केनिया वन्यजीव संपत्तीने समृद्ध देश आहे केनिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. केनियाच्या उत्तरेला इथियोपिया, आग्नेयेला सोमालिया, पश्चिमेला युगांडा तर दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. नैरोबी ही केनियाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे.
केनिया हा पूर्व आफ्रिका खंडातील स्वतंत्र प्रजासत्ताक देश ‘आहे. केनियाचे क्षेत्रफळ ५,८२,६४७ चौ.कि.मी. इतके असून त्यापैकी १४,७९२ कि.मी. जलव्याप्त आहे. ४ अंश उत्तर ते ४ अंश दक्षिण आणि ३४ अंश ते ४१ अंश पूर्व हा केनियाचा विस्तार असून त्याच्या मध्यातून विषुववृत्त गेलेले आहे. याच्या उत्तरेस इथियोपिया आणि सूदान, पश्चिमेस यूगांडा आणि व्हिक्टोरिया सरोवर, दक्षिणेस टांझानिया आणि पूर्वेस सोमाली गणराज्य आणि हिंदी महासागर आहेत. केनियाची लोकसंख्या ३९ दशलक्ष इतकी आहे.
केनियाचे तळखडक कायनाईट, ॲसबेस्टस, ग्रॅफाईट आणि अभ्रकयुक्त नाईस आणि शिस्ट यांचे असून पश्चिम भागात त्यावर तीव्र वलिकरण झालेल्या काही खनिजांनी युक्त ग्रॅनाईट आणि इतर खंडकांचे आच्छादन आहे. हिंदी महासागराला लागून ५००कि.मी.चा केनियाचा किनारा आहे.
देशाच्या नैर्ऋत्य विभागात ३,३०० मी. उंचीचे पठार आहे. तर यूगांडाच्या सिमेवर माऊंट अलगन हा ४,३२१ मी. उंचीचा पर्वत आहे. येथील खचदरीत कामासिया टेकड्यांची रांग, मृत ज्वालामुखी आणि मागाडी, नैवाशा, एल्मेंटिटा, हॅन्रिटन्, बॅरींगो ही सरोवरे आहेत. उत्तर भागात २५० कि.मी. लांबीचे रूडॉल्फ हे मोठे सरोवर आहे. ताना, आती-साबाकी-त्सावोनी, गॅलाना, इवासो-निरो, सोईया, गॉरी या केनियातील प्रमुख नद्या आहेत. केनियात भू-रचनेप्रमाणे हवामानात विविधता दिसून येते. उष्णकटिबंधात्मक दमट हवामान, केनिया खंडांतर्गत कोरडे व उष्ण, पठारी आणि पर्वतमय प्रदेशात थंड हवामान असे प्रकार दिसून येतात. ३.३ अंश ते २६.६ अंश सें. या दरम्यान तापमान दिसून येते. रूक्ष भागात २५ सें.मी., देशाच्या सर्वसामान्य भागात ७६ सें.मी. आणि किनारपट्टीच्या भागातं १०० सें.मी. पाऊस पडतो. समुद्र किनाऱ्यालगत नारळ, कच्छ वनश्री आणि सदाहरीत वृक्ष दिसतात. पठारी विभागात सॅव्हाना गवत तर त्यापेक्षा उंच भागात बांबू, इमारतीचे लाकूड, कर्पूर वृक्ष आफ्रिकन ऑलिव्ह, सिडार इत्यादी वृक्ष आढळतात.
केनियाचा गवताळ भाग आणि अरण्यमय प्रदेश हिंस्र प्राण्यांनी गजबजलेला आहे.
.हत्ती, गेंडा, झेब्रा, रानरेडा, गॅझेली, ऑरिंक्स आणि अनेक जातींची हरणं याशिवाय चित्ता, बिबळ्या, सिंह इ. प्राणी येथे आढळतात. नद्या आणि सरोवराच्या आसपास शहामृग, गरूड, गिधाड हे पक्षी आणि कोब्रा, अजगर इ. सर्प जातीतील प्राणी आढळतात. केनियाची आर्थिक स्थिती सर्वस्व शेती मालावर अवलंबून आहे. नैरोबी ही केनियाची राजधानी असून मुख्य धर्म ख्रिस्ती आहे. अधिकृत भाषा स्वाहिली आहे. केनिया शिलिंग हे येथील चलन आहे.