
असीमा चॅटर्जी या भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होत्या ज्या सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसिन क्षेत्रात त्यांचा कामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचे सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे विंका अल्कलॉइड्सवरील संशोधन, एपिलेप्टिक औषधांचा विकास आणि मलेरियाविरोधी औषधांचा विकास आहे. त्यानी भारतीय उपखंडातील औषधी वनस्पतींवर देखील मोठ्या प्रमाणात काम केले. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स मिळविणारी त्या पहिल्या महिला होत्या.
असीमा चॅटर्जी यांचा जन्म २३ सप्टेंबर १९१७ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, जिथे त्यावेळी महिलांना शिक्षणाची गरज नव्हती. ती मोठी मुलगी होती, ज्याचा अर्थ कुटुंबात अधिक जबाबदाऱ्या असणे असा होता. त्यांचे वडील इंद्र नारायण मुखर्जी डॉक्टर होते आणि असीमा आणि त्यांच्या भावाच्या शिक्षणाला ते खूप पाठिंबा देत होते, जे त्यावेळी दुर्मिळ होते. त्यांच्या वडिलांना वनस्पतिशास्त्राची आवड होती, येथूनच त्यांना औषधात रस निर्माण झाला. परंतु, औषध क्षेत्रात त्यांची विशेष आवड वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांबद्दलच्या कुतूहलाने सुरू झाली. १९३६ मध्ये, त्यानी कलकत्ता विद्यापीठाच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधून रसायनशास्त्रात उच्च शिक्षण घेतले आणि सन्मानाने उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या वर्गात फारश्या मुली नव्हत्या कारण महिलांना क्वचितच जास्त अभ्यास करण्यास भाग पाडले जात असे.
ज्या काळात महिला सामान्यतः उच्च शिक्षण घेत नव्हत्या, त्या काळात असीमाने रसायनशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. १९३६ मध्ये त्यानी कलकत्ता विद्यापीठातील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून सन्मानाने पदवी प्राप्त केली. पुढे त्यानी कलकत्ता विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत कलकत्ता विद्यापीठातून डी.एससी. केली. १९४४ मध्ये भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. डॉक्टरेटची विद्यार्थिनी म्हणून, त्यानी प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्ल चंद्र रे (भारतातील रासायनिक शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे) आणि प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांच्यासोबत वनस्पती उत्पादनांच्या रसायनशास्त्रावर आणि कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्रावर काम केले. त्यानंतर त्यानी जैविकदृष्ट्या सक्रिय अल्कलॉइड्सवरील पोस्ट-डॉक्टरेट संशोधनासाठी विस्कॉन्सिन आणि कॅल्टेक विद्यापीठात लास्लो झेकमिस्टर यांच्यासोबत काम केले.
नंतर त्या कलकत्ता विद्यापीठातील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समध्ये शुद्ध रसायनशास्त्र विषयात रीडर म्हणून रुजू झाल्या. औषधी वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगांच्या स्वरूपावर त्यानी संशोधन सुरू ठेवले. त्यावेळी, सरकारकडून कमी निधी असल्याने शास्त्रज्ञांना काम करणे खूप कठीण होते आणि असीमाना भारताबाहेर विश्लेषणासाठी नमुने पाठवण्यासाठी स्वतःचे पैसे गुंतवावे लागत होते. त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक रसायने आणि अभिकर्मक मिळविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे पगार देणेही कठीण जात होते. १९६७ मध्ये ४ महिन्यांच्या आत त्यांचे वडील आणि पती गमावल्यानंतर मोठा धक्का बसला तरी, असीमा चॅटर्जी काही महिन्यांनी विज्ञानात परत आल्या (त्याच वेळी स्वतःलाही मोठा आरोग्याचा त्रास सहन करावा लागला). त्या वेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अथक पाठिंबा दिला आणि त्यानी या कठीण काळात मात केली आणि काम सुरू ठेवले. संशोधनाद्वारे, त्यानी रुग्णांवर उपचार करण्यासाठी अँटी-एपिलेप्टिक, अँटी-कंव्हल्सिव्ह आणि केमोथेरपी औषधे विकसित केली. ‘आयुष-५६’ हे एपिलेप्टिक औषध त्यानी मार्सिलिया पासून विकसित केले आहे, हे त्यांचे सर्वात यशस्वी काम आहे आणि आजपर्यंत ते व्यावसायिकरित्या वापरले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींपासून त्यानी टीमसोबत मलेरियाविरोधी औषधे विकसित केली. कर्करोग आणि कर्करोगाच्या वाढीच्या औषधांवर संशोधन करण्यासाठी ४० वर्षे समर्पित केली. तिने अल्कलॉइड्सचा अभ्यास केला, जे कर्करोगाच्या रुग्णांसाठी केमोथेरपीमध्ये प्रभावीपणे वापरले जात होते. डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आणि त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या लेडी ब्रेबॉर्न कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग सुरू केला.
— रवींद्र शरद वाळिंबे