अमजद खान, अमरीश पुरी यांच्यानंतर चे सर्वात खतरनाक वाटणारे हिंदी - मराठी चित्रपटातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांना आपल्या वडिलांचा व्यवसाय असतानाही, मात्र शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाट्य स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता.
"हॅंडस् अप', हे त्यांचे अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे यांच्या समवेतचे पहिले व्यावसायिक नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकातल्या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. याच नाटकातली त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक आणि निर्माते गोविंद निहलानी यांनी त्यांना "अर्धसत्य' या चित्रपटात ओम पुरी यांच्या समवेत भूमिका दिली होती. या चित्रपटातली त्यांनी केलेली बेरक्या आणि धूर्त, कटकारस्थानी "रामा शेट्टी'ची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या समर्थ अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडले.
१९९१ मध्ये "सडक' या चित्रपटात त्यांनी तृतीय पंथियाची केलेली भूमिका गाजली होती. याच भूमिकेबद्दल त्यांना "फिल्मफेअर' पुरस्कारही मिळाला होता. रंगभूमीवरच्या नाटकात त्यांना भूमिका करणे विशेष आवडत असले, तरीही चित्रपटाच्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे, पुढे त्यांना मोजक्याच नाटकात भूमिका करता आल्या. सदाशिव अमरापूरकर म्हणजे दुष्ट खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसला. पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, विरू दादा, जवानी, फरिश्ते, या चित्रपटातल्या त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांनी हुकूमत या चित्रपटात पहिला खलनायक रंगवला होता. त्यानंतर त्यांनी याच अभिनेत्याबरोबर अनेक चित्रपटात खलनायकाच्या हुकमी भूमिका केल्या.
विविध प्रकारच्या खलनायकाच्या भूमिका रंगवणाऱ्या अमरापूरकर यांनी स्वत:ला त्याच चौकटीत अडकवून मात्र घेतले नाही. उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, असा लौकिकही त्यांनी मिळवला. हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, ओरिया यासह अन्य भाषातल्या ३०० च्या वर चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘अर्धसत्य’, ‘सडक’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी प्राप्त केले होते. अहमदनगरच्या स्नेहालय, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कृतज्ञता निधी, अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यासह अनेक संस्थात ते सक्रिय होते. या संस्थांना त्यांनी आर्थिक मदतही केली होती. सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
१९२६ साला पासून या स्टॅन लॉरेल व हार्डी जोडीनी खरी धमाल सुरू केली. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता.
त्यांच्या लेखनात गुन्हेगारी थ्रिलर्स, निबंध, साहित्यिक टीका, कथा यांचा समावेश असतो. त्यांचे आठखंडी रामायण विशेष गाजलं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित मालिका आल्या आणि गाजल्या आणि आता फिल्म्स येत आहेत.
मार्च २०२१ मध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात ७ तासात ७ हजार किलो मिसळ शिजवण्याचा आणि ३ तासात ३००० सामाजिक संस्थांमार्फत ३० हजार गोरगरिब, गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम केला गेला आहे.
सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनालीने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या 'आग' सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) यांची नावे सामील आहेत. सोनालीने आपल्या ११ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास ३० सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. २००३ मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो ना हो' सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सिनेमातून सोनालीने कमबॅक केले. सोनाली बराच काळ चित्रपटांपासून दूर होती. कमबॅक करत तिनं एक-दोन चित्रपट केलेही, पण नंतर तिनं टीव्हीकडे मोर्चा वळवला. 'क्या मस्ती क्या धूम', 'इंडियन आयडॉल', 'इंडियास गॉट टॅलेंट', 'सिनेस्टार की खोज' असे एकामागोमाग एक रिअॅलिटी शोज तिला मिळत गेले. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील ‘छम छम करता है ये नशिला बदन’ या गाण्याच्या तालावर आपल्या सर्वांना थिरकायला लावून सोनाली ने एक धक्का दिला होता. सोनाली ने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक कथेच्या स्वरुपात आणि तिच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना येणारे सुखद अनुभव याबरोबरच आयुष्यातील चढ-उतार त्यांनी नीटनेटकेपणे मांडले आहेत. या पुस्तकात सोनाली बेंद्रे ने आपल्या मुलासोबतचे वेगवेगळे अनुभव मांडले असून चांगले पालक होण्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजते. सोनालीने निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
`भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी’ हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले.
उत्तम टेनिस खेळणारी मार्टिना नवरातिलोव्हा झेकोस्लोव्हाकियाहून अमेरिकेत आली. ती कायमचे अमेरिकेत राहायचे हा निर्णय पक्का करून.
असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते.
सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. सुमित्रा भावे या मुळच्या पुण्याच्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुणे येथे झाला. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन त्यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. तरुण वयात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्त निवेदन ही केले.
१९६५ साला पर्यत त्या टाटा इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होत्या. टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्या १९८५ पर्यत सोशल वर्क फिल्डमध्ये काम करत होत्या. त्यात दहा वर्षे पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन, अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या कास्प- प्लान या झोपडपट्टी वस्त्यामधील मुले व कुटूंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुख पदाचा कार्यभार या अनुभवानानंतर त्यांनी पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले. या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्रीं यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्या पर्यंत पोहचविण्याच्या ईर्षेतुन त्या १९८५ सालापासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या.
सुमित्रा भावे या काही मूळच्या चित्रपट किवा कला क्षेत्रातील नाहीत. त्यांचा पिंड समाजसेवकाचा. समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यावेळी वाणिज्य शाखेत शिक्षणारा आणि नाट्य उपक्रमामध्ये रमलेला विद्यार्थी सुनिल सुकथनकर त्यांना सहकारी म्हणुन लाभला. त्यांचा बाई हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर या दोन व्यक्तीमत्वांचे कार्यक्षेत्र भिन्न होते, परंतु ध्येय एकच होते, ते म्हणजे सामाजिक जागृती. योगायोगाने ते एकत्र आले. समांतर चित्रपट आजपर्यंत सरंजामशाही, शोषण, अत्याचार, विवाहबाह्य संबंध या पलिकडे गेला नव्हता. या दिग्दर्शक द्वयीने ' दोघी, वास्तूपुरूष' यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोहोचविले.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीने चौदा चित्रपट, ५० हुन अधिक लघुपट, ३ दुरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. जिंदगी जिंदाबाद, १० वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, हा भारत माझा, संहिता, अस्तु,दोघी, कासव असे त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुस्कार, तसेच झी, स्क्रीन, म.टा. सन्मान आदी पुरस्कार मिळाले आहेत. देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटांचे स्वतंत्र कथा- पटकथा- संवाद लेखन, सुमित्रा भावे यांनीच केले असुन संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सुनिल सुकथनकर यांनी यातील अनेक चित्रपटांसाठी तसेच इतरही काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. कर्नाटकातील शाश्वकती या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी एका भाषेतील अभिजात साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा कामधेनु पुरस्कार सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहिता लेखनातील साहित्यिक मुल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी यांच्या चित्रपटातुन मानवी मन, नाते संबंध आणि समाज मन यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एम.के.सी.एल. या संस्थेसाठी ‘ माझी शाळा’ ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणारी दुरदर्शन मालिका निर्माण केली होती. मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. त्यांना केरळ मधील अरविंदन स्मृती पुरस्कार, सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार, साहिर लुधियानवी - बलराज सहानी प्रतिष्ठान तर्फे दिला गेलेला के.ए.अब्बास स्मृती पुरस्कार मिळाले आहेत.
सुमित्रा भावे नेहमी म्हणतात माझा सिनेमा गल्ला भरण्यासाठी कधीच नव्हता आणि भविष्यातही नसेल. त्याचे दुःखही मला वाटत नाही. या सिनेमांसाठी प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी व्हावी, असेही कधी वाटले नाही. मी एक सिनेमाची अभ्यासक आहे आणि मानवी भाव-भावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. त्यामागे केवळ सकस समाजनिर्मितीचाच प्रामाणिक उद्देश असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत असत. अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला.चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या नावानं बारसं केले होते, अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला.
नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्या पाठोपाठ आलेला जंजीर चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची अंग्री यंग मॅन ची प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्याविरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच 'सुपरस्टार' पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले. आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटाच्या यादीत अभिमान, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, नसीब, लावारीस, सिलसिला, नमकहलाल, कुली, शराबी, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. मा. अमिताभ बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम, शतरंज के खिलाडी, लगान आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. ज्येष्ठ अभिनेत्री जया भादुरी याच्याशी १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
१९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही. १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, १९८४ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने या महानायकाचा गौरव केला आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत.
विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत. त्यांनी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली. २००० मध्ये 'कौन बनेगा करोडपती' या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या पंचाहत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. गेली १७ वर्षे ते केबीसी साठी सूत्रसंचालन करत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti