आंबोली-आजरा परिसर …. दख्खनचं पठार !

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुलेनभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले….



आंबोली-आजरा परिसर …. दख्खनचं पठार …. ! Image © Prakash Pitkar….

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले….

रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले…..

आज तिच्या डोळ्यांत कथा ही, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी…..

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे….

आज तिने अपुल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघडयावरती भोग दिले….

काचोळीची गाठ सावरित हळूच तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले….

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते……

— कविवर्य ना. धो. महानोर

Image © Prakash Pitkar….

Author