बलसागर भारत होवो ।
विश्वात शोभूनी राहो । धृ. !।
हे कंकण करि बांधियले ।
जनसेवे जीवन दिधले ।
राष्ट्रार्थ प्राण हे ठरले ।
मी सिद्ध मरायाला हो ।
बलसागर भारत होवो ।।१।।
वैभवी देश चढवीन ।
सर्वस्व त्यास अर्पीन ।
हा तिमिर घोर संहारीन ।
या बंधू सहाय्याला हो ।
बलसागर भारत होवो ।।२॥।
हातात हात घेऊन ।
हृदयास हृदय जोडून ।
ऐक्याचा मंत्र जपून ।
या कार्य करायाला हो ।
बलसागर भारत होवो ।।३।।
करि दिव्य पताका घेऊ ।
प्रिय भारत गीते गाऊ ।
विश्वा पराक्रम दावू ।
ही माय निजपदा लाहो ।
बलसागर भारत होवो ॥४॥।
याउठा करु हो शर्थ ।
संपादु दिव्य पुरुषार्थ ।
जीवन हे ना तरि व्यर्थ ।
भाग्यसूर्य तळपत राहो ।
बलसागर भारत होवो ॥५॥।
ही माय थोर होईल ।
वैभवे दिव्य शोभेल ।
जगतास शांति देईल ।
तो सोन्याचा दिन येवो ।
बलसागर भारत होवो ॥६।।
Post Views: 15