पनामा

पनामाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.



पनामाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

१६व्या शतकापासून स्पेनची वसाहत असलेल्या पनामाने १८२१ साली स्पेनपासून वेगळे होऊन ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक नावाचे संयुक्त राष्ट्र स्थापन केले. १९०३ साली अमेरिकेच्या पाठिंब्यावर पनामा कोलंबियापासून स्वतंत्र झाला. ह्याच वर्षी बांधला गेलेला व पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा पनामा कालवा हा जगातील सर्वात महत्त्वाच्या कृत्रिम जलमार्गांपैकी एक आहे. सध्या पनामाच्या मिळकतीचा मोठा हिस्सा ह्या कालव्याच्या करामधून येतो.

पनामा हा देश उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणाऱ्या सीमारेषेवर पूर्व पश्चिम दिशेला असलेला एक लहानसा प्रजासत्ताक देश आहे. पनामाचे क्षेत्रफळ ७७,०९० चौ.कि.मी. आहे. ७ अंश १५ ते ९ अंश ३९ उत्तर आणि ७७ अंश १५ ते ८३ अंश ३० पश्चिम या दरम्यान पनामाचा विस्तार आहे. पनामाच्या पश्चिमेस कोस्टा रीका, पूर्वेस कोलंबिया हे देश असून उत्तरेला कॅरिबियन समुद्राची ७६७ कि.मी. लांबीची किनारपट्टी आहे. तर दक्षिणेला पॅसिफिक महासागराची १,२३४ कि.मी.

लांबीची किनारपट्टी आहे. या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार ७२० कि.मी. लांबीचा असून ५० ते १८० कि.मी. रुंदी आहे. जगप्रसिद्ध असा पनामा कालवा या देशातूनच जातो. दोन खंडांच्या मोक्याच्या जागी हा देश असल्याने याला जागतिक आणि लष्करीदृष्ट्या महत्त्व आहे. पनामा सिटी ही पनामाची राजधानी आहे. पनामा या देशाची लोकसंख्या ३,३२२,५७६ इतकी असून ३ नोव्हेंबर १९०३ हा पनामाचा स्वातंत्र्य दिन आहे. या देशाची भूरचना डोंगराळ आणि पर्वतीय आहे. किनाऱ्याजवळ सखल प्रदेश आढळतो. देशाच्या मध्यभागातून पूर्व पश्चिम दिशेने जाणाऱ्या पर्वतरांगा आहेत. यातील चीरीकी हे ३,४७८ मी. उंचीचे सर्वोच्च ज्वालामुखी शिखर आहे. देशात नद्यांचे जाळे असून लहानमोठ्या अशा ५०० नद्या आहेत. बहुतेक नद्या पॅसिफिक समुद्राला मिळतात. ट्वीरा आणि चॅग्रेस या नद्या व्यापारी दृष्टीने आणि देशाचा विकासाचा आधार ठरतील अशा आहेत. या देशालगत असणाऱ्या बेटांची संख्या १,६०० आहे. त्यातील सान ब्लास, क्कीबा, पर्ल ही बेटे महत्त्वाची आहेत. देशाचे हवामान उष्ण कटिबंधीय सागरी स्वरूपाचे आहे. तापमानाचे प्रमाण १० अंश ते २७ अंश से. पर्यंत असते. कॅरिबियनच्या बाजूला ३०० से.मी. तर पॅसिफिकच्या बाजूला १६० से.मी. पर्यंत पाऊस पडतो. येथे खनिजसंपत्ती भरपूर प्रमाणात आहे. सोने, चांदी, मँगेनिज आणि चुनखडीचे प्रमाण बरेच असल्यामुळे येथे सिमेंटच्या उत्पादनात वाढ झालेली दिसते. पनामात दाट अरण्ये असून अधुन मधून गवताळ प्रदेश दिसतात.

कॅरिबियनच्या बाजूने सदाहरित वृक्ष तर पॅसिफिकच्या बाजूला पानझडी वृक्ष आढळतात. अरण्यातून माकडे, हरिणे, चित्ते यांची संख्या बरीच: आहे. पॅसिफिकच्या किनारपट्टीवर मासेमारी बऱ्याच प्रमाणात चालते. केळी, पेट्रोलियम पदार्थ, मासळी यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. येथील बंदरांवर जहाजांची आंतरराष्ट्रीय वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते. ७ ते १५ वर्षापर्यंत येथे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत आहे. मुख्य धर्म ख्रिस्ती असून अधिकृत भाषा स्पॅनिश आहे. बल्बोआ हे येथील चलन आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :पनामा सिटी
अधिकृत भाषा :स्पॅनिश
राष्ट्रीय चलन :पनामेनियन बाल्बोआ

सौजन्य : विकिपीडिया

Author