इवान इवानोविचची गोष्ट

(Gold)
इवान इवानोविच हा अंतराळवीर, जैववैद्यकशास्त्रात संशोधन करणाऱ्या एका संस्थेच्या सल्ल्यानुसार, मॉस्कोतील एका कृत्रिम अवयव बनवणाऱ्या संस्थेकडून बनवून घेतला होता. हा बाहुला इतका बेमालून बनवला गेला होता, की जमिनीवर परतल्यावर जर तो स्थानिक लोकांच्या हाती लागला, तर गैरसमज पसरू नये म्हणून त्यावर ‘माकेत’ (नकली) असं लिहून ठेवण्यात आलं होतं. तरीही काहीसा गोंधळ झालाच. दुसऱ्या अंतराळसफरीच्या वेळी इवान हा बर्फाच्छादित प्रदेशात उतरला. त्यामुळं त्याला घोड्यांकडून ओढल्या जाणाऱ्या गाडीवरून परत नेण्यात आलं. या घटनेच्या काही महिने अगोदर गॅरी पॉवर्स या अमेरिकन वैमानिकाचं विमान हेरगिरी करीत असल्याच्या आरोपावरून रशियाकडून पाडण्यात आलं होतं आणि हवाई छत्रीच्या साहाय्यानं जमिनीवर उतरलेल्या गॅरी पॉवर्सला रशियानं ताब्यात घेतलं होतं.