२४ डिसेंबर १९३२ रोजी भारतातील बंगळुरात एका इंग्लिश दांपत्याला पुत्रप्राप्ती झाली. वडील क्रिकेटवेडे असल्याने या बालकाचे नामकरण मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या आद्याक्षरांवरून मायकेल कोलिन कौड्री असे ठेवले गेले (एमसीसी).
जुलै १९४६ मध्ये, अर्थात वयाच्ता तेराव्या वर्षी कोलिन लॉर्ड्सवर पदार्पण करता झाला, एका आंतरशालेय सामन्यात खेळून. आजही तो लॉर्ड्सवर सर्वात लहान वयात खेळलेला खेळाडू आहे. या सामन्यात त्याने ७५ आणि ४४ धावा काढल्या आणि आठ गडी बाद केले. चार वर्षांनंतर केंट संघाकडून त्याने पदार्पण केले आणि १९७६ मधील निवृत्तीपावेतो तो केंटचा खेळाडू राहिला.
१९५४-५५ च्या हंगामात ज्या इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा दौरा केला त्या संघात कौड्रीचा समावेश होता. बॉक्सिंग डे कसोटीत (थोडी प्रतीक्षा….) त्याने मेलबर्नवर शतक झळकावले. १९५९ मध्ये पहिल्याप्रथम तो इंग्लंड संघाचा कर्णधार झाला- जन्मदेशाविरुद्ध. सत्तावीस कसोट्यांमध्ये त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले.
१९६३ मध्ये लॉर्ड्सवर विंडीजविरुद्धच्या कसोटीत एक मनगट प्लॅस्टरमध्ये बांधलेले असताना कौड्री फलंदाजीच्या तयारीने मैदानात आला ! नशीब त्याला चेंडूचा सामना करावा लागला नाही, करावा लागला असता तर आपण तो एकाच हातात बॅट धरून केला असता असे कौड्री सांगतो ! कौड्रीच्या या धाडसामुळे तो सामना अनिर्णित राहिला. अन्यथा इंग्लंड पराभूत झाले असते.
१९७४-७५ च्या हंगामात क्रिसमसच्या तोंडावर कौड्रीला कसोटीसंघात बोलावणे आले होते (पहा १३ डिसेंबर) आणि ऑस्ट्रेलियाई माध्यमांनी त्याची चिकार टर उडवली होती.
किमान शंभर कसोट्या खेळलेले खेळिये
— डॉ. आनंद बोबडे