गेले सारे आयुष्य परि न कळला ईश
इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं
बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ
मनाची एकाग्रता केली शरीरा करिता
तरुणपणाची उमेद जिंकू वा मरु ही जिद्द
करुन प्रयत्नांची पराकाष्टा बनवी जीवन मार्ग निष्ठा
संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण
वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव
काळ येता वृद्धत्वाचा दाखवी मार्ग अनुभवाचा
भजन पुजेत जाई वेळ ज्ञान गोष्टी सांगे सकळ
आता झालो देह दुर्बल प्रभू चिंतनात जाई वेळ
वाट बघतो निरोपाची ओढ फक्त जगदंबेची
आयुष्य संपता सारे खंत येऊन मन विचारे
कां न प्रभू भेटला ह्याची रुखरुख मनाला
आत्म चिंतन करिता जाणवे मी भगवंता
ईश्वर निर्गुण निराकार कर्म करी त्यास साकार
दया क्षमा शांती ह्याच ईश्वराच्या शक्ती
आयुष्यातील आनंदी क्षण हीच ईश्वराची खूण
जीवनांतील समाधान ईश्वर प्राप्तीचे लक्षण
नसावी मनी खंत आनंदी भाव हाच भगवंत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com