‘प्रणाम वीरा’ हे ज्येष्ठ लेखक रामदास कामत यांचे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. यात देशाचे रक्षण करणाऱ्या तसेच अतिरेक्यांचा बीमोड करणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला व त्यागाला वंदन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २६ जुलै २०२६ म्हणजे यावर्षीच्या ‘कारगिल विजय दिना’ दिवशी मुंबईमध्ये झाले. ‘शब्दमित्र प्रकाशन’ने हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. किर्तीचक्राने सन्मानित ‘नायब सुभेदार संतोष तानाजी राळे’ हे या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
जवानांसाठी तळमळीने काम करणाऱ्या लेखिका व समाजसेविका ‘श्रीमती उमा कुलकर्णी’ यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. त्या पुस्तकाचे कौतुक करताना म्हणतात – “भारतमातेच्या महान सुपुत्रांचा परिचय जनतेला विशेषत: नवीन पिढीला करून देणे, त्यांच्या त्यागाची जाणीव करून देणे आणि त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगायला शिकवणे ही सुद्धा एक देशसेवाच आहे आणि ती रामदासजी अविरतपणे करत आहेत. हे पुस्तक वाचताना वाचकाची एक भावस्पर्शी वाचनयात्रा सुरू होते. कधी मान अभिमानाने उंचावते, कधी या हुतात्म्यांच्या आठवणीने डोळे दाटून येतात, तर कधी अंगातले रक्त देशभक्तीने सळसळते. या वीरांच्या बलिदानाचा सन्मान राखणे, त्यांच्या शौर्याचा आदर करणे, त्यांच्या अद्भुत साहसांच्या कथा पुढे नेणे आणि देशप्रेमाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे हे, हे पुस्तक वारंवार जाणीव करून देत राहतं.”
पुस्तकाच्या माध्यमातून रामदासजींनी भारतमातेच्या अनेक ज्ञात-अज्ञात वीर सुपुत्रांची माहिती संकलित करुन शब्दबद्ध केली आहे. शाळेत असताना रामदासजींनी एनसीसी जॉईन केली आणि तेव्हाच त्या गणवेशाबद्दल आणि सैन्याबद्दल त्यांच्या मनात अतीव आदर आणि आकर्षण निर्माण झाले. पुढे बँकिंगमध्ये करिअर करत असताना सैन्यविषयक क्षेत्रात प्रत्यक्ष काही करता आले नाही तरी, पुढे निवृत्तीनंतर ते लेखन, एकपात्री कार्यक्रम आणि दृकश्राव्य कार्यक्रम यांद्वारे देश, सैन्य आणि वीरजवान यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. याच भावनेने ‘दैनिक सामना’ मध्ये त्यांनी भारतमातेच्या वीरांना आदरांजली वाहणारे ‘प्रणाम वीरा’ हे सदर काही महिने चालवले. या निमित्ताने ते काही जवानांना प्रत्यक्ष भेटले तर काही वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटले. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी हे सदर लिहिले, त्यामुळे त्यांच्या लेखनाला अस्सलपणा प्राप्त होतो. हे सदर थांबल्यानंतर फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर ते या संबंधात लिहीत राहिले. या लिखाणाला सामान्य वाचकांबरोबरच उमाताई कुलकर्णी, माजी सैनिकांचा छान प्रतिसाद लाभला. पूर्वी प्रसिद्ध झालेल्या व्यक्तीचित्रांमध्ये भर घालून आता या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
या पुस्तकामध्ये एकूण ३२ शूरांची व्यक्तीचित्रणे असून त्यापैकी केवळ सहा जीवीत असून सव्वीस बहादूर वीरगतीला प्राप्त झाले आहेत. एकूण लिखित वीरांपैकी तेरा मराठमोळे नरपुंगव आहेत. जसे की – कमांडो मधुसूदन सुर्वे, नायब सुभेदार संतोष राळे, युदधवीर प्रकाश महाडिक, मेजर कौस्तुभ राणे, कॅप्टन विनायक गोरे, लेफ्टनंट दिलीप गुप्ते, ले. प्रकाश कोटणीस, मेजर प्रसाद महाडिक, सेकंड लेफ्ट. मकरंद घाणेकर, सार्जंट मिलिंद खैरनार, कर्नल संतोष महाडिक, ले. कर्नल मनीष कदम, मेजर मनीष पितांबरे. या मराठी योद्ध्यांबाबत मराठी जनांनी वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या, सार्वजनिक कार्यक्रम, समाजमाध्यमे यांद्वारे ऐकलेले असते. पण सौरभ कालिया, उन्नीकृष्णन सारखे काही अपवाद वगळता अनेक अमराठी योद्धे आपल्याकडे अपरिचित, उपेक्षित राहतात. या पुस्तकाद्वारे देशाच्या इतर भागातील अश्या अनोळखी शूरवीरांचा पराक्रम आपल्याला माहीत होतो.
कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानने कॅप्टन सौरभ कालिया यांचा केलेला क्रूर अमानवी छळ डोके सुन्न करतो. नोव्हेंबर २००८ मध्ये अजमल कसाब आणि इतर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यादरम्यान प्राण्यांची बाजी लावणारे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची शौर्यकहाणी पुन्हा एकदा आपल्याला भारावून टाकते. १३ डिसेंबर २००१ रोजी पाच दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यादरम्यान अनेक संसदसदस्यांसह शेकडोंचे प्राण वाचवण्यास कारणीभूत झालेल्या कॉन्स्टेबल कमलेशकुमारी यादव यांना आपल्याकडून आपोआपच मानाचा मुजरा घडतो. १९९४ साली काश्मीरमध्ये आठ अतिरेक्यांचा खातमा करणाऱ्या कॅप्टन संजय चौहान यांचा इतर अतिरेक्यांनी कसा अंगावर शहारे आणणारा छळ करून निर्घृण हत्या केली हे कळल्यावर संताप अनावर होतो. मार्च १९८९ मध्ये कर्नल विजयकुमार बक्षी यांनी अनेक एलटीटीई दहशतवाद्यांना यमसदनास पाठवताना आपल्याही प्राण्यांची आहुती दिली हे माहीत होते.
कमांडर चेतनकुमार चीता यांचा मनोनिग्रह तर अविश्वसनीय आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये काश्मिरी दहशतवाद्यांचा बिमोड करताना चेतन यांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक दुखापती झाल्या. त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले, पोटाला गंभीर दुखापत झाली आणि स्फोटातील धातूचे तुकडे त्यांच्या डोळ्यात घुसले. त्यांच्या शरीरावर एकूण नऊ गोळ्या लागल्या आणि एक गोळी त्यांच्या डोक्यालाही भेदून गेली. त्यानंतर जवळपास दीड महिना ते कोमामध्ये होते. यातूनही ते जबर इच्छाशक्तीने बरे झाले आणि २०१८ मध्ये पुन्हा सीआरपीएफ मुख्यालयात कर्तव्यावर रुजू झाले. डिसेंबर २००४ मध्ये मिझो बंडखोरांचा बंदोबस्त करताना प्राणांचे बलिदान दिलेल्या कॅप्टन संजय आर्य यांच्या शौर्याबद्दल कळते. कारगिल युद्धादरम्यान मेजर राजेशसिंह अधिकारी यांच्या वीरतेमुळे भारताला टोलोलिंग आणि ‘पॉईंट- ४५९०’ या दोन शिखरांवर ताबा मिळवता आला हे कळल्यावर अभिमानाने छाती फुलून येते. २५ सप्टेंबर २०१२ रोजी काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्ध शौर्य गाजवताना लेफ्टनंट कर्नल मनीष सिंग यांना पाठीच्या कण्याला गोळी लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली. ती इतकी गंभीर होती की त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करून काही फायदा झाला नाही. बेंबीच्या खाली कोणती संवेदना नाही व हालचालींवर नियंत्रण नाही अशी त्यांची अवस्था असे. परंतु नंतर ‘स्टेम सेल थेरपी’चे उपचार केल्यावर त्यांना थोडाफार फायदा झाला. ते आता कॅलीपर्सच्या मदतीने चालू फिरू शकतात. अजून थोडे बरे वाटल्यावर पुन्हा स्पेशल फोर्समध्ये परतण्याची त्यांची तीव्र इच्छा आणि जिद्द आहे.
अशा अनेक वीरगाथा या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतात. रामदासजींनी केवळ चकमकींचे वर्णन न करता त्या वीरांच्या मागे असणारे त्यांचे कुटुंब, त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांची पार्श्वभूमी यावरही प्रकाश टाकला आहे. रामदासजींची भाषा अत्यंत सोपी, ओघवती, संवेदनशील आहे. त्यात कुठेही अलंकारीकता, क्लिष्टता नाही. त्यामुळे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांसाठी वाचनीय बनते. सैनिकी इतिहास, देशप्रेम आणि जवानांचे खडतर जीवन समजून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. सिने अभिनेते, क्रिकेटपटू, राजनेता नव्हे तर देशासाठी प्राणांची बाजी लावणारे असे अनेक ज्ञात-अज्ञात वीर हेच खरे आपल्या देशाचे आणि जनतेचे नायक असले पाहिजेत याची जाणीव हे पुस्तक वाचल्यावर होते. त्यामुळे विशेषत: किशोर, कुमार आणि युवा पिढीच्या हाती अशी पुस्तके दिसली पाहिजे जेणेकरून देशप्रेम, राष्ट्रसेवा, शौर्य यांची प्रेरणा त्यांना सतत मिळत राहील. असे पौष्टिक बाळकडू मिळाल्यावरच देशाची भावी पिढी सकस निपजेल जी सुदृढ राष्ट्रउभारणी करेल.
{लेखकाविषयी – श्री रामदास कामत हे ‘भारतीय स्टेट बँके’तून ‘सहाय्यक महाप्रबंधक’ पदावरून निवृत्त झालेत. विविध बँकांमध्ये ४० वर्षांहून अधिक बँकिंगचा त्यांचा अनुभव आहे. वृत्तपत्र लेखन आणि नाटक हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. अनेक वर्तमानपत्रांतून त्यांची नाट्य परीक्षणे आणि लेख प्रकाशित झालेत. विविध दिवाळी अंकांतून त्यांचे साहित्य प्रसिद्ध होत असते. मराठीप्रमाणेच अनेक हिंदी दैनिके आणि मासिकांतूनही त्यांचे लेख, कथा, कविता प्रकाशित झालेत. ‘प्रणाम वीरा’सह आतापर्यंत त्यांची विविध विषयांवरील ११ मराठी / हिंदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक वेगवेगळ्या संकल्पनांवरील एकपात्री तसेच दृकश्राव्य कार्यक्रम ते सादर करत असतात. यातील “आझादी की जंग, फिल्मों के संग” या युद्धपटांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रमाचे संपूर्ण मानधन आणि प्रेक्षकांकडून मिळालेली देणगी रक्कम ते “आर्मी वेल्फेअर फंड”ला सुपूर्द करतात. अनेक ठिकाणी विविध विषयांवर त्यांच्या मुलाखती व व्याख्याने होत असतात. बऱ्याच संस्थांतर्फे त्यांना सन्मान / पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.}
– गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)
