बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे घराणे भिक्षुकांचे. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १८४९ रोजी मिरजजवळील बेगड येथे झाला. त्यांचे वडील रामभट,यांनी भिक्षुकी सोडून साताऱ्याचे बाळाजीबुवा यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. आपल्या मुलानेही गाणे शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. वयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले. बाळकृष्णाला भिक्षुकीची गोडी नसल्यामुळे गायन शिकण्यासाठी तो वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडला. पुढे वडीलही वारले. फिरत फिरत तो धार येथे देवजीबुवांकडे गाणे शिकण्यास राहिला. तीन वर्षे त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर गुरुपत्नीच्या त्रासामुळे बाळकृष्ण धार सोडून गाणे शिकण्यासाठी ग्वाल्हेरला गेला. तेथील हस्सूखाँचे शिष्य वासुदेवराव जोशी यांच्याकडे तो गायन शिकण्यास गेला. प्रथम वासुदेवबुवांनी गाणे शिकवण्यास नकार दिला. पण पुढे एक वर्षाने बनारस येथे त्यांनी बाळकृष्णबुवांना शिकविण्याचे कबूल करून, पुढे सहा वर्षे चांगले शिक्षण दिले.
बाळकृष्णबुवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आले. श्रीमंत बाबासाहेब घोपरडे, इचलकरंजीकर यांच्याकडे जवळजवळ ३० वर्षे दरबार-गवई म्हणून राहिले. पं. बाळकृष्णबुवा अत्यंत भरतीदार व यशस्वी गायक होते. त्यांची गायकी साधी, निर्मळ, भारदस्त व सौंदर्यपूर्ण होती. खास ग्वाल्हेर गायकीचा प्रचार महाराष्ट्रात बाळकृष्णबुवांनीच केला. मिरज आणि इचलकरंजी येथे त्यांचेकडे पुष्कळ लोक शिकू लागले. बाळकृष्णबुवांच्या आधीही महाराष्ट्रात ख्याल गायकी रूढ होतीच; पण तिच्या विस्तृत प्रमाणावरील प्रसाराचे श्रेय बाळकृष्णबुवांनाच दिले जाते. त्यांच्या दोन शिष्य-शाखा सर्वश्रुत आहेत.
पहिल्या शाखेत पं. विष्णू दिगंबर पलुस्कर व त्यांच्या गांधर्व महाविद्यालयातून शिकून तयार झालेले विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व शंकरराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, वामनराव पाध्ये, प्रा. बा. र. देवधर इ. नामवंत गवयांचा समावेश होतो; तर दुसऱ्या शाखेत मिराशीबुवा, अनंत मनोहर जोशी, त्यांचे चिरंजीव गजाननराव, तसेच शिष्य बापूराव गोखले व त्यांचे शिष्य राजारामबुवा पराडकर इ. प्रसिद्ध गवयांचा अंतर्भाव होतो. १९२५ मध्ये त्यांचे चिरंजीव तरुण, सिद्धहस्त गायक अण्णाबुवा मृत्यू पावले, या घटनेचा त्यांच्यावर जबरदस्त आघात होऊन पं. बाळकृष्णबुवा हे इचलकरंजी येथे मृत्यू पावले.संगीतातील ‘भीष्माचार्य’, ‘गायनाचार्य’ ह्या पदव्या रसिकांनी त्यांना स्वेच्छेने बहाल केल्या होत्या. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे ८ फेब्रुवारी १९२७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोष
तलत या नावातच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला.तलत यांचा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. तलत यांच्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते पण तलत यांचा आवाज हा सर्वसामान्य माणसाचा होता. त्यामुळे सानुनासीक, किंचीत कापरा आवाज ही त्याची मर्यादा न ठरता तोच त्यांचा सर्वोत्तम गुण ठरला. त्याच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहीला. सुरुवातीच्या काळात तलत महमूद पार्श्वगायक म्हणून नव्हे तर गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते. त्यांना त्या काळी प्रतिसैगल म्हणूनच ओळखत होते. तलत अगदी लहानपणापासूनच सैगलचा वेडा होते. लखनौतील सनातनी वृत्तीच्या त्यांच्या वडिलांना हे गाण्याचे वेड बिलकुल पसंत नव्हते. तलत मात्र सैगलची गाणी, गझला पाठ करायचा व हुबेहूब सैगलप्रमाणे गायचे. मुकेश, रफीच्या सुरुवातीच्या जमान्यातील हे तलत स्वत:च्या चाहत्यांचा एक वर्ग निर्माण करू शकले. मुळात तलत हे एक गझलगायक होते. गझल व गीत ही दोन्ही भावगीतेच व तलत हा भावपूर्ण आवाजात गाणारा गायक. गझल गाताना कवीच्या मूळ शब्दांची संगत तो कधीच सोडत नसे. तेथे तडजोड नव्हती. आपल्या येथील जगजितसिंग, राजेंद्र मेहता ह्या गझल गायकांनी पाकिस्तानी गझलगायक मेहदी हसनची शैली उचलली आहे. याच मेहदी हसनला ‘पाकिस्तानचा तलत महमूद’ म्हणून ओळखायचे. तलतचा आवाज हा मुळातच निर्मळ प्रीतीचा आवाज होता. वासनेचा लवलेशही त्यात दिसत नसे. अभिनेता म्हणूनही त्यांनी एकुण १३ चित्रपटात काम केलं. त्यापैकी नऊ चित्रपटात त्यांनी नायकाची भुमिका केली. "दिल-ए-नादान", " एक गांव की कहानी", "लालारुख" आणि "सोने की चिडीया" ही त्यातली काही नावे. दोन मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. त्यापैकी "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातले "यश हे अमृत झाले" हे गाणे लोकप्रिय ठरले. तलत यांच्या गाण्यामध्ये मधुरतेबरोबरच शोकात्मतेचाही सूर होता. तलत यांनी ईंडस्ट्रीतल्या जवळपास सर्वच संगीतकारांकडे सारखेच काम केले. त्यांचे उर्दु उच्चार हे इतर कुठल्याही गायकापेक्षा जास्त स्वच्छ होते. मजरुह सुलतानपूरी, साहीर यांचे सुरवातीच्या काळातले खास उर्दू काव्य, त्याला खरा न्याय तलतनेच दिला. "शाम-ए-गम़ की कसम" हे त्याचेच एक उदाहरण आहे. तलत महमूद यांनी एकूण ७४७ गाणी गायली ज्यात ४८१ फिल्मी आणि तब्बल २६६ गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे. एकूण २९३ चित्रपटांसाठी पार्श्वगायन त्यांनी केले. तरीही एकाही चित्रपटासाठी त्याला पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार काही मिळाला नाही. काही संगीतकारांनी त्याच्यातील मधुरतेला झुकते माप दिले, तर काहींनी शोकात्मतेला. शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल बिश्वास, या संगीतकारांनी तलतला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले व सामान्य लोकांना त्याची गाणी गुणगुणायला लावली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण सन्मानाने गौरवले होते. मा.तलत महमूद यांचे ९ मे १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तलत महमूद यांची काही गाणी.
शाम-ए-गम़ की कसम
ये हवां ये रात यें चांदनी
मैं दिल हुं ईक अरमान भरा
रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिए
हमसे आया न गया
सिनें में सुलगते है अरमान
ऐ मेरे दिल कहीं और चल
तस्विर बनाता हुं
जलतें है जिसके लिए
रात ने क्या क्या ख्वाब दिखायें
दूरदर्शनच्या सरकारी काळया-पांढऱ्या पडद्यावर १९७० च्या दशकात चैतन्य फुंकले ते कमलेश्वर आणि तबस्सुम या द्वयीने.. कमलेश्वर यांनी दूरदर्शनला सामाजिक-वैचारिक परिमाण दिले, तर तबस्सुम यांनी पसत मनोरंजनाचे परिमाण.
तनुजा यांचा जन्म एका चित्रपटसृष्टीशी निगडीत कुटुंबात झाला. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला. बालपणी तनुजा यांना आई आणि आजीचे इतके प्रेम मिळाले, की ५० च्या दशकात त्यांना टॉम बॉय पुरस्कार मिळाला. त्या पार्टीमध्ये ग्लॅमरस ड्रेस परिधान करायच्या, खुलेआम सिगारेट आणि दारू पित होत्या. त्या काळातील ट्रॅडिशन अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या तनुजा बिनधास्त आयुष्य जगत. त्याचा परिणाम अनेकदा त्याच्या सिनेमांवरसुध्दा दिसत होता. तनुजा यांना आजही ‘बहारें फिर आएंगी’, ‘ज्वेल थीफ’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘अनुभव’ या सिनेमांसाठी ओळखले जाते. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली आणि गुजराती सिनेमांमध्येही आपले टॅलेंट दाखवले आहे. समर्थ कुटुंबात जन्मलेल्या तनुजा यांचे पती दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर होते. तर आई शोभना समर्थ या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तनुजाच्या बालपणी त्यांचे आईवडील विभक्त झाले होते. तनुजा यांना त्यांची आई शोभना यांनी सिनेसृष्टीत लाँच केले होते. तनुजा यांच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती शोभना समर्थ यांनी केली होती. तनुजा यांनी १९५० मध्ये 'हमारी बेटी' या सिनेमाद्वारे बालकलाकाराच्या रुपात फिल्मी करिअरला सुरुवात केली. मुख्य अभिनेत्री म्हणून १९६० मध्ये रिलीज झालेला 'छबीली' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. मात्र १९६१ मध्ये रिलीज झालेल्या 'हमारी याद आएगी' या सिनेमाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.
स्वतःला यशस्वी अभिनेत्री म्हणून सिद्ध केल्यानंतर सुद्धा तनुजा यांची तुलना नेहमी बहीण नूतनसोबत होत राहिली. करिअरच्या काही वर्षांत वहिनी आणि सहायक अभिनेत्रींच्या भूमिका केल्यामुळे तनुजा यांचे फिल्मी करिअर हवे तसे यशस्वी होऊ शकले नाही. तनुजा आणि शोमू मुखर्जी (दिग्दर्शक-निर्माते) यांची पहिली भेट ‘एक बार मुस्कुरा दो’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. एका वर्षांच्या डेटिंगनंतर १९७३ मध्ये दोघांनी लग्न केले. मुख्य अभिनेत्री म्हणून यश न मिळाल्याने तनुजा यांनी पुढे सेकंड लीड भूमिका करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या 'प्रेम रोग'मध्ये त्या अशाच भूमिकेत होत्या. बलराज साहनी यांचा मुलगा परीक्षित साहनीच्या पहिल्या 'पवित्र पापी' सिनेमात तनुजा यांनी अविस्मरणीय अभिनय केला. त्यानंतर त्या, भाभी, मावशी आणि आई भूमिका साकारू लागल्या. त्यांनी काही मालिकांमध्येसुध्दा काम केले. 'एन ऑगस्ट रेक्विम' नावाच्या इंग्रजी सिनेमातसुध्दा तनुजा झळकल्या होत्या. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'मध्ये त्या दिसल्या होत्या. या सिनेमात काजोलचा पती आणि तनुजा यांचा जावई अजय देवगण मुख्य भूमिकेत होता.
तनुजा यांनी छबीली, बहारें फिर आएंगी, ज्वेल थीफ, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथी, अमीर-गरीब, याराना, सोनी महिवाल, 'आज और कल', ‘बहारे फिर भी आएगी’, ‘दो चोर’, ‘दो दूनी चार’, ‘घराना’, ‘हाथी मेरे साथी’, ‘ज्वेल थीफ’, ‘जीयो और जीने दो’ आणि ‘प्रेमरोग’सारखे हिट सिनेमे केले आहेत. त्यांना दोन उत्कष्ट सहायक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१४ मध्ये त्यांना फिल्मफेअर कडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया
संस्कार म्हणजे नक्की काय?
बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं.
प्रेम आणि मातृत्वाचा साक्षात्कार घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत व वाणीत होती, अशा मा.साने गुरुजी यांच्या `श्यामची आई' या अवीट गोडीच्या पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात ९ फेब्रुवारी १९३३ साली झाली. स्थळ होते, नाशिकचा तुरुंग व समोर श्रोते होते, तुरुंगात विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे कैदी. स्वातंत्र्य चळवळीत सत्याग्रह केल्याच्या `गुन्ह्या'साठी साने गुरुजीही सजा भोगत होते., कैद्यांना रात्री आईच्या गोष्टी सांगतानाच साने गुरुजी त्या आठवणी लिहून काढत राहिले. पाच दिवसांत म्हणजे १३ फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पुस्तक लिहीले.
`श्यामची आई' ही साने गुरुजींच्या लहानपणीच्या जीवनाची गोष्ट. पांडुरंग सदाशिव साने नावाचा कोकणातला मुलगा त्याच्या आई-वडिलांसह परिस्थितीशी झुंज देत देत मोठा होतो. वडिलांच्या पडत्या काळात घर सांभाळतानाच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, म्हणून आईची चाललेली धडपड रोजची अनुभवतो. या साऱ्याचे त्याच्या बालमनावर खोलवर परिणाम होत राहतात. तीच स्पंदने `श्यामची आई' मध्ये टिपलेली आहेत. यातला `श्याम' म्हणजे स्वत: साने गुरुजी. स्वत:ला स्वत:पासून दूर करून आत्मकथन करण्याचा विलक्षण वेगळा व कठीण प्रयोग साने गुरुजींनी `श्यामची आई'ची रचना करताना साकारला. तो कमालाचीचा यशस्वीही झाला.
`श्यामची आई'च्या प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक `रात्र' असे आहे. अशा ४२ रात्रींत श्यामच्या आईचे कथानक पूर्ण होते. `श्यामची आई' वाचताना ज्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत, असा माणूस क्वचितच सापडेल. हे कथानक म्हणजे खरे तर गद्य रुपात साने गुरुजींनी रचलेले काव्यच आहे.
त्यावर आधारित `श्यामची आई' हा मराठी चित्रपट आचार्य अत्रे यांनी १९५३ साली निर्माण केला. तो प्रचंड गाजलाच, शिवाय त्याच वर्षीपासून सुरू झालेला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार याच चित्रपटाला मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शामची आई पुस्तक गुगल प्ले स्टोअर वर
https://play.google.com/store/apps/details?id=sahityachintan.shyamchiAai
रोशनलाल नागरनाथ उर्फ रोशन यांनी लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला होता. त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ रोजी पाकिस्तानातील गुजरानवाला येथे झाला. पुढे उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ काढला. त्यानंतर लखनौच्या मॉरिस संगीत महाविद्यालयातून संगीतात एम. ए. केले आणि दिल्ली रेडिओ स्टेशनवर पियानोवादक म्हणून नोकरी सुरू केली. बडोदा रेडिओस्टेशन वर नोकरी करत असताना प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा यांचे लक्ष रोशनकडे गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये रोशन संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले. १९४९ मध्ये "नेकी और बदी" चित्रपटाच्या वेळी रोशनच्या काही चाली आवडल्याने त्यांनी स्नेहल भाटकरांना तीन चार महिने रजा देऊन त्या चित्रपटाचे काम रोशनला दिले. चित्रपट आणि गाणी सपशेल अयशस्वी झाली. रोशन यांच्या १९४९ ते १९६७ अश्या आपल्या कारकीर्दीत आपल्या पहिल्या १९४९ ते १९६० काळात अभिजात, शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली. मात्र हे चित्रपट आणि गाणी गाजली नाहीत. या काळात आलेले मल्हार, अनहोनी, नौबहार, रागरंग, आगोश, बराती, रंगीन रातें, मधु, अजी बस शुक्रिया, अश्या चित्रपटातली गाणी ऐकली तर हे प्रकर्षाने लक्षात येते. आणि १९६० ते १९६७ काळात म्हणजेच दुसऱ्या भागावर मुख्यतः मुसलमानी संगीताचे वर्चस्व राहिले आहे. बरसात की रात, ताजमहल, बाबर, नूरजहाँ, बेदाग, वगैरे चित्रपटातली गाणी ऐकली तर हे लक्षात येईल. अर्थात आरती, ममता, भीगी रात असे मुसलमानी संगीत नसलेलेही चित्रपट या काळात आले. नवीन कवींना संधी देणारा संगीतकार अशी रोशन यांची प्रतिमा होती. नुसतेच नवीन नाही तर जुन्या काळातले "हम भोर के दिये है बुझतेही जा रहे है" असे अस्ताला चाललेल्या पिढीचे तनवीर नकवी, डी. एन. मधोक, खुमार बारा बंकवी, नक्षब यांच्यासारखे, त्या काळातले शैलेंद्र, मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यासारखे प्रस्थापित, इंदीवर, आनंद बक्षी, नक्ष ल्यालपुरी यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि पुढे प्रस्थापित झालेले, सत्येंद्र, कैफ इर्फानी, उद्धवकुमार, वीर मोहंमद पुरी, शिवकुमार, राहिल गोरखपुरी असंख्य होतकरू गीतकार तसेच गीतकार नसूनही हौस म्हणून एखादे गाणे लिहिणारी संगीतकार उषा खन्ना यांच्यासारखे सर्व प्रकारचे गीतकार या काळात रोशनच्या संगीतात दिसतात. इंदीवर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते" मी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशनमुळे. रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कवितेसारखे झाले पाहिले असे सांगत असे, एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे निवडत असे. "त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे कवी आणि कवितांमधील विविधता. जरी संगीतकार रोशनचे नाव घेतल्यावर साहिर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी या दोनच गीतकारांची नावी प्रामुख्याने समोर येत असली तरी ५३ चित्रपटांसाठी रोशन यांनी ५२ गीतकारांबरोबर काम केले. रोशन यांचे १६ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / मनोगत.
महाश्वेता देवी यांचे वडील मनीष घटक एक कवी आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाका येथे झाला. महाश्वेतादेवी किशोरवयीन असतानाच त्यांचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. लहान वयातच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
महाश्वेतादेवी यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. साहित्य संपदा ज्ञानपीठ, साहित्य अकादमी हे साहित्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळवणा-या महाश्वेता देवी यांनी बंगाली भाषेतून लघुकथा, कादंब-या असे विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या ‘झाँसी की रानी’, हजार चौराशीर की माँ, रुदाली या कादंब-या मैलाचा दगड ठरल्या. इतर ग्रंथसंपदेत ‘अरण्यार अधिकार, अग्निगर्भ, सिद्धू कनहुर दाके आदी साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरले. यापैकी हजार चौराशीर की माँ, या त्यांच्या बंगाली भाषेतील कादंबरीवर आधारित गोविंद निहलानी दिग्दर्शित सिनेमा १९९८ साली रुपेरी पडद्यावर झळकला होता. या कादंबरीद्वारे महाश्वेता देवी यांनी नक्षलवादी चळवळीशी जोडला गेलेला मुलगा व त्याची आई यांची संघर्षकथा मांडली.
१९९३ साली कल्पना लाजमी यांनी महाश्वेता देवी यांच्या ‘रुदाली’ या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला होता. म्हादू हा मराठी चित्रपटही त्यांच्या कथेवर बनला आहे. महाश्वेता देवी यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गोविंद पै हे आधुनिक कन्नड कवी व एक श्रेष्ठ संशोधक होते. गोविंद पै यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. विसहून अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक व हिब्रू यांचाही समावेश होता. त्यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा काल ६० वर्षांहून अधिक होता.
अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे नारायण धारपांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.
अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले मा.विनय आपटे चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. मा.विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते.
विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती.
‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.
Copyright © 2025 | Marathisrushti