार" सारख्या स्वरिक वाद्यांकडून ताल पुरवला गेला. या रचनेने, खैय्याम विशेष प्रसिद्धीस आले. असे म्हणता येईल.
काही मूल्यमापन करायचे झाल्यास, १) मोठा वाद्यवृंद वापरानेवा वाद्यांचा हात राखून उपयोग करणे. वरील गाणे - शामे गम की कसम", "कहीं एक मासूम लडकी" किंवा " आज बिछडे है" ही गाणी ऐकताना आपल्याला प्रत्यय येईल. यांत वाद्य गदारोळ नाही, संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर एक शांत भाव. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण तलतचा नाजूक स्वरकंप किंवा भूपिंदर सिंगचा मृदू गणोच्चार मनात ठसतो. २) याच संदर्भात एक आणखी बारकावा विचारात घ्यावासा वाटतो. काही अपवाद वगळता त्यांनी छेडण्याची तंतुवाद्ये आणि पियानो यांच्या माध्यमातून दीर्घ सुरावटीचे आकृतिबंध विणण्यावर भर दिला. उदाहरणार्थ "जीत लेंगे बाझी हम तुम" या रचनेत महत्वाचा गीतारंभ फक्त पियानोवर सोपवला आहे. तसेच पहाडी रागावरील "बहारो मेरा जीवन भी संवारो" या गाण्यात सतार इत्यादी वाद्ये दीर्घ आणि आवाहक स्वरबंध निर्माण करतात.
एक आश्चर्याची बाब - समान स्वरबंध त्यांनी काही गाण्यात सहजपणे वापरले आहेत. "कभी कभी मेरे दिल में" आणि " सिमटी हुई ये घडिया" किंवा "परबतो के पेडो पर" आणि "बहारो मेरा जीवन भी संवारो" तसेच "फार छिढी रात" आणि "आयी झंजीर" ही गाणी आलटून, पालटून स्वरसाम्यासाठी तपासावीत. खैय्याम यांना सुरावटीच्या नाविन्याची अप्रूप नाही, असे नाही. कारण सुरांची समानता ज्या गीतांत जाणवते त्या गीतांत देखील ते सूक्ष्म बदल करीतच असतात. परंतु कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते, यावर त्यांचा गाढा विश्वास असावा.
खैय्याम यांना खरी अमाप लोकप्रियता मिळाली ती "उमराव जान" चित्रपटाच्या संगीताने. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च अढळ असे स्थान. त्यामुळे गझल हे त्यांचे मर्मस्थान होय, असे विधान करता येऊ शकते. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या चित्रपटातील गाण्यांत छेडण्याच्या वा गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे. त्यामुळे मुजरा नृत्ये असूनही त्यात एक आदबशीर शृंगार अवतरलेला आहे. "दिल चीझ क्या" या गीतांत बिहाग रागातील भावस्पर्शी सुरावट आढळते. "इन आँखो की मस्ती" या गाण्यात तर भूप रागाचा तिरोभाव अतिशय मनोरमपणे सादर केला आहे. असाच प्रयत्न त्यांनी "जिंदगी जब भी" या गीतात गौडसारंग रागापासून दूर सरकत साधला आहे. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पहा असे गर्जून न सांगता ही गीते आपला भाव-परिणाम सिद्ध करतात. मानसिक किंवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशी गझलची मागणी असते. त्याचा नेमका प्रत्यय या स्वररचनेतून अनुभवायला मिळतो.
मोजका वाद्यमेळ आणि संयत गायन, याच्या साहाय्याने रचनासंबद्ध निश्चितता सादर करण्याची कामगिरी सर्वांनाच जमत नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय येतो आणि हेच खैय्याम यांचे खरे यश.
- अनिल गोविलकर
August 6, 2018
‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय गीतांसह ‘कुदरत’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले गायक म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ. लहानपणापासूनच राकट पण तितकाच श्रवणीय आवाज लाभलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांचे त्याकाळी बालगंधर्व यांनी भरभरुन कौतुक केले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, पंडित सदाशिवराव जाधव यासारख्या दिग्गजांकडे त्यांनी गायनाचे शास्त्रोक्त धडे घेतले होते. ऑर्केस्ट्रा क्षेत्रमध्ये त्यांनी आपल्या गायना कारकीर्दीची सुरुवात केली.
एका कार्यक्रमात संगीतकार राम कदम आलेले असताना त्यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून ,चित्रपटात पाश्र्वगायनाची त्यांना संधी दिली. पुढे अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून एकापेक्षाएक सुरेल गाणी सादर करुन कानसेनांना अक्षरश: मंत्रमुगध केले. त्यांचे “कुदरत” चित्रपटातील “सुखदुख की हर एक माला” आणि “अशांती” चित्रपटातील “शक्ती दे मां” ही गीतं आज देखील रसिकांच्या मनात घर करुन आहे. तर मराठीत “निसर्गराजा ऐक सांगतो”, “कोण होतीस तू, काय झालीस तू”, “अजून आठवे ती रात पावसाळी”’, “अरे कोंडला कोंडला देव”, “दूर का तू साजणी”, “जाई ग जाई पांडोबा”, “पांडोबा पोरगी फसली पांडोबा ”, “माणसं रे माणसं”, “देवमानुस देवळात आला”, “अन् हल्लगीच्या तालावर”, “अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत निसर्गात भरूनी राहे अनादि अनंत” ही गाडगीळ यांची आवाजातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली!
तसंच ‘अष्टविनायक’ या मराठी चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा” या गीतातील दोन कडवी गाडगीळ यांनी स्वरबद्ध केली होती. मराठीमध्ये राम कदम तर हिंदीत आर.डी.बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रवींद्र जैन अश्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. केवळ गायक म्हणूनच नव्हे तर संगीतकार म्हणूनही चंद्रशेखर गाडगीळ यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदी चित्रपटांमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत झालेल्या अनेक गाण्यांना गाडगीळ यांनी स्वरसाज चढवला आहे.
मन्ना डे आणि महमद रफी यांच्या गायनातील सुरांची सर्फा आपल्याही गळ्यात यावी, यासाठी अभिजात संगीताबरोबरच उच्चार आणि शब्दफेक यांचा त्यांनी अभ्यास केला होता. गायिका रश्मी समवेत त्यांनी “रश्मी ऑर्केस्ट्रा”ची स्थापना केली. पुढे चंद्रशेखर गाडगीळ यांनी ‘स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली. युवा संगीतकारांना, गायकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. “माणसापरिस मेंढरं बरी” या चित्रपटातील एका गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून चंद्रशेखर गाडगीळ यांना राज्य शासनाच्या पुरस्काराने, तर २०१० यावर्षीच्या “राम कदम कलागौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. चंद्रशेखर गाडगीळ यांचे २ ऑक्टोबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- सागर मालाडकर
October 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti