पहाटेच्या प्रसन्नमयी वातावरणात
चालताना तुझ्याशी घट्ट नातं जाणवतं..
तळ्याकाठीची ओल्या स्पर्शाची तुझी माया..
कितीतरी वेळ थिजून ठेवते…
आठवणीतल्या वाटेवर तू घेऊन जातेस अलगद..
बालपणी तुझ्याबरोबर तासनतास घालवलेला वेळ..
बोटा बोटात तुझं रूतून बसणं..
घरातल्यांच्या धाकाने तेच हात सदऱ्याला पुसणं..
कधी सगळ्या अंगभर तूच आणि मी पटांगणात खेळायचो..
तू पोटात बीज रूजवतेस म्हणून आम्ही भाकरी खातो..
म्हणून पहिल्या पावसाचा मनात अजून मृदूगंध वाहतो..
तू बोलावलेस म्हणून आपल्या माणसात येतो..
तू खरच फार मोलाची आहेस..
वीतभर का होईना पण आपल्या पायाखालची जमीन
आपलं अस्तित्व दाखवते..
तू फार खोलवर गेलेली.. मूळ जननी..
मातेच्या उदरात जन्माला येईल तो शेवटी तुझ्या उदरात
मिसळून जाईल..
हा नश्वर देह गळून पडला की गती मिळण्यासाठी माती
द्यायला येतील ती आपल्या मातीतील माणसं..
ॠणानुबंध मातीशी
शतदा घडावे..
मातीत मिसळून
जीवन कृतार्थ व्हावे..