महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध टळावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भगवान श्रीकृष्णांनी केलेला शेवटचा प्रयास म्हणून विख्यात असलेल्या कृष्णशिष्टाई वर आधारित असणारे महाकवी भासांचे नाटक दूतवाक्यम् !
अर्जुन पुत्र अभिमन्यु आणि विराट राजाची कन्या उत्तरा यांचा विवाह झाल्यानंतर, पांडवांचा अज्ञातवास संपल्यावर कौरव-पांडवांच्या मध्ये भविष्यात होणारे युद्ध टळावे यासाठी दोन्हीकडून काही प्रयत्न झाले. मात्र त्यातून काहीही हाती न लागल्याने स्वतः धर्मराज श्रीकृष्णांना शेवटचा प्रयत्न करून पाहायला सांगतात या पार्श्वभूमीवर नाटक सुरू होते.
आरंभी रंगमंचावर आलेला दुर्योधन सर्व उपस्थित राजांना येत असणार्या कृष्णाला कोणताही मान देऊ नये असे सांगतो. स्वतः द्रौपदी वस्त्रहरणाचे चित्र पहात बसतो.
कितीही सांगितले तरी श्रीकृष्णांच्या आगमनाबरोबर त्यांच्या प्रभावाने सर्व राजे उठून उभे राहतात. या धांदलीत स्वतः दुर्योधनही पडतो. त्याच्या हातातील चित्र पाहून स्वजणांचा अपमान आणि आपलीच अनैतिक वृत्ती पाहणाऱ्या दुर्योधनाची श्रीकृष्ण निर्भर्स्तना करतात.
संधीचा प्रस्ताव घेऊन आपल्या वडिलोपार्जित संपत्तीची ते मागणी करतात. त्यावर दुर्योधन काका पंडू जंगलात मेल्यावर इतर देवतां पासून झालेल्या यांचा अधिकार काय? असा प्रश्न विचारतो.
त्यावर भगवान श्रीकृष्ण त्याला इतिहास सांगताना म्हणतात की तुझे आजोबा विचित्रवीर्य गेल्यावरच तुझ्या वडिलांचा जन्म झालेला आहे.
इतरांचे दोष दाखवताना, आपल्यातील ते दोष माणूस पाहत नाही या वृत्तीवर भास नेमके बोट ठेवतात.
त्यावर ही पृथ्वी वीरभोग्या वसुंधरा ! आहे असे म्हणत दुर्योधन, एक तर पराक्रम करा किंवा जंगलात चालले जा. असा पांडवांना सल्ला देतो.
त्यावर पराक्रमाचा विषय मांडतांना भगवान श्रीकृष्ण एकट्या अर्जुनाचे पराक्रम सांगतात. किरात वेशातील शंकरांना पराजित करणारा, निवातकवच नामक राजसमूहाला एकट्याने पराजित करणारा, अज्ञातवासाच्या शेवटच्या दिवशी भीष्म, द्रोण, कृपाचार्य ,कर्ण या सगळ्यांना एकट्याने हरवणारा अर्जुन सगळ्या भावांच्या सह किती पराक्रमी असेल? असे म्हणत ते सगळ्यांच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न करतात.
चिडलेला दुर्योधन त्यांना पकडण्याची आज्ञा देतो. मात्र कुणीही समोर येत नसल्याने स्वत:च समोर गेल्यावर भगवान विराट रूप दाखवून त्याला नामोहरम करतात. भासांच्या प्रतिभेने वेगळेपणाने रंगवलेला प्रसंग म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सुदर्शन आणि इतर आयुधे तेथे प्रगट होतात. भगवान त्यांना दुर्योधन वधाची आज्ञा देतात. मात्र केवळ दुर्योधन वध पर्याप्त नाही तर त्याला मदत करणाऱ्या सगळ्याच दुष्ट क्षत्रियांचा विनाश व्हायला हवा असे सुदर्शनाने सांगितल्यावर भगवान शांत होतात.
पांडवांकडे परत जायला निघालेल्या भगवंताला भेटायला येऊन धृतराष्ट्र त्यांना शांतीचा मार्ग आचरण करण्याची प्रार्थना करतो अशा प्रसंगावर हे नाटक संपन्न होते. अत्यंत धारावाही भाषेत, सोप्या सहज संवादात, मूळ महाभारतातून प्रसंगी येत, मानवी मनाचे काही पैलू प्रकट करणारे हे नाटक भासांची एक महत्त्वपूर्ण नाट्यकृती आहे.
ओंकेश्वरी अतुल सहारे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
वाङ्मय स्नातक अंतिम वर्ष.
दि. १९.१.२०२२