जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.
September 21, 2021
प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ रोजी झाला.
तरुण पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय बासरी वादक रूपक कुलकर्णी यांनी आपले वडील मल्हार कुलकर्णी यांच्या कडून सुरवातीचे शिक्षण घेतले. रूपक कुलकर्णी हे वयाच्या ९ व्या वर्षी पद्म विभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य झाले. वयाच्या ९ वर्षांच्या पासूनच, कठोर प्रशिक्षण घेत रुपक कुलकर्णी यांनी ध्रुपद, खयाल आणि बासरीच्या तंत्रशैली शैलीत चांगली कामगिरी केली.
रुपक कुलकर्णी यांचा पहिला एकल बासरी परफॉरमिंग वयाच्या ११ व्या वर्षी दरबार हॉल, बडोदा येथे झाला जिथे सुमारे १५०० संगीत प्रेमींना त्यांनी मंत्रमुग्ध केले होते. पुढे त्यांनी संपूर्ण भारतात आणि परदेशात जवळजवळ सर्व नामांकित संगीत सभाच्या मध्ये आपले बासरी वादन सादर केले आहे. त्यांचा पहिला संगीत अल्बम ‘TENDERLY’ वयाच्या १८ व्या वर्षी तबला वादक पं. अनिंदो चॅटर्जी यांच्या बरोबर आला. पुढे रूपक कुलकर्णी यांनी टाईम्स म्युझिक, एचएमव्ही, नवरस, प्लस म्युझिक, रिदम हाऊस, निनाद, एबीसीएल, सेन्स वर्ल्ड (लंडन), कॉप रेकॉर्ड्स इत्यादी म्युझिक कंपन्यांमार्फत आपले अल्बम प्रसिद्ध केले आहेत.
रूपक कुलकर्णी यांच्या बासरी मैफिली नियमितपणे आकाशवाणी आणि दूरदर्शन, स्टार टीव्ही, झी टीव्ही आणि सीएनएन-आयबीएन इत्यादी टीव्ही चॅनेलवर होत असतात.
रूपक कुलकर्णी यांची वेब साईट
http://www.fluterupakkulkarni.com
रूपक कुलकर्णी यांची मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=ZXSKV4P04Gg
रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन
https://www.youtube.com/watch?v=OP9N6GBVvpY
https://www.youtube.com/watch?v=Z-_-Hdq6-RU
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
April 19, 2022
प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला.
अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे अजित सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक ॲप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक होते. सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्या घरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो", " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
बासरी वादक म्हणून अजित सोमण यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. सुधीर फडके, यशवंत देव, पं.हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, आनंद मोडक, सुधीर मोघे, पं. बिरजू महाराज, पं. कालीचरण महोपात्र, पंडिता रोहिणी भाटे, प्रभा मराठे, डॉ.सुचेता चापेकर, मनीषा साठे, पार्वती दत्ता, रोशन दात्ये यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी बासरीची साथ केली. 'सखी मंद झाल्या तारका', 'ही वाट दूर जाते ' यांसारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हिटी, बुगी फॉर हनुमान या मध्ये अजित सोमण यांनी बासरी वाजवली आहे. अजित सोमण यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे.
युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम अजित सोमण यांनी केले होते. या मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे पार्वती दत्ता तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश होता. स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा संस्थांचे अजित सोमण यांनी विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले. दिग्दर्शक अजित सातभाई यांनी अजित सोमण यांच्यावर एक लघुपट केला आहे. अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
त्यांनी 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले. 'एक होता विदूषक' चित्रपटातील तराणा अजित सोमण यांनी लिहिला होता.
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसऱ्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत व NDA चे स्फूर्तिगीत सोमण यांनी लिहिले होते. 'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांची इंग्रजी उपशीर्षके सोमण यांची होती. अजित सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत. संगीत, जाहिरात, शिक्षण, साहित्य अशा क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करून ठसा उमटविणारे बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी स्वरशब्दप्रभू पुरस्काराने सन्मान करण्यात येत असतो. तसेच उदयोन्मुख कलाकाराला त्यांच्या नावाची शिष्यवृत्तीही देण्यात येते.
आजवर हा पुरस्कार सुधीर गाडगीळ, अरुण काकतकर, मनीषा साठे, रमाकांत परांजपे, सुधीर मोघे, श्रीधर फडके यांना मिळाला आहे. तसेच अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ ललित कला केंद्रातील सर्वोत्तम विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी 'स्वरशब्दप्रभू’ शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात येतो. अजित सोमण यांचे २ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 6, 2021
मौलाना ... हसरत मोहानी!
संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!
त्यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. मा.हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले. ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या.
कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती. हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते. मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली. १८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे. मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची.
दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!
अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला. अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला.
मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.
हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात -
मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक
पैगामे वफा बादे सहर लेके गयी है
(हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते -
मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से
सिधारे आज तिलक
बलवंत तिलक, महाराज तिलक,
आझादी के सरताज तिलक
मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
मनमोहन श्याम से नैन लाग
निसदिन सुलग रही तन आग
मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है
हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है
व
खूब-रुयोंसे यारियाँ न गई
या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई
हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर
खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g
हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
=========================================
उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
=====================================
कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
=====================================
जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
======================================
तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
देखता था मै तुने भी इशारा कर दिया
इश्कने उसको सीखा दी शायरी
अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई
January 1, 2018
इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा प्रतिनिधित्व करत असत.
शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार वादक उस्ताद वहीद खान. अजीज खान यांनी शाहिद परवेझ यांना पहिले अनेक वर्ष आधी तबला प्रशिक्षण दिले व नंतर सतारीचे प्रशिक्षण.
शाहिद परवेझ यांनी देशात आणि अमेरिका, युरोप, युएसएसआर, कॅनडा, आफ्रिका, मध्य-पूर्व आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक मैफिली केल्या आहेत. भारत सरकारने शाहिद परवेझ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 7, 2017
पं.विभव नागेशकरांनी श्रीमती झरीन दारुवाला शर्मा, पं. डी. के. दातार, श्री.रोहिणी भाटे, पं. बुद्धादित्य मुखर्जी, पं. शिवकुमार शर्मा, पं.जसराज, पं. भिमसेन जोशी, पं.विश्वमोहन भट, प.हरीप्रसाद चौरसिया यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आणि संगीतक्षेत्रात श्रोत्यांच्या मनात नाव कमाविले. त्यांनी प्रतिष्ठीत अशा श्रीमती गिरीजाबाई केळकर समारोह (फोंडा, गोवा), केसरबाई केरकर महोत्सव (भोपाळ), उ.अल्लादिया खान स्मृती दिन समारोह(चेंबुर), पंडीत ओंकारनाथ फेस्टिवल (जामनगर), लक्ष्मीबाई जाधव समारोह (चेंबुर) स्वरानंद (दहीसर-मुंबई), पेशकर फाऊंडेशन (मुंबई),सप्तक (नाशीक) अनेक कार्यक्रमात तबला वादन केले आहे.
April 19, 2022
चंदगीराम गेले. भारतीय कुस्तीमधील एक महान पर्व संपले. सहा फूट उंचीचा, १९० पौण्ड वजनाचा आपल्या विनम्र स्वभावाने सर्वांना जिंकणारा पैलवान अनंतात विलीन झाला. त्याने भारतीय कुस्ती क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटविला होता. १९७०च्या बँकॉक एशियाडमध्ये भारताला १०० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या महान कुस्तीगीराने भारतातील 'हिंद केसरी', 'महाभारत केसरी', 'भारत भीम', 'रुस्तम ए हिंद', 'भारत केसरी' हे सारे प्रतिष्ठेचे किताब जिंकले होते. चंदगीराम यांनी फडातल्या अनेक प्रतिष्ठेच्या कुस्त्याही जिंकल्या होत्या. पेशाने शिक्षक असलेल्या आणि पदवी परीक्षेपर्यंत पोहोचलेल्या या कुस्तीगीराने आपल्या कुस्तीच्या आखाड्यातून अनेक पैलवान घडविले. त्यापैकी सात जणांनी 'अर्जुन पुरस्कार' पटकाविले होते.
बीजिंग ऑलिम्पिकमधला ब्राँझ पदक विजेता सुशीलकुमार हादेखील चंदगीराम यांचाच चेला. चंदगीराम यांनी अनेक मल्ल घडविले हे खरे; पण त्यापेक्षाही त्यांचे या क्षेत्रासाठीचे मोठे योगदान म्हणजे त्यांनी महिला कुस्तीसाठी अतोनात मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या तिन्ही मुलींना प्रथम आखाड्यात उतरविले. १९९० च्या सुमारास तुमच्या मुलींना आखाड्यात उतरविणार का, या प्रश्नाला त्यांनी अशा प्रकारे कृतीतूनच उत्तर दिले होते. त्यामुळे अन्य मुलींच्या पालकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला. आखाड्यात मुलींना मुक्तपणे आणि दडपणाशिवाय सराव करायला मिळावा यासाठी त्यांनी आपल्या 'चंदगीराम का आखाडा'मध्ये पुरुषांना प्रवेश देणेच बंद केले. त्यांच्या एका मुलीने-सोनिकाने २००० मध्ये एशियन त्यांच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले होते. शिकविण्याच्या पद्धत अत्यंत कडक होती. त्या पद्धतीबाबत मुली सांगतात, की ते कठोर होते. एकदा का एखादी गोष्ट शिकवली, की ती चेल्याकडून घोटून तयार करून घ्यायचे. कठोर परिश्रमाला त्यांच्याकडे पर्याय नव्हता.
चुकीबद्दल शिक्षा द्यायचे; पण यशानंतर तेवढ्याच उत्साहाने कौतुकही करायचे. मोठ्या उदार मनाचा हा व्यक्तिमत्त्वाचा पैलवान होता. समोरच्या पैलवानाची दोन्ही हातांची दोन-दोन बोटे पकडून त्याला फिरविण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. आपला गुडघा प्रतिस्पर्ध्याच्या छातीवर टेकवून त्याचे दोन्ही हात पकडून डोक्याला डोके लावून ते फिरवायचे. दिल्लीचे गुरू हनुमानदेखील चंदगीराम यांना मानायचे. ते म्हणायचे, हा वेगळ्या ढंगाचा पैलवान आहे. तो समोरच्या पैलवानाचा आदर करतो. त्याच्याकडून विनय शिकण्यासारखा आहे. कुस्ती जिंकल्यानंतर पैलवानालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही ते अभिवादन करायचे. त्यांनी अनेक मल्लांना पोसले. अनेक महिला कुस्तीगीर घडविले.
गेल्या महिन्यातच त्यांची शिष्या अलका तोमर हिने एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ पदक पटकाविले. ती म्हणाली, मास्टर चंदगीराम यांचे सध्या एकच ध्येय होते. त्यांना आम्हाला नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळताना पाहायचे होते. ते त्यांचे स्वप्न होते. स्वतः चंदगीराम यांची कारकीर्ददेखील स्वप्नवत होती. त्यांच्या हाताचे पंजे मोठे होते. मनगटाची ताकद प्रचंड होती. त्यांच्या त्या ताकदीचा सर्वांना हेवा वाटायचा. त्यांची खेळावर श्रद्धाही मोठी होती. कुस्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या या अवलियाच्या निधनाने कुस्ती उत्तर भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात पोरकी झाली आहे.
July 31, 2015
लेखक, नाटककार व पटकथाकार शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. शं.ना. नवरे यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस आणि लोकप्रिय होतं... ते अतिशय शैलीदार वक्ते आणि माणसांमध्ये रमणारे लेखक म्हणून प्रसिद्ध होते... कादंबरी, कथा, ललित लेख नाटकं असं चौफेर लेखन त्यांनी केलंय. त्यांच्या लेखनातून बदलत्या शहरी समाज मनाचं चित्रण आपल्याला पहायला मिळतं. त्यांनी आपल्या लेखणीतून मध्यमवर्गीयांच्या सुखदु:खाचं चित्रण केलंय.
शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी अंतर्मुख केलं तर प्रसंगी रिझवलेही. १९४५ मध्ये शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स, सिद्धार्थ कॉलेज आणि पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९४९ साली त्यांनी बी.एस्सीची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी मंत्रालयात शासकीय नोकरीही केली मात्र काही काळानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सामान्य, मध्यमवर्गियांच्या जाणीवा, सुख-दु:खाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून, रंगमंचीय अविष्कारातून समाजासमोर आणल्या. कथा, ललित लेख, नाटक, चित्रपट पटकथा, वृत्तपत्रीय व नियतकालिकांतील स्तंभ अशा विविध माध्यमांतून ‘शन्नां’नी लेखन केले, पण ‘शन्ना’ खऱ्या अर्थाने खुलले आणि रमले ते कथेच्या विश्वात.
१९५१ नंतर नवकथेचा बहारीच्या काळात ‘शन्नां’चीही प्रतिभा बहरली. मात्र कोणत्याही एका लेखन प्रकारात ते कधीच अडकून पडले नाहीत. वाचकांना अंतर्मुख करणारी, खुसखुशीत मध्येच हास्याची लकेर, चिमटे घेणारी ‘शन्नां’ची लेखणी तितक्याच ताकदीची रंगमंचीय पात्रे उभी करू शकली. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. डोंबिवली गावावर त्यांचे अतोनात प्रेम होते.
‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होतेच पण ते खऱ्या अर्थाने या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा दुवाही होते. डोंबिवलीविषयी त्यांच्या मनातले ममत्व कायम होते त्यामुळेच नातेवाईक तसेच मित्रांनी आग्रह करूनही त्यांनी मुंबईत कायमचे वास्तव्य केले नाही. नोकरीनिमित्त मुंबई ही फक्त त्यांची कर्मभूमीच राहिली. डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. शन्ना नवरे यांचे २५ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
त्यांची साहित्य संपदा ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही नाटकं गाजलीत तर ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह तसेच ‘निवडुंग आणि इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’
मोरावर चोर - (संमिश्र) एकांकिका 200४, पर्वणी - करमणूकपर, विनोदी, रंगसावल्या - नाटक, तिळा उघड - कथासंग्रह, वर्षाव - नाटक, मला भेट हवी हो - नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, हसत हसत फसवुनी - नाटक
November 21, 2018
धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार उत्तम गाणाऱ्या, ज्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेही म्हटले जात असे त्या विदुषी गिरिजादेवी यांचे वडील उत्तम हार्मोनियम वादक होते व ते संगीताच्या शिकवण्या घेत असत. त्यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी वाराणसी येथे झाला. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे धडे घेतले. वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक व सारंगी वादक सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल व टप्पा शिकल्या. गायनाबरोबर वडिलांनी त्यांना अनेक भाषा, मर्दानी खेळ हेही सर्व शिकवले. त्यामुळे त्या बहुश्रुत झाल्या, साहित्याच्या जाणकारही झाल्या.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी एका चित्रपटात भूमिका केली व आपले संगीत शिक्षण त्यांनी श्री चंद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवले. गिरिजादेवींनी १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. त्यांनी अशा प्रकारे बाहेरचे कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. तेव्हाच्या समजुतीनुसार उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींनी त्या कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे मान्य केले.
१९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. १९४९ मध्ये त्यांचा अलाहाबाद रेडिओवर पहिला जाहीर कार्यक्रम झाला, त्यानंतर १९५१ मध्ये आराह, बिहार येथे पहिली जाहीर मफल झाली. १९९० च्या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना तयार करताना गिरिजादेवींनी २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवले होते. गिरीजा देवी यांनी बनारसचं स्पेशल पान खाल्लं की त्यांच्या गळा खुलून जात असे. तोंडात अस्सल बनारसी पान ठेवून, त्या बनारसी पानापेक्षाही अधिक रंगतदार अशी विदुषी गिरिजादेवींची ठुमरी, चती, ख्यालही ऐकण्याचे भाग्य अनेकांना मिळाले आहे. त्या एका मुलाखतीत म्हणल्या होत्या, 'आमच्या घरी सर्वचजण पान खायचे. त्यामुळे मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून पान खायची सवय लागली. हळूहळू ती वाढली. 'इतर गायक-गायिका गाताना गळा खुलावा म्हणून गरम पाणी किंवा कॉफी घेतात, पण माझ्या या खास बनारसी मेघाई पानाच्या रसामुळे माझा गळा खुलतो.'
गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गातात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करत असत. त्यांची सुरेलता उच्च दर्जाची होती. कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. आवाजाचे वेगवेगळे लगाव, व्हॉइस मोडय़ुलेशन्सचा वापर यांमुळे सूक्ष्म स्वरस्थाने लागतात, ती लोकसंगीतातून आल्याने आजकाल तर फारच अभावाने ऐकण्यास मिळतात. त्यांच्या ठुमरीची लय संथ होती. ख्यालासारखी भारदस्तपणे त्यांच्या ठुमरीची बढत असे संथ बोलबनावांनंतर माफक हरकती मुक्र्या त्या घेत असत. कल्पनाविलास भरपूर, पण भावदर्शन संयमित अशी त्यांची ठुमरी सजत असे. वेधक, माफक आणि रागाला साजेसे असे रागमिश्रण त्या करत असत. उदा.- भरवी ठुमरीत त्या बिलासखानी तोडीचे मिश्रण करतात. धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार त्या उत्तम गात असत.
पं. सामता प्रसाद, किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ, झाकीर हुसन अशा सर्व कसलेल्या तबलजींबरोबर त्या गायल्या होत्या. सवाई गंधर्व महोत्सवातल्या त्यांच्या मैफलीं गाजल्या होत्या. वाग्गेयकार आणि मैफलींखेरीज त्यांचे इतरही काम महत्त्वाचे आहे. लोकगीतांचे अनेक प्रकार आता हळूहळू नष्ट होत चालले आहेत असे त्यांना वाटत असे, म्हणूनच अठराव्या शतकात काशीमध्ये होणाऱ्या ‘गुलाबबारी’ गान महोत्सवासारख्या काही जुन्या परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केल्या होत्या. त्यात भारतरत्न भीमसेन जोशी, विदुषी शोभा गुर्टू अशा किती तरी मोठय़ा कलाकारांनी आपले गायन पेश केले होते. आपल्या समकालीन कलाकारांविषयी गिरिजादेवी अत्यंत आदराने बोलत असत. त्यांचे स्वतचे कर्तृत्व मोठे असून त्या नम्रपणे म्हणत असत की, ठुमरी म्हटलं की तीत सिद्धेश्वरीदेवींसारखी कोणी श्रेष्ठ नाही.
गुरू म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीत दोनदा त्या गुरू म्हणून नियुक्त झाल्या होत्या. ठुमरीशिवाय श्रीचंद मिश्रांकडून शिकलेले गुल, बत, नक्ष, रुबाई, छंद- प्रबंध, धारू असे प्रकारही आपल्या शिष्याना शिकवले होते. आता अस्तंगत होत जाणारा गानप्रकार जागता ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यातील गायकी, अलंकरण, भावदर्शन, लयभाव, सूक्ष्म स्वरदर्शन, आवाजाचे लगाव हा भारतीय संगीताचा अमूल्य ठेवाही जपला जात असे. आपल्या शिष्यांना त्या सांगत असत घरकाम करताना, चहा करताना, भाजी कापताना, टेबल सजवताना राग, अलंकार, पलटे, बंदिशी गुणगुणणे सतत चालू ठेवावे.त्यांचा हा वारसा त्यांच्या शिष्या शुभा जोशी, धनश्री पंडित राय, अश्विनी टिळक, शुभा मुद्गल या जपत आहेत. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९८९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार,२०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच ‘द न्यू ग्रोव्ह ऑफ म्युझिक’ मध्ये त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे.
तानसेन सन्मान, गुजरात सरकारचा ताना- रीरी पुरस्कार, अनेक संस्थांकडून डी लिट्., संगीत नाटक अकादमीची फेलोशिप आणि पुरस्कार, कोलकात्याचा डोव्हर लेन म्युझिक फेस्टिव्हलचा संगीत सन्मान पुरस्कार, दिल्ली सरकारकडून लाइफ टाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड असे किती तरी पुरस्कार मिळाले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 16, 2017
‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं.
September 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti